बेकायदेशीरपणे दारूगोळा बाळगल्याबद्दल भारताच्या कनिष्ठ नेमबाजी संघाचे प्रशिक्षक अहारूल हसन चौधरी यांना आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय भारतीय रायफल नेमबाजी संघटनेने घेतला आहे.  
फिनलंड येथील स्पर्धा संपल्यानंतर भारतीय खेळाडूंसमवेत चौधरी हे मंगळवारी मायदेशी परतले. आपल्याकडे दारूगोळा असल्याचे निवेदन न देता ते ग्रीन चॅनेलमधून बाहेर येत असताना कस्टम्स अधिकाऱ्यांनी त्यांना अडविले. त्या वेळी कस्टम्स अधिकाऱ्यांनी चौधरी यांच्यावर दारूगोळ्याचा बेकायदा साठा बाळगल्याचा आरोप ठेवीत त्यांना ताब्यात घेतले.
संघटनेचे सचिव राजीव भाटिया यांनी सांगितले, संघटनेचे अध्यक्ष राणिंदरसिंग यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. जर चौधरी यांचे कृत्य बेकायदेशीर असेल तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल. कस्टम्स विभागाने हा दारूगोळा जप्त केला असून चौधरी यांना तात्पुरते सोडले आहे. मात्र त्यांची लवकरच चौकशी केली जाणार आहे.