पारंपरिक की आधुनिक या युद्धात मध्यमार्ग काढणं कित्येकदा अवघड होऊन बसतं. याच काळात लॅक्मेसारख्या मोठमोठय़ा फॅशन शोजचीही सुरुवात होते. त्यामुळे सणांच्या पाश्र्वभूमीवर मनात वाजणारं आधुनिक फॅशनचं गाणं रंगणार कसं? त्याचं उत्तर व्हिवाने थेट फॅशन डिझायनर्सकडूनच मिळवलंय..

सावन का महिना, फॅशन करे शोर.. अशी दरवर्षी आमची भावावस्था ठरलेली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. श्रावण महिन्यापासून सणावारांची सुरुवात होते. नटण्या-मुरडण्याची इतकी चांगली संधी हाताशी असताना घरच्या घरी पारंपरिक कपडे ठीक आहे. पण कुठे बाहेर जायचं झालंच तर पारंपरिक की आधुनिक या युद्धात मध्यमार्ग काढणं कित्येकदा अवघड होऊन बसतं. याच काळात लॅक्मेसारख्या मोठमोठय़ा फॅशन शोजचीही सुरुवात होते. त्यामुळे सणांच्या पाश्र्वभूमीवर मनात वाजणारं आधुनिक फॅशनचं गाणं रंगणार कसं? त्याचं उत्तर ‘व्हिवा’ने थेट फॅ शन डिझायनर्सकडूनच मिळवलंय..

प्रत्येक सणाला नाही जमलं तरी कोणत्या तरी सणावाराला आपण छान पारंपरिक कपडे घालतो, मस्त नटतो. पण असं प्रत्येक सणावाराला नटूनथटून जाता येत नाही. गणपती-नवरात्र-दिवाळी ओळीने येणाऱ्या या सणांमध्ये प्रत्येक दिवशी सुट्टी नसते. अशा वेळी पारंपरिक जड नक्षीकाम असलेले कपडे, दागिने असा साज रोज नाही करता येत. अशा वेळी पारंपरिक कपडय़ांनाच थोडा वेगळा लुक देण्याचा प्रयत्न करा, असा मंत्र प्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांनी दिला आहे. ‘उदाहरणार्थ साडी नेसण्यापेक्षा साडीचाच शिवलेला स्कर्ट तुम्ही घालू शकता. असा स्कर्ट आणि त्यावर एखादा कुर्ता छान दिसतो. त्याबरोबरच पलाझो, केप हे सध्या ट्रेण्डमध्ये आहे. अशा ट्रेण्डमध्ये असणाऱ्या कपडय़ांनाच मिक्स मॅच करून वापरले तर नक्कीच चांगली पारंपरिक परंतु हलकीफुलकी सहज वावरता येईल, अशी फॅशन आपण करू शकतो.’

आपल्याकडे उपलब्ध असणारे पारंपरिक ड्रेस, साडी याबद्दल आपण थोडा विचार करून मिक्स मॅच केलं तर आपल्याला नक्कीच अनेक नवीन आणि फॅशनेबल कपडे घालता येतील. याविषयी यंदा ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये ब्रायडल कलेक्शन सादर करणारा फॅशन डिझायनर नचिकेत बर्वे सांगतो की सणावाराला पारंपरिक कपडय़ांमध्ये आपण आपली क्रिएटिव्हिटी वापरून नक्कीच हटके लुक तयार करू शकतो. एखाद्या छानशा केप टॉपवर पलाझो किंवा स्कर्ट घालू शकता. सिम्पल कुर्तीवरसुद्धा पलाझो छान दिसते. क्रॅप टॉप व केप आणि पलाझो, लाँग स्कर्ट या गोष्टी पारंपरिक कपडय़ांमध्येही उपलब्ध आहेत. तुम्ही क्रॅप टॉपचा वापर ब्लाउज म्हणून पण करू शकता आणि त्यावर साडी पण नेसू शकता.’

क्रॅप टॉप आणि साडीसारखा हटके प्रयोग सोनम कपूर आणि तिची बहीण रिया कपूर यांनी त्यांच्या ‘रीझन (rheson)’ या लेबलमध्ये केला आहे. सण म्हणजे आजूबाजूला रंगीबेरंगी माहौल व सेलिब्रेशनची धामधूम, त्यात आपल्याला फुगे, पताके, फटाके अशा गोष्टी डोळ्यांना दिसतात. मग त्यातून गणपतीसारखे सण आले तर मोदक, पेढे, बर्फी यांची रेलचेल आपल्या आजूबाजूला असते. हाच सगळा माहौल लक्षात घेत या दोघा बहिणींनी ‘मिठाई कलेक्शन’ सादर केलं आहे. साधा देशी लुक आणि प्रिंटमधील ही आधुनिकता असा अनोखा मेळ त्यांनी यातून साधला आहे. सध्या त्यांचं हे ‘मिठाई कलेक्शन’ फार गाजतंय. त्यात लाडू, जिलेबी, काजू कतली, केशर-पिस्ता पेठे, बालूशाही, बुंदीचे लाडू अशा सगळ्या मिठाईच्या प्रतिमा लेहेंगा, कुर्ता, साडी, घागरा त्याचप्रमाणे कॅपस, क्रॅप टॉप, पलाझो, किमोनो यावर विविध प्रिन्ट्सच्या माध्यमातून आणत एक वेगळ्याच प्रकारचं कलेक्शन त्यांनी विकसित केलं आहे. मोतीचूर लाडवांचे प्रिंट्स असलेले म्हणजेच ‘मोतीचूर’ कॅप व कुर्ता हे सध्या चलतीत आहेत. मॉडर्न साध्या लुकसाठी मोतीचूर टी-शर्टही कॅ ज्युअल पण फेस्टिव्ह वेअर म्हणून तुम्ही वापरू शकता. एक वेगळा ट्राय म्हणून व वेगळ्या रंगातला नवा चॉइस हवा असेल तर ‘मोगरा पलाझो साडी’चाही देसी-मॉडर्न लुकसाठीही तुम्ही नक्की विचार करू शकता. त्यामुळे ऐन सणासुदीत देसी आणि क्लासी दोन्ही लुक सांभाळण्यासाठी हे मिठाई कलेक्शन शंभर टक्के फायदेशीर ठरणार आहे.

अशा वेळी खरं म्हणजे फक्त कपडय़ांचा विचार करून भागत नाही. त्या कपडय़ांबरोबर आपल्या चेहऱ्यावरचा मेकअप आणि अ‍ॅक्ससेरीजसुद्धा महत्त्वाच्या असतात. या संदर्भात लॅक्मे सलोनच्या सुषमा खान यांनी पारंपरिक कपडय़ांवर सिम्पल आय मेकअप हा खूप वेगळा लुक आणायला मदत करतो, असं सांगितलं. त्याचबरोबर ब्राइट रंगाची लिपस्टिक वापरणं महत्त्वाचं असतं. जास्त आणि भडक मेकअप न करता फक्त आय आणि लीप मेकअप पारंपरिक कपडय़ांवर शोभून दिसतो. पारंपरिक कपडय़ांचे रंग हे आधीच भडक असल्याने साधा मेकअप हाच उत्तम पर्याय आहे, असंही त्या म्हणाल्या. तर मेकअप करताना केसांची स्टाइलही तितकीच महत्त्वाची असते, असं लॅक्मेच्याच हीना दळवी यांनी सांगितलं. ‘तुमचे कपडे, त्यावरचं वर्क लक्षात घेऊन हेअरस्टाइल ठरवावी. मेकअपलाही तुमची हेअरस्टाइल मॅच झाली पाहिजे. साधारणपणे मेस्सी हेअर बन, खजूर वेणी किंवा पुढच्या बाजूने छान वेण्या बांधून पाठी पोनीटेल बांधणे, अशा सिम्पल हेअरस्टाइल्स पारंपरिक कपडय़ांवर खुलून दिसतात, असं त्यांनी स्पष्ट केलं. या टिप्सचा विचार करता तुम्हाला सणासुदीचा देशी आणि क्लासी लुक जमवणं फार अवघड जाणार नाही हे नक्की!

viva@expressindia.com