परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे, पण तोलही जायला नको. करता येईल असं? स्ट्रेस मॅनेजमेंटच्या टिप्स देणाऱ्या गोष्टी दर आठवडय़ाला..

ससा आणि कासवाच्या शर्यतीची गोष्ट माहिती नसलेला कोणी असेल असं वाटत नाही. तो चपळ ससा, हळूहळू चालणारं कासव, ते सशाचं झाडाखाली गार वाऱ्यात डुलकी घेणं, आणि शेवटी आश्चर्यकारक रीतीनं कासवाचं जिंकणं! लहानपणी ही गोष्ट ऐकली की राघवला वाटायचं बरी अद्दल घडली सशाला! खरं तर तसं सशाशी शत्रुत्व घ्यायचं कारण नव्हतं, पण कासव हा त्या दोघांपैकी वीक असल्यामुळे राघवची सगळी सहानुभूती आपोआपच कासवाला मिळायची. स्वत:ला तो कासवाशी आयडेंटीफाय करायचा. राघवचा जन्म झाला तेव्हा त्याला आयसीयूत ठेवलं होतं. तेव्हापासून तो तसा नाजूक होता. हे अशक्त बाळ आईनं काचेच्या भांडय़ासारखं अलगद सांभाळलं होतं. या आपल्या अशक्तपणाची ढाल राघव नेहमीच वापरायचा. आई-बाबांना, बहिणीला इमोशनल ब्लॅकमेल करून आपल्या मनासारखं दान पदरात पडून घ्यायची ट्रिक तो लहानपणीच शिकला. खेळताना, अभ्यास करताना, प्रवासात, सगळीकडे आपल्याला स्पेशल वागणूक मिळावी अशी त्याची अपेक्षा असायची, नव्हे तो त्याला त्याचा हक्क वाटायचा. शाळेत असेपर्यंत ती तशी त्याला मिळालीही. लहानपणापासून त्याच्याबरोबर असणाऱ्या मित्रांना तशी सवय झाली होती.

पण राघव आता मोठा झालाय. नवीन कॉलेजमध्ये त्याच्या जुन्या मित्रांपैकी कोणी नाही. इथे सगळे आपापलं बघतात. हे असं इतरांसारखी सामान्य वागणूक मिळणं त्याच्या पचनी पडत नाहीये. सध्या राघवचा फोकस आपल्यातली कमतरता ओळखण्यापेक्षा इतरांमधल्या ताकदीचा तिरस्कार करण्याकडे आहे. आपल्यावर किती अन्याय होतो याचं तो चवीचवीनं वर्णन करत असतो. पण त्यामुळे तो अगदी एकटा पडलाय.

याचा नात्यांवरही परिणाम झालाच. राघवला मेघा खूप आवडली होती. त्यानं तिला प्रपोज केलं. सुरुवातीला राघवचं तिच्यावर अवलंबून राहणं, सारखी त्याची काळजी घेणं मेघानं एन्जॉय केलं, पण लवकरच ती कंटाळली. ‘नेहमी सगळं तुझ्या सोयीनेच कसं रे? माझा काहीच विचार करत नाहीस तू’, अशा कडवट वळणावर त्यांचं ब्रेक अप झालं. आपल्यावर सतत अन्याय होतो हा राघवचा समज या सगळ्यातून जास्तच पक्का झाला. ‘लाईफ इज नॉट फेअर!’ हे त्याचं घोषवाक्य बनलं.

आपल्यामधल्या कमतरतेचं भांडवल करणारे राघवसारखे हे लोक सतत इतरांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. स्वत:मध्येच ते इतके मश्गूल असतात की बाकीच्यांच्या आनंदाशी किंवा दु:खाशी त्यांना काही देणं-घेणं नसतं. एखादी गोष्ट जमली नाही, अपयश आलं की यांची कुरकुर सुरू होते, ब्लेम गेम सुरू होतो, तक्रार चालू होते. त्यामुळे ते कायमच बाकीच्यांवर ओझं बनून राहतात. इतरांचं काही भलं झालं की यांचा पोटशूळ उठतो. ईष्र्येने आणि मत्सराने त्यांचा जळफळाट होतो.

तुम्हाला नाही वाटत राघव खूप काही मिस करतोय असं? चॅलेन्जेस घेणं, त्यांच्यावर मात करण्यासाठी मनापासून लढणं, काही वेळा सणकून आपटी खाणं आणि त्यातूनही ताठ उभं राहणं हे किती इंटरेस्टिंग असतं! पण यातलं काहीच अनुभवत नाहीये तो. आयुष्य अगदी मिळमिळीत झालंय त्याचं. इतरांकडून अपेक्षा करता करता तो हे विसरलाय की त्याच्या जीवनाचा शिल्पकार तोच आहे. स्वत:च्या दु:खात तो इतका बुडालाय की वास्तवाला तोंड कसं द्यायचं असतं हेच विसरलाय. डोळ्यावरची झापड निघाल्याशिवाय त्याला हे वास्तव लख्ख दिसणार नाहीये. आणि ते दिसल्याशिवाय समोरचा योग्य मार्गही दिसणार नाहीये. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनीही आपापल्या डोळ्यांवरची मायाळू पट्टी काढायला हवी. कारण त्याला इतकं जपून आपण खरं तर त्याच्यावर अन्याय करतोय, त्याला खूप परावलंबी बनवतोय. ‘लाइफ इज नॉट फेअर’ हे जरी खरं असलं तरी ते सगळ्यांसाठीच तसं असतं, त्याच्या एकटय़ासाठी नव्हे.

एकापाठोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे राघव जेव्हा डिप्रेशनमध्ये जायला लागला तेव्हा त्याच्या बहिणीनं सूत्रं हातात घेतली. मोठय़ा मुश्किलीनं तिनं त्याला मानसोपचारतज्ज्ञाकडे जायला राजी केलं. तिथे दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्याने प्रथमच स्वत:कडे पाहिलं. आपण पुन्हा पुन्हा अपयशी का होतोय हा प्रश्न त्याने स्वत:ला विचारला आणि त्याची सुधारणेला सुरुवात झाली. आपली नजर इतरांविषयीच्या तक्रारींवरून काढून घेऊन आपल्या आत डोकावून बघण्यासाठी तो जेव्हा वापरायला लागला, तेव्हा जादू झाली! त्याला जगायला चक्क मजा यायला लागली! या नवीन, हसऱ्या, कुरकुर न करणाऱ्या राघवला पाहून आता सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसायला लागलाय.

viva@expressindia.com