आपल्या सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन असतो. त्यावर भसाभस फोटो काढले जातात. ते टपाटप अपलोडही होतात. त्याला लाइक्स मिळतात पण ते आपलं करिअर नसतं. राहुल वंगानीच्या बाबतीत मात्र तसं नाही. त्याची कथा जाणून घेऊ या आजच्या कल्लाकारमधून. फोटोग्राफी आणि सोशल मीडियाच्या आवडीलाच राहुलने त्याचं करिअर बनवलं आहे.

पदवीधर झाल्यानंतर पहिली नोकरी लागली. पहिल्या पगारातून राहुलने एक झक्कास स्मार्टफोन घेतला. उत्तम कॅमेरा असलेल्या या फोनमधून तो रोज किमान ४०-५० फोटो काढायचा. कधी कधी जास्तही. वीकएंडला ही संख्या १००च्या घरात जायची. त्यात तो निरनिराळे प्रयोगही करायचा. वर्षभरात एमबीए करण्यासाठी त्याने नोकरी सोडली. पण फोटोग्राफी सुरूच होती. एमबीएचा अभ्यास आणि फोटोग्राफीतलं कौशल्य त्याने एकत्रच मिळवलं. त्यानंतर त्याने पुन्हा नोकरी केलीच पण त्यात त्याचं मन रमलंच नाही. मग एक दिवस त्याने चक्क नोकरीला रामराम ठोकला आणि सोशल मीडियावरच्या फोटोविश्वात निघाला.

त्याच्या  @rahul_vangani या इन्स्टाग्राम अकाऊंटचे २२,५०० फॉलोअर्स आहेत. तो सांगतो की,  इन्स्टाग्रामवर अनेकांचं काम पाहायला मिळतं, कल्पना सुचतात. एमबीए करतानाच मला ‘हाऊसिंग डॉट कॉम’ची पहिली असाइनमेंट मिळाली. त्यांनी माझे काही फोटो इन्स्टावर पाहिले होते. त्यांना मुंबईतल्या काही इमारतींचे फोटो हवे होते. दृश्यापलीकडचं दृश्य दाखवण्याकडे माझा भर असतो. त्यामुळे त्यांनाही माझं काम आवडलं आणि मला आणखी असाइनमेंट्स मिळाल्या. इन्स्टावरचे मी काढलेले काही फोटो व्हायरल झाले. उदा. गेटवे ऑफ इंडियाचा.

राहुलचं हे फोटोग्राफीचं वेड त्याच्या आईवडिलांच्या  फारसं पचनी पडलं नव्हतं. त्याने शिक्षण पूर्ण करावं, ही त्यांची इच्छा होती. कारण फोटोग्राफीने पोट कसं भरणार, असा त्यांचा प्रश्न होता. हळूहळू त्याला काम मिळू लागल्यावर त्यांना त्याचं कौशल्यही समजलं आणि कौतूकही वाटू लागलं. त्यांनी फोटोग्राफीचं शिक्षण घेण्याचीही परवानगी राहुलला दिली. मात्र  फोटो काढणं, हाच माझा सराव होता. सर्जनशीलता माझ्याकडे आधीपासूनच होती, असं तो म्हणतो.

राहुलने आजवर अ‍ॅमेझॉन, हाऊसिंग डॉट कॉम, मॅकडोनाल्ड आदी ब्रॅण्डसोबत काम केलं आहे. अनेकांचे पोर्टफोलिओ केले आहे. लग्नाचे फोटो, इंटिरिअर, आऊटडोअरपासून ते प्रोडक्ट फोटोग्राफीपर्यंत अनेक गोष्टी त्याने केल्या आहेत. इन्स्टाच्या त्याच्या अकाऊंटवर त्याने निरनिराळे प्रयोगही केले आहेत. एकदा त्याच्या मित्राने १६० किलोवरून ९० किलोवर वजन आणलं, त्याची गोष्ट राहुलने इन्स्टावरून फीचर पोस्ट केली. त्याच वेळी या मित्राने इराणी कॅफेचं चायनीज रेस्तराँमध्ये कसं रूपांतर केलं, तेही दाखवलं. जे लोकांना फार आवडलं. एका असाइनमेंट्ससाठी राहुलला आनंदी चेहरे टिपायचे होते. त्यावेळी त्याने टिपलेला एक फोटो अफलातून होता. त्याच्या नात्यातल्याच एकीचा फोटो तो काढत होता पण ती ते टाळत होती हसत हसत पळत होती, तोच क्षण त्याने फोटोतून पकडला. आणि तो फोटो हिट ठरला.

राहुल जरी सोशल मीडियावर काम करीत असला तरी फोटो कोणत्या साधनासाठी आहे, याचा विचार तो करत नाही. उदा. मासिक, वृत्तपत्र का आणखी काही. तर त्या फोटोचा वापर कोणत्या कारणासाठी करायचा आहे, याचा तो विचार करतो. गेल्या वर्षी ‘गो प्रो’ ही कंपनी व्यवसाय विस्तारासाठी भारतात आली होती. त्यांच्यासाठी तो आता इन्फ्लुएंझर म्हणून काम करतो. त्यांची प्रोडक्ट वापरून त्याविषयी समाजमाध्यमात लिहितो. या कंपनीच्या कार्यक्रमासाठी त्याला रजा हवी होती. पण ती मिळत नव्हती. शेवटी त्याने नोकरी सोडण्याची धमकी दिली, तेव्हा कुठे त्याला रजा मिळाली. ‘गो प्रो’साठीच्या या कामातून अमेरिकन निर्मात्यांचा दृष्टिकोन त्याला समजून घेता आला.

स्वत:चे २२ हजारावर फॉलोअर्स असले तरी राहुल इतरही अनेकांच्या पोस्ट पाहत असतो. अनेक इन्स्टा पोस्टमधून मला काही तरी नवे गवसते, असे तो म्हणतो.महेश थापा या लॅण्डस्केप फोटोग्राफरना राहुल गुरू मानतो. त्याला आता स्वत:ची वेबसाइट, ट्रॅव्हल ब्लॉगिंग सुरू  करायचे आहे.

सोशल मीडियाच्या प्रभावामुळे लोक नवे तंत्रज्ञान, ट्रेण्ड्स लगेच फॉलो करतात. इथे प्रचंड लोकप्रियता आणि आपली कला अनेकांपर्यंत पोहोचवायची संधी मिळते. पण त्याच्या वापराची सीमारेषा आपणच आखायला हवी. त्यापलीकडे वास्तवातले जग आहे,  याची जाणीव ठेवायलाच हवी, असे तो सांगतो.

viva@expressindia.com