सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट

प्रे फॉर पॅरिस..
पॅरिसमधील कॅफे, कॉन्सर्ट हॉल आणि नॅशनल स्टेडियमसह सात ठिकाणी ‘आयसिस’च्या अतिरेक्यांनी भीषण आत्मघातकी हल्ले चढवून गोळीबार आणि बॉम्बहल्ला केला. सोशल मीडियावर या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. #प्रे फॉर पॅरिस, #पॅरिस, #आयसिस हे हॅशटॅग सोशल मीडियावर टॉप ट्रेण्डिंगमध्ये होते. आयफेल टॉवरचं प्रतीकात्मक रेखाटन आणि फोटो अपलोड केले गेले. #ओपन डोअर हा हॅशटॅग सोशल मीडियावर झळकल्यावर हल्लय़ात अडकलेल्यांना नि पॅरिसमध्ये राहायची सोय नसलेल्यांना पॅरिसकरांनी रात्रीचा आसरा दिला. सोशल मीडियावरून प्रथम या हल्ल्याची बातमी बाहेर आली. फेसबुकवर ‘वी आर सेफ’ असं फेसबुकवर मार्क करून पॅरिसकरांनी आप्तेष्टांना तातडीनं माहिती दिली. त्यानंतर ‘फेसबुक’वर ‘चेंज युवर प्रोफाइल पिक टू सपोर्ट फ्रान्स अ‍ॅण्ड द पीपल ऑफ पॅरिस’ अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नि त्याचा वापर अनेक फेसबुककरांनी केला. या घटनेदरम्यान ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय देणारा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या हल्ल्यात सापडलेला सिल्वेस्टर मोबाइलमुळं कसा वाचला, त्याचं वर्णन या व्हिडीओत करण्यात आलंय. या घटनेमागच्या कारणांचं, इतिहासाचं आणि राजकीय गणितांचं सखोल चर्वितचर्वण नेटकरांनी केलं.

युवराज क्लीन बोल्ड
अनेकींच्या ‘दिलों की धडकन’ ठरलेल्या युवराज सिंगच्या एंगेजमेंटची चर्चा सोशल मीडियावर न होती तरच नवल. त्यामुळे #युवराज सिंग नि #हेजल कीच हे हॅशटॅग चर्चेत होते. बालीमध्ये युवराजची बॉलीवूडची अभिनेत्री हेजल कीचसोबत एंगेजमेंट झालेय. त्यांच्या रिलेशनशिपची अनेक दिवसांपासून चर्चा होत होतीच. त्यानिमित्तानं युवराजच्या आतापर्यंतच्या मैत्रिणी आणि त्यांच्या रिलेशनचीही नेटकरांनी गोळाबेरीज केली.

कर्नाटकी वाद
म्हैसूरचा राजा टिपू सुलतानाच्या जयंतीवरून सुरू झालेला वाद वाढून प्रसिद्ध नाटककार गिरीश कर्नाड यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. हा सगळा वाद सोशल मीडियावरच जास्त झाला. कर्नाटक सरकारनं टिपू सुलतानची जयंती साजरी केली होती. टिपूचं साम्राज्य धर्म आणि कन्नडविरोधी असल्याचा आरोप करून भाजपनं या कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. या कार्यक्रमात गिरीश कर्नाडांनी ‘टिपू सुलतान हिंदू असता, तर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणं सन्मान मिळाला असतं’, असं मत व्यक्त केलं होतं. ‘बंगळुरूजवळच्या देवनहळ्ळी विमानतळाला केम्पेगौडा यांचं नाव देण्याऐवजी टिपू सुलतानाचं नाव देणं योग्य ठरलं असतं’, असं मत त्यांनी व्यक्त केलं. कर्नाड यांना ट्विटरवरून ‘कन्नड लेखक एम. एम. कलबुर्गी यांची अवस्था करण्यात आली, तशीच अवस्था कर्नाड यांची करण्यात येईल’, अशी धमकी देण्यात आली होती. या धमकीनंतर कर्नाडांच्या विधानावर टीकेचा भडिमार सुरू झाल्यानंतर त्यांनी माफी मागत पोलिसांकडं तक्रार दाखल केली.

दिलवाले नि नटसम्राट
‘दिल तो सभी के पास होता हैं.. लेकिन सब दिलवाले नही होते’, असं म्हणत ‘राज’ पुन्हा एकदा ‘सिमरन’चं मन जिंकण्यास सज्ज झालाय. शाहरुख खान आणि काजोल या रोमँटिक जोडीचा ‘दिलवाले’ या आगामी चित्रपटाच्या धडाकेबाज ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळाला. अवघ्या दोन दिवसांत या ट्रेलरनं ‘यू टय़ूब’वर ७७ लाख ५६ हजार हिट्सचा टप्पा ओलांडला होता. ‘दिलवाले’ मनोरंजन, अ‍ॅक्शन, रोमान्स आणि ड्रामाबाज असल्याचं दिसतंय.
वि. वा. शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’ या गाजलेल्या साहित्यकृतीवर आधारलेल्या ‘नटसम्राट’ चित्रपटाचा टिझर रीलीज झालाय. नाना पाटेकरांनी उभा केलेला ‘नटसम्राट’ यातून दिसतोय. त्यामुळं ‘घर देता का कुणी घर’सारखे नाटकात गाजलेले संवाद चित्रपटात कसे असतील, याची उत्सुकता प्रेक्षकांना वाटू लागलेय.

मॅगी परतली
‘वाट चुकलेला माणूस घरीच परततो’, या उक्तीनुसार पाच महिन्यांच्या विरहानंतर असंख्य मॅगीप्रेमींना तिचं दर्शन एकदाचं झालं. मग त्याबद्दलचे अपडेट्स इन्स्टाग्रामसह सोशल मीडियावरून दिले गेले. हाती पडलेल्या मॅगीचं पॅकेट स्वतोंडी घालण्याआधी तिचे फोटो काढून अन्य मॅगीप्रेमी मित्रांना जळवण्याचे उद्योगही काहींनी केले. काहींनी ऑनलाइन ऑर्डरचे अपडेट्स देत भाव खात खात मॅगी मटकावली. स्नॅपडील या ऑनलाइन शॉपिंग साइटवर मॅगीच्या तब्बल ६० हजार वेलकम किट्स अवघ्या पाच मिनिटांत विकल्या गेल्याचं जाहीर झालं. मॅगीची डझनभर पाकिटं, २०१६ चं मॅगी कॅलेंडर, मॅगी फ्रिज मॅग्नेट, मॅगी पोस्टकार्ड आणि वेलकम बॅकचं पत्र, असं हे मॅगीचं किट आहे.

बाहुबलीची ती..
तेलुगू सुपरस्टार प्रभासच्या लग्नाच्या अफवांनी सध्या जोर धरलाय. त्यातच त्याच्या भावी पत्नीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. प्रभास गोदावरीशी लग्न करणार असून ती बी.टेक. झाल्येय, त्यांच्या पालकांनी लग्नाची तयारी सुरू केल्येय अशा प्रकारच्या अफवा उठताहेत, तर त्याच्या मित्रांनी हा फोटो फेक असल्याचं सांगितलंय. काहींचं म्हणणं असं की, हा फोटो अभिनेत्री प्रिया लालचा आहे. प्रभास तर सध्या फक्त ‘बाहुबली २’च्या शूटिंगमध्ये सॉलिड बिझी आहे. खरंखोटं तो प्रभासच जाणे..

फॉरवर्डेड
दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळलेल्या जीवांसाठी ही झणझणीत शाब्दिक डिश- वडापाव स्तोत्र
गोलाकारं तबकशयनम् स्वर्णर्वण खमंगम्। पावयुक्तं चटणिसहितम् सर्वभि: खादितव्यम्। क्षुधाशांतं उदरभरणम् पुनर्खाद्यभिलाषम्। वंदे तुभ्यं वडापावम् सर्वखाद्यधिराजम्।

ग्रुप मेंबर्ससाठी दिवाळीचा अभ्यास
निबंध लिहा.
१) जान्हवीला बाळ झालं तर..
२) जय आणि आदितीची आत्मकथा
३) नरेंद्र मोदी एक फिरता नेता
योग्य शब्द निवडा
काहीही हा ..
१) पिंटय़ा; २) जय; ३) श्री
चखरा नखरा चखरा नखरा..
१) कमळाबाई; २) शांताबाई; ३) जान्हवीची आई
चला कामाला लागा..
१) नवरे; २) मांगले; ३) भाऊ कदम
जान्हवीचे बाबा गुढघ्याला कोणतं तेल लावतात..
१) खोबरेल तेल; २) गोडेतेल; ३) वाटिका
एका वाक्यात उत्तरं
१) नरेंद्र मोदी आता कोणत्या दौऱ्यावर आहेत?
२) वच्छी आत्या कोणती कामं करते?
३) पिंटय़ाला कुणाचा सासुरवास आहे?
व्याकरण काळ ओळखा.
१. जान्हवीला मुलगा झाल्यावर त्याचं नाव बाहुबली ठेवणार.
१) भूतकाळ २) भविष्यकाळ
२. शांताराम आणि शांताबाई हे नवराबायको आहेत.
१) वर्तमानकाळ, २) भूतकाळ

व्हच्र्युअल बालदिन
बालदिनाच्या भावुक, आगाऊ शुभेच्छांची देवघेव, पेपरबोटचा मोठेपणीही बालपण डोकावणारा व्हिडीओ शेअर करून, सोशल मीडियावर झळकलेले लहानपणाचे फोटो आणि If I could create something for India, it would be…. या संकल्पनेवर आधारित गुगल डुडल्स असा १४ नोव्हेंबर व्हच्र्युअली सेलिब्रेट केला गेला.

वयाने मोठय़ा झालेल्या आणि आयुष्यात जबाबदारीची विविध मोठी पदं भूषविणाऱ्या, पण मनात मात्र तोच खोडकरपणा जपून ठेवणाऱ्या या ग्रुपमधील सर्व बालांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

‘बाल’ दिवस की हार्दिक शुभकामनाएं.. आपके बाल काले, घने और लम्बे हो.. – आलिया भट्ट.
आज कितने भी महंगे जूते पहन लो, लेकिन वैसी फीलिंग नहीं आती, जैसी बचपन में ‘पुचु-पुचु’वाले जूते पहनकर आती थी.. happy children’s day
गंजो को छोडम्कर सभी को बाल दिवस की शुभकामनाए..

राधिका कुंटे – viva.loksatta@gmail.com