महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या रविवारी प्रा. किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, घटना दुरुस्ती समितीने सादर केलेल्या प्रस्तावित मसुद्यास मान्यतेचा विषय ऐरणीचा असेल. मागील सभेत घटना दुरुस्तीच्या विषयावर गांभीर्याने चर्चा झाली होती. याचप्रमाणे महाकबड्डी लीगबाबतही चर्चा होणार आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्याला दुसऱ्या पदासाठी निवडणूक लढण्यापूर्वी आधीचे पद सोडावे लागेल, मग रिंगणात उतरता येईल, हा घटनेतील प्रमुख बदल आहे.
राज्य कबड्डी असोसिएशनच्या सरकार्यवाह पदावरून रमेश देवाडिकर पदच्युत झाल्यानंतर सध्या संभाजी पाटील हे प्रभारी सरकार्यवाह म्हणून काम पाहात आहेत. सरकार्यवाह पद उर्वरित काळासाठी भरण्याच्या दृष्टीने निवडणूक घ्यायची झाल्यास घटनेचा मोठा पेच असू शकेल. याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या महाकबड्डी लीगच्या पहिल्या पर्वाचे यश आणि दुसऱ्या पर्वाची तयारी याबाबत चर्चा होईल.