भारताच्या १९ वर्षाखालील संघाने श्रीलंकेचा ९७ धावांनी धुव्वा उडवून विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. मिरपूर येथील सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत दिलेल्या २६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱया श्रीलंकेचा डाव १७० धावांत आटोपला. भारताचा अनमोलप्रित सिंग विजयाचा शिल्पकार ठरला. अनमोलप्रित याने  ७२ धावांची खेळी साकरली, तर सध्या दमदार फॉर्मात असलेल्या सरफराझ खान याने ५९ धावा ठोकल्या. वॉशिंग्टन सुंदर यानेही अप्रतिम खेळीचा नजराणा पेश करत ४३ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. पन्नास षटकांच्या अखेरीस भारताला ९ विकेट्सच्या मोबदल्यात २६७ धावा करता आल्या. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला केवळ १७० धावांपर्यंतच मजल मारता आली. श्रीलंकेकडून पी.मेंडिस(३९), शामू अशान(३८) यांना वगळता इतर कोणत्याही फलंदाजाचा खेळपट्टीवर निभाव लागला नाही. भारताकडून मयांक डागर याने भेदक गोलंदाजी करत ५.४ षटकांत २१ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या, तर आवेश खान याने ९ षटकांत ४१ धावा देऊन २ विकेट्स मिळवल्या. के.अहमद, राहुल बाथम आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. दरम्यान, दुसऱया उपांत्य फेरीत बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यात विजयी ठरणाऱया संघाची अंतिम फेरीत भारताशी लढत होईल.