सुवर्णपदक विजेती तात्याना

द्विशाखी कंटकासह (स्पाइना बिफिडा) जन्मलेल्या रशियाच्या तात्याना मॅकफॅड्डेनचा प्रवासही प्रेरणादायी आहे. पाठीच्या कण्यातील गॅपमुळे तिच्या कंबरेखालच्या भागात काहीच संवेदना जाणवत नव्हत्या. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे तिच्यासाठी व्हीलचेअर विकत घेणेही तिच्या कुटुंबीयांना परवडणारे नव्हते, शेवटी त्यांनी तिला अनाथाश्रमात टाकले. व्हीलचेअरविना सहा वष्रे तिने अनाथाश्रमात घालवली. कंबरेखालचा भाग पूर्णत: निकामी झालेल्या तात्यानाला फारशी हालचाल करता येत नव्हती, तरीही ती इतर मुलांच्या मदतीने 8चालणे शिकली. १९९४ मध्ये अमेरिकेतील आरोग्य विभागाचे आयुक्त देबोराह मॅकफॅड्डेन अनाथाश्रमात आले असता त्यांनी तात्यानाला दत्तक घेतले. त्यानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली, तिला व्हीलचेअर देण्यात आली आणि तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली. पण, खेळाडू बनण्याचा तिचा मार्ग सोपा नव्हता. शारीरिक तंदुरुस्तीसोबतच अनेक अडचणींवर मात करत ती क्रीडा क्षेत्राकडे वळली. बास्केटबॉल, जलतरण, आईस हॉकी, स्कुबा डायव्हिंग आदी क्रीडा प्रकारात नशीब आजमावण्याचा तिने प्रयत्न केला. मात्र, ती व्हीलचेअर शर्यतीच्या प्रेमात पडली. २००४ च्या अ‍ॅथेन्स पॅरालिम्पिक स्पध्रेत तिने प्रथम सहभाग घेतला. त्यावेळी अमेरिकी संघातील सर्वात तरुण खेळाडू होती. दोन पदकांसह ती मायदेशी परतली. पुढील दोन वर्षांत तिने विश्व अजिंक्यपद स्पध्रेत १०० मीटर शर्यतीत विश्वविक्रमाची नोंद करत सुवर्णपदक जिंकले. तिची पदकांची भूक वाढत गेली. २००८ आणि २०१२च्या पॅरालिम्पिक स्पध्रेत त्याची प्रचीती आली. तर २०१३च्या विश्व अजिंक्यपद स्पध्रेत तिने चक्क सहा सुवर्णपदकं जिंकून इतिहास घडविला. रिओ पॅरालिम्पिक स्पध्रेत तात्यानाने महिलांच्या ‘टी ५४’ – ५००० मीटर शर्यतीत ११ मिनिटे ५४.०७ सेंकदाची विक्रमी वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले. ४ बाय ४०० मीटर टी ५३/५४ रिले प्रकारातही तिने अमेरिकेला रौप्यपदक जिंकून देण्यात सहकार्य केले. कुटुंबाने नाकारलेल्या तात्यानाला आज जगाने आपलंसं केलं आहे, ते तिने स्वकर्तृत्वावर मिळवलंय.

 

 

सुवर्णपदक विजेती मालरेन

नेदरलँड्सच्या मार्लोन व्हॅन ऱ्हीजनला जन्मजात दोन्ही तळपाय नव्हते. ब्लेड वुमन म्हणून प्रसिद्ध असलेल्या या खेळाडूने पॅरालिम्पिक स्पधेच्या २०० मीटर ‘टी ४४’ प्रकारात लंडन पाठोपाठ रिओतही जेतेपद पटकावून इतिहास घडविला. २००९ मध्ये तिने जलतरण स्पर्धामध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. तिने जागतिक तसेच युरोपियन स्पध्रेत अनेक जेतेपदही जिंकली आहेत. तसेच तिच्या नावावर राष्ट्रीय विक्रमांचीही नोंद आहे. मात्र, जलतरण क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन मिळत नसल्याने तिने धावपटू बनण्याचा निर्णय घेतला. २०१० मध्ये तिने अ‍ॅथलेटिक्समध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. पहिल्याच पॅरालिम्पिक स्पध्रेत तिने २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले, तर १०० मीटर प्रकारात तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

 

 

सर्वाधिक वयस्कर खेळाडू एलिझाबेथ कोस्मॅला

वय वष्रे ७४. पॅरालिम्पिक स्पर्धा १२.

९ सुवर्णपदकांसह १३ पदके, ऑस्ट्रेलियाच्या नेमबाज एलिझाबेथ कोस्मॅलांची ही झेप. पॅरालिम्पिक स्पध्रेत सर्वाधिक वयस्कर खेळाडूचा मान त्यांनी पटकावला आहे. कंबरेखालच्या भागाची हालचाल करू न शकणाऱ्या एलिझाबेथ यांनी १९७२ च्या पॅरालिम्पिक स्पध्रेत जलतरण प्रकारातून पदार्पण केले. त्यानंतर नेमबाजीकडे वळत त्यांनी पदकांचा पाऊस पाडला. एलिजाबेथ रिओत पदक जिंकण्यासाठी प्रयत्नशील होत्या. मात्र, त्यांना यंदा अपयश आले.

 

 

सुवर्ण-कांस्यपदक विजेती एलिझाबेथ मार्क

अमेरिकेच्या सैन्यदलात कार्यरत असलेल्या एलिझाबेथ मार्कला इराक दौऱ्यावर असताना गंभीर दुखापत झाली. वयाच्या २५व्या वर्षी झालेल्या या दुखापतीत तिच्या नितंबाला गंभीर जखम झाली आणि १८ महिन्यांत तिच्यावर चार शस्त्रक्रिया झाल्या. मृत्यूच्या जबडय़ातून परतलेल्या या खेळाडूने जलतरणामध्ये दबदबा निर्माण केला. अमेरिकेतील ऑलिम्पिक समितीने जानेवारी महिन्यात पार पडलेल्या पॅरालिम्पिक जलतरण राष्ट्रीय संघात मार्कचा समावेश केला. रिओ पॅरालिम्पिक स्पध्रेसाठी निवडण्यात आलेल्या अकरा खेळाडूंमध्ये तिचा समावेश करून तिला प्रशिक्षण देण्यात आले. सरावादरम्यान तिने आपले सैन्यातील कर्तव्यही बजावले. सुरुवातीला तरणतलावात सराव करताना तिला प्रचंड वेदना होत असत, परंतु न खचता तिने टप्प्या टप्प्याने आपला सराव सुरूच ठेवला. ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारातील विश्वविक्रम मार्कच्या नावावर आहे, तसेच अमेरिकन आणि पॅन अमेरिकन २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकचा विक्रमही (३:१७.८९) तिने मोडला. जागतिक क्रमवारीत १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात ती अव्वल स्थानावर आहे. कर्तव्यावर असताना झालेल्या अपघाताविषयी चर्चा करणे तिला आवडत नाही. देशसेवेत आलेले अपंगत्व तिने हसून स्वीकारले आहे आणि अजूनही ती देशसेवेसाठी तत्पर असते. रिओ पॅरालिम्पिक स्पध्रेत १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक एसबी७ प्रकारात तिने सुवर्णपदक पटकावले, तर ४ बाय १०० मीटर रिले प्रकारात कांस्यपदक जिंकले ते तिच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर.