एके काळी धर्म वगैरे भ्रष्ट करणाऱ्या आणि लाखोंना बाटवणाऱ्या पावाने आता जवळपास प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात आपलं स्थान मिळवलं आहे. याच पावाचा किंबहुना दोन किंवा अधिक पावांचा वापर करून बनवण्यात येणारा पदार्थ म्हणजे सॅण्डविच! पार्ले स्थानकाच्या पश्चिमेला मिळणाऱ्या सॅण्डविचच्या विविध प्रकारांनी खाबूच्या जिव्हाक्षुधेला शांत केलं.

पावसाळा सुरू झाला की, खाबूला त्याच्या शाळेचे दिवस आठवतात. मुंबईतल्या कोणत्याही मुलासारखं खाबूचं बालपणही रम्य वगैरे कधीच नव्हतं. पण उन्हाळी सुट्टी संपल्यावर जो काही बरा-वाईट निकाल लागला असेल, त्या निकालाप्रमाणे खाबू वरच्या इयत्तेत जायचा. रीसतर नवीन दप्तर, पाटी-पेन्सिल, वही, कम्पासपेटी (ही दरवर्षी हरवायचीच), नवी-कोरी पुस्तकं आणि कोरा करकरीत रेनकोट किंवा छत्री यांची खरेदी व्हायची. त्यांच्या जोडीला लाल किंवा काळे गमबूट (उच्चारी गंबूट) घेतले जायचे. १३ किंवा १४ जूनला शाळा सुरू होण्याच्या सुमारासच पाऊस यायचा आणि भल्या सकाळी ढगांची काळोखी पसरली असताना खाबू मुकाटपणे शाळेची वाट चालायचा.
आज अनेक दिवसांनी खाबूला शाळेचे दिवस आठवण्यामागे केवळ पावसाळा हेच कारण नाही. कारण आहे, खाबूने नुकताच खाल्लेला एक पदार्थ! सॅण्डविच! आता सॅण्डविचचा आणि शाळेचा काय संबंध, असा प्रश्न पडेल. खाबू शाळेच्या डब्यात सॅण्डविच घेऊन जात असावा, असा अंदाजही काही जण बांधतील. पण तसं काहीच नाही. खाबूला सॅण्डविचमुळे शाळेची आठवण येण्याचं कारण म्हणजे गणित! आताचं माहीत नाही, पण खाबू शाळेत असताना गणिताचा तास खाबूसाठी एखाद्या दुर्दैवी आणि भयानक स्वप्नासारखा असायचा. त्यात पावकी, निमकी, अडीचकी वगैरे भानगडीही होत्या. तर अशीच एकदा पावकी म्हणताना खाबूने घोळ केला होता. ‘एक पाव- पाव, दोन पाव- अर्धा, तीन पाव- पाऊण’ या ऐवजी खाबू एकदा ‘दोन पाव- सॅण्डविच’ असं बोलता झाला आणि गणिताच्या बाईंनी खाबूचा हात आणि पट्टी यांच्यात कोणतंही ‘स्टफिंग’ न भरता खाबूच्या हाताचा बनपाव केला.
खाबूला ही आठवण झाली, याला कारण खाबूने नुकतंच पार्ले स्थानकाच्या पश्चिमेला खाल्लेलं एक सॅण्डविच! मुंबईतील असंख्य उपनगरांपैकी एकदम हायक्लास चेहरा असलेलं उपनगर म्हणजे विलेपार्ले. गिरगावनंतर मुंबईतील सांस्कृतिक हालचालींचं केंद्र म्हणजे विलेपार्ले! तसं लालबाग-परळ-दादर हा भागदेखील सांस्कृतिकदृष्टय़ा एकदम सजग भाग आहे. पण पाल्र्याचा लुत्फच निराळा! त्यातही पार्ले पूर्वेकडची तर गोष्टच काही औरच! अशा या पाल्र्यात खाबू काही कामानिमित्त गेला होता. खाबूचा गुर्जरमित्र चमन ढोकळाही बरोबर होता. काम झाल्यावर मग चमनने खाबूला ‘चोक्कस सॅण्डविच’ खायला घालतो असं सांगून पूर्वेकडून पश्चिमेला आणलं. पार्ले स्थानकावरील तो सुप्रसिद्ध मधला पूल चढला की, हा पूल पश्चिमेकडे थेट स्कायवॉकला जोडला आहे. या स्कायवॉकवरून चालायला सुरुवात केल्यावर १००-१५० मीटर अंतरावरच लगेच दोन बाजूंनी दोन जिने खाली उतरतात. या जिन्यांवरून खाली उतरलं की, पुलाखालीच लकी सॅण्डविच अ‍ॅण्ड पिझ्झा अशी पाटी असलेला एक स्टॉल दिसेल. इथेच उत्तम सॅण्डविच मिळतं.
आता सॅण्डविच काय, मुंबईत कुठेही मिळतं. अनेक ठिकाणची सॅण्डविचेस् फेमस आहेत, मग सॅण्डविच खायला पाल्र्यातच का कडमडायचं, हा प्रश्न अनेकांना पडू शकेल. काही वर्षांपूर्वी चर्चगेटला आकाशवाणीच्या इमारतीच्या खाली लागणाऱ्या सॅण्डविचच्या अनेक स्टॉल्सवरही उत्तम सॅण्डविच मिळायची. माटुंग्याचं शेवपुरी टोस्ट सॅण्डविचही एकदम प्रसिद्ध आहे. मग या सॅण्डविचची खासियत काय, असा प्रश्न उद्भवणं अगदी स्वाभाविक आहे. पण खाबूमोशायला चमन ढोकळ्याच्या चवीवर पूर्ण विश्वास होता, त्यामुळे खाबूने चमनला कोणताही प्रश्न न विचारता त्याला फॉलो केलं.
रमेश म्हात्रे आणि प्रदीप म्हात्रे हे लकी सॅण्डविच अ‍ॅण्ड पिझ्झा चालवतात. या सेंटरवर सॅण्डविच आणि पिझ्झाचे ४३ वेगवेगळे प्रकार मिळतात. यात साधा सॅण्डविच, चटणी सॅण्डविच, टोस्ट सॅण्डविच, ग्रिल सॅण्डविच, मसाला टोस्ट, चीज चिली टोस्ट, मसाला चीज टोस्ट, मसाला चीज ग्रिल, पनीर चीज ग्रिल अशा सॅण्डविचचा समावेश आहे. खाबू मोशायची वैयक्तिक आवड विचाराल, तर मसाला टोस्ट सॅण्डविच खाबूला खूप जास्त आवडलं. आता खवय्यांच्या दृष्टीने मसाला टोस्ट म्हणजे बच्चों के खानेकी चीज.. पण इथला मसाला टोस्ट खाल्ल्यानंतर याच सॅण्डविचवाल्याकडे येऊन पुन:पुन्हा हे सॅण्डविच खाण्याची इच्छा होते. इथे मैदा वगैरे पदार्थाना नाकं मुरडणाऱ्यांसाठी ब्राऊन ब्रेडमध्येही सॅण्डविच बनवून मिळतं.
खाबूने चमनच्या सांगण्यावरून गेल्या गेल्या मसाला टोस्ट ऑर्डर केलं. चमनने मसाला चीज ग्रिल मागवलं. स्टॉलवरच्या माणसाने दोन पावांना भरमसाट बटर, त्यावर हिरवी चटणी लावली. मग एका पावावर त्याने भाजीचा मसाला छान पसरला. त्यावर कांदा, टॉमेटो, बटाटा यांच्या चकत्या ठेवून त्यावर हलकेच मीठ, चाट मसाला यांचा शिडकाव केला. त्यानंतर दुसऱ्या पावाने हा सारा ऐवज झाकून लगेचच टोस्टरच्या पोटात टाकला. पाव छान भाजले गेल्यावर हे सॅण्डविच काढून रीतसर काप करून बटर आणि चटणी लावून खाबूपुढे ठेवले. खाबूने एक तुकडा तोंडात टाकून या मसाला सॅण्डविचमध्ये काय वेगळं आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. वेगळं नाही, काही तरी भन्नाट आहे, हे नक्की. पण ते काय आहे, याचं वर्णन शब्दात करणं शक्य नाही. पहिला तुकडा संपवून पुढला तुकडा तोंडात टाकण्यासाठी लागणाऱ्या वेळातही खाबू डोळे मिळून ती चव मनात घोळवत होता.
चित्रकलेचा आधार घेऊन सांगायचं, तर हे सॅण्डविच म्हणजे एखाद्या अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेण्टिंगसारखं आहे. ते छान आहे, सुंदर आहे. पण त्याचं सौंदर्य मसाल्याच्या नेमक्या कोणत्या घटकात दडलंय, या प्रश्नाचं उत्तर ज्याच्या त्याच्या आस्वादानुसार मिळेल. बटरची थोडीशी खारट, मसाल्याची छान तिखट, टोमॅटोची थोडीशी आंबट अशा सगळ्या चवी एकत्र येऊन त्यांचं अद्वैत झालंय. हे अद्वैत जिभेवर उतरलं की, ‘क्षेम देऊ गेले तव, मीची मी एकली..’, अशी अवस्था होते. म्हणजे पांडुरंगाला मिठी मारायला जावी आणि ती मिठी आपली आपल्यालाच पडावी, तसं हे सॅण्डविच जिभेवर आल्यावर विरघळून जातं आणि काही काळासाठी भान हरपतं.
पार्ले पश्चिमेला असलेल्या लकी सॅण्डविचकडलं मसाला टोस्ट खाल्लं आणि खाबूला लहानपणी पावकी म्हणताना खाल्लेल्या माराबद्दल अभिमान वाटला. आता खाबूने नवीन पावकी सुरू केली आहे.. ‘एक पाव- बुडवून खा, दोन पाव- सॅण्डविच, तीन पाव- ग्रील सॅण्डविच..’!!!

Nashik, Girl died falling into bucket,
नाशिक : पाण्याच्या बादलीत पडून बालिकेचा मृत्यू
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल
Loksatta chavdi happening in Maharashtra politics news on Maharashtra political crisis
चावडी: नाना अन् तात्याचे पारावर उपोषण!
forecast to rain along with wind in most parts of the state
गुढीपाडव्याला हलक्या सरी?

कुठे : लकी सॅण्डविच सेंटर
कसे जाल : पार्ले स्थानकात उतरलं की, मधला ब्रिज चढून पश्चिमेला बाहेर पडा. खाली उतरलात, तर स्कायवॉकच्या खालून स्टेशनच्या विरुद्ध दिशेला चालायला सुरुवात करा. साधारण दोन मिनिटं चालल्यावर डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंना एक रस्ता जाताना दिसेल. त्या चौकातच उजव्या बाजूला पुलाखाली हे सेंटर आहे.

– खाबू मोशाय