हिवाळ्यातल्या लेटेस्ट फॅशनचा थोडक्यात आढावा..

स्वेटर : हाताने किंवा मशीनवर विणलेला लोकरीचा स्वेटर हा पूर्वी थंडीचा एकमेव साथी होता; पण स्वेटरच्या जागी आता त्याचे हुडीज, झिपर्स, स्वेटशर्ट्स अनेक भाईबंद दाखल झाले आहेत. झिपर्स या नावाने काही काळापासून लोकरीचेच पण विणकाम न केलेले उबदार स्वेटर बाजारात उपलब्ध आहेत. सिंगल कलरपासून ते वेगवेगळ्या रंगांतील झिपर्स स्वेटरचा नवीन अवतार आहेत.

श्रग : मुलींसाठी निटेड वेअरमध्ये श्रग आघाडीवर आहे. वेगवेगळ्या कापडांच्या प्रकारांत वेगवेगळे साइझ, कलर्स, डिझाइनमध्ये श्रग बाजारात आहेत. कुठलाही कुर्ता अथवा वेस्टर्न टॉपवर सुंदर लेअरिंग अ‍ॅक्सेसरी म्हणून श्रग सहज घालू शकतो. श्रगची पुढील बाजू उघडी असते. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत नव्हे तर गुलाबी थंडीत फॅशनेबल राहण्यासाठी श्रगचा वापर करू शकतो.

जॅकेट : लेदर जॅकेट हे जगातलं मोस्ट फॅशनेबल गारमेंट आहे. लेदर जॅकेट मुलांसोबतच मुलींच्या वॉर्डरोबमध्येसुद्धा हमखास दिसतात. डॅशिंग, कुल लुकसोबत थंडीपासून बचाव करण्यासाठी  वेगवेगळ्या कट्सची, कॉलरची ही जॅकेट्स सहज उपलब्ध होतात. लेदरखेरीज वूलन आणि पॉलिएस्टरचे ब्लेण्ड केलेली जॅकेटसुद्धा डेनिम्ससोबत सुंदर दिसतात. कडाक्याच्या थंडीत वूलन ब्लेंडची जाड जॅकेट्स, तर कमी थंडीसाठी थोडी पातळ, पॉलिएस्टर ब्लेंड जॅकेट्स असे अनेक पर्याय असतात. विंडचिटरची फॅशन मात्र यंदाच्या थंडीत फार नाही.

निटेड टीशर्ट : वूलन ब्लेंडचे टीशर्ट, निटेड शर्ट्स थंडीतला उबदार पर्याय. हे टीशर्ट सिंपल पण उठावदार लुक देतात. नेहमीच्या डार्क शेड्सच्या स्वेटर्सऐवजी व्हायब्रंट पिंक, ग्रीन, यलो अशा रंगांमध्ये हे खुलून दिसतात. हल्ली वेगवेगळ्या प्रिंट्समध्येही निटेड वेअर उपलब्ध आहे. पोलो नेक टी-शर्ट कधीच आऊट ऑफ फॅशन होत नाहीत आणि त्याचा वापर थंडीत निश्चितच फायद्याचा ठरतो.

कॅप्स : इतर कुठल्याही सीझनमध्ये वापरता येणार नाही, अशी ही अ‍ॅक्सेसरी.. वुलन कॅप्स हल्ली बऱ्याच फॅशनेबल झाल्या आहेत. नुसत्या लोकरीच्या कॅप्सपेक्षा निटेड वूलन ब्लेंडच्या कॅप्समध्ये बरीच व्हरायटी आली आहे.

स्टोल किंवा स्कार्फ : थंडीत कपडय़ांच्या लेअरिंगसाठी अत्यावश्यक आणि उत्तम पर्याय म्हणजे स्टोल किंवा स्कार्फ. थंडीत कुठल्याही कपडय़ांवर – वेस्टर्न किंवा एथनिक फ्युजन वेगवेगळ्या रंगांचे, प्रिंट असलेले स्टोल्स वापरता येतील. स्कार्फ नुसता डोक्याला आणि कानाला गुंडाळण्यासाठी नसून थोडा कलात्मक वापर केल्यास स्कार्फ स्टाइलिश लुक नक्कीच देईल. गळ्याभोवती वेगवेगळ्या प्रकारे बांधून स्कार्फ परिपूर्ण लुक देऊ शकतो. गोंडय़ांनी सजवलेले स्कार्फ सध्याचा लेटेस्ट ट्रेण्ड आहे.