वेबविश्व असो किंवा मालिका, सिनेमा यातून नव्या चेहऱ्यांनाच प्राधान्य मिळतंय. कारण सगळीकडे सध्या एकाच ब्रँडची चलती आहे, तो म्हणजे तरुणाई.

डिजिटल माध्यमांमध्ये एकता क पूरसारखे अनेक दिग्गज नव्याने शिरकाव करतायेत. तिथेही राम कपूर – साक्षी तन्वरसारखे आपले हुकमी एक्के ती खेळवू पाहतेय. मात्र वेबविश्वाचा चेहरा कोण, असा जेव्हा प्रश्न येतो. तेव्हा तरुणाईच्या तोंडी सध्या त्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या अमोल पराशर या तरुण कलाकाराचं नाव चटकन येतं. कधी तरी सहज प्रयोग म्हणून डिजिटल माध्यमात उतरलेली मिथिला पालकर आज नायिका म्हणून रुपेरी पडद्यावर दिसते आहे. अमेय वाघ हे नाव तर मालिका, नाटक, चित्रपट आणि डिजिटल चौफे र चर्चेत आहे. ‘सैराट’मधून परशा म्हणून लोकप्रिय ठरलेला आकाश ठोसर ‘एफयु’सारख्या मोठय़ा चित्रपटातून नायक म्हणून समोर येतो आहे. गेल्या वर्षां-दीड वर्षांत माध्यमांमध्ये ‘ब्रॅण्ड तरुणाई’ हिट ठरतेय. नेहमीचे तेच तेच यशस्वी चेहरे बाजूला सारून प्रेक्षकांनीही नव्याची नवलाई आपलीशी केली आहे. आपल्या कलेच्या जोरावर या तरुणाईने माध्यमांना आपल्या कवेत घेतलं आहे.

तरुण पिढीला सतत बदल हवा असतो. मग तो कामात असू दे किंवा मनोरंजनात! जुन्या गोष्टी बाजूला सारून स्वत:चे नवीन प्रयोग करायला तरुण पिढी उत्सुक असते. मनोरंजनाच्या क्षेत्रातही जुन्या कथा, जुन्या संकल्पना किंवा चित्रीकरणाच्या जुन्या पद्धतींना त्यांनी फाटा दिला. डिजिटल क्षेत्राचा विस्तार होतो आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा तिथे वळवला. ‘कास्टिंग काऊ च’सारख्या आगळ्यावेगळ्या संकल्पना दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी-अमेय वाघ या जोडगोळीने आणल्या. त्यालाही लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतून गाजलेल्या तरुण मंडळींनी आज रंगभूमीवरही ‘अमर फोटो स्टुडिओ’च्या माध्यमातून हंगामा केला आहे. टेलीव्हिजनवर तर प्रत्येक नव्या मालिकेबरोबर दोन नवीन चेहरे प्रेक्षकांसमोर येत आहेत. तेच लोण आता चित्रपटांपर्यंतही पोहोचलं आहे. ‘बालक-पालक’सारख्या चित्रपटातून लहान मुलं म्हणून समोर आलेले मदन देवधरसारखे चेहरे आता ‘फुंतरू’सारख्या चित्रपटातून नायक म्हणून समोर आलेत. मालिकांच्या माध्यमातून ‘हिट’ ठरलेले नवीन चेहरेही चित्रपटात येतायेत. मात्र आपल्यातील प्रतिभा सिद्ध करणं आणि प्रतिमा निर्माण करणं हे आव्हान त्यांच्यासमोर आहे. आणि त्यासाठी प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी काही वेगळं आणि नवीन देण्याचा प्रयत्न करतोय.

प्रत्येक चित्रपटात केवळ नवीन आणि टिपिकल स्टार मटेरियलच्या चौकटीच्या बाहेर जाणारे कलाकार घेऊन नागराज मंजुळेंनी अनेक नवीन चेहरे इंडस्ट्रीला दिले आणि एक नवीन पायंडा पाडला. नवीन कलाकारही आव्हानात्मक भूमिका किती अचूकपणे पेलतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘काकस्पर्श’मधली छोटीशी असली तरी वेगळ्या धाटणीची, केतकी माटेगावकरची भूमिका! अगदी दुसराच चित्रपट असताना चौकटीच्या बाहेरची भूमिका उत्तम रीतीने पार पाडण्याचं आव्हान तिने सहजगत्या पेललं. ‘वाय. झेड.’सारख्या चित्रपटातून पर्ण पेठे, ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’, ‘कासव’सारख्या चित्रपटांतून आलोक राजवाडे ही मंडळी घराघरात पोहोचली आहेत. वेगवेगळ्या माध्यमांतून काम करण्याची क्षमता या पिढीने दाखवून दिली असल्याने त्यांच्यावर भिस्त ठेवून नवे प्रयोग करणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. डिजिटल माध्यमात तर याची सहजी प्रचीती यावी. यूटय़ूबसारखी माध्यमं इतर माध्यमांसारखी एकतर्फी नाहीत. तिथे प्रेक्षकांचं मत अगदी काही मिनिटांत कलाकारापर्यंत पोहोचतं. यूटय़ूबवर प्रेक्षकांनाही व्यक्त होता येतं, टीकाटिप्पणी करता येते आणि ती त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया ठरते. इतर कोणत्याही माध्यमात इतक्या मोठय़ा प्रमाणावर आणि वेगाने प्रेक्षकांशी थेट संबंध येत नाही. त्यामुळे यूटय़ूबवर काम करताना जास्त दडपण असतं, असं यूटय़ूबर्स सांगतात.

कलामाध्यम कोणतंही असो, भाषा कोणतीही असो त्यातून ‘लोकांना मी आवडेन की नाही’, या उत्सुकतेपेक्षाही इतक्या गर्दीत ‘लोकांना माझं काम आवडलं तरच मी लक्षात राहणार आहे’, हे शहाणपण या तरुण कलाकारांनी आधीच घोटवलेलं असतं. त्यामुळे त्यांच्यावर दडपण असलं तरी तितक्याच तयारीने आणि विश्वासाने ते काम करतात. त्यांच्या कामामुळे कित्येकदा रूढ चौकटीत बसणारे चेहरे, शरीरयष्टी असं काही नसतानाही त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. प्रेक्षकांनीही त्यांना सहजतेने स्वीकारलं आहे.

बदल आणि नावीन्य महत्त्वाचं आहे

महेश मांजरेकर, अभिनेता-दिग्दर्शक

चित्रपट किंवा मालिकांमध्ये काम करणाऱ्यांचं टॅलेंट महत्त्वाचं असतं. त्यामुळे पिढी कोणतीही असली तरी त्यांच्या कौशल्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं जातं. तरुण कलाकारांबरोबरच प्रामुख्याने काम करायचं असतं तेव्हा जास्त काळजी घेतली जाते. त्या भूमिकेसाठीचं एखाद्याचं कास्टिंग किती योग्य आहे याचा विचार पहिल्यांदा होतो. त्यांच्या दिसण्यालादेखील दुय्यम स्थान दिलं जातं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘सराट’ फेम िरकू राजगुरू, तानाजी (प्रदीप/लंगडय़ा) किंवा िहदीत नवाझुद्दीन सिद्दिकीचं नाव घ्यावं लागेल. या लोकांनी आपल्या अभिनयकौशल्याच्या जोरावर लोकांना भुरळ पाडली आहे. प्रेक्षकांनासुद्धा नवीन चेहरे पाहायला आवडतात. त्यामुळे बदल महत्त्वाचा आहे. आपण जोपर्यंत बदल करणार नाही तोपर्यंत जुन्या गोष्टी संपणार नाहीत आणि कलाकारांनादेखील नवनवे प्रयोग करायला मिळणार नाहीत. सध्या चित्रपट, मालिकाच नव्हे तर सोशल मीडिया, ऑनलाइन चॅनल्सवरदेखील असे प्रयोग होताना दिसत आहेत. डिजिटल मीडिया एखाद्या जाळ्यासारखं पसरतो आहे आणि भविष्यात याला पर्याय नसल्याने त्या माध्यमाला योग्य ठरणारा नवीन आशय, मांडणी, कलाकार देण्याशिवाय पर्याय नाही. मात्र अशापद्धतीने तरुण कलाकारांबरोबर काम करताना प्रमोशनसाठीही नवीन नवीन कल्पना लढवाव्या लागतात. पण त्यातूनही हजारो लोकांपर्यंत लगेच पोहोचता येतं ही मोठी क्रांती आहे. तरुण पिढी याबबात जास्त सजग आहे आणि प्रत्यक्ष सहभागी असल्याने ते याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतात.

प्रेक्षकांची थेट प्रतिक्रि या हे आव्हान

अमोल पराशर, अभिनेता

वेबसीरिजमध्ये प्रेक्षकांना मी साकारत असलेली व्यक्तिरेखा आपलीशी वाटली पाहिजे यासाठी एक अभिनेता म्हणून मी सतत प्रयत्नशील असतो. त्यासाठी पुन्हा पुन्हा स्क्रिप्ट वाचणं, ते समजून घेणं हे मी न थकता करतो. स्क्रिप्ट नुसतं वाचणं पुरेसं ठरत नाही. तर दिग्दर्शकाशी चर्चा करून त्याचाही दृष्टिकोन समजून घ्यावा लागतो. यासाठी वेळही तेवढाच द्यावा लागतो. वेबसीरिजचा एपिसोड आल्यानंतर प्रेक्षक लगेच व्यक्त होतात. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया कशा येतात त्याचं थोडं दडपण असतं आणि हेच या माध्यमाचं आव्हान आहे.

तरुण कलाकार प्रेक्षकांना वास्तववादी वाटतात

नीलेश मयेकर, बिझनेस हेड – झी मराठी

मालिका हे घराघरात पोहोचणारं माध्यम आहे. मालिकेत जेव्हा तरुण नवोदित कलाकार काम करतात तेव्हा ते  प्रेक्षकांना अधिक वास्तववादी वाटतात. त्यांच्यावर जुन्या भूमिकांची छाप नसते, जुन्या विचारांचा प्रभाव नसतो. त्यामुळे ते प्रेक्षकांकडून लगेच स्वीकारले जातात. नवोदित कलाकारांना प्रॉडक्शन हाऊसकडून ग्रूम केलं जातं. त्यांना अभिनयाचे धडे दिले जातात, इतरही सेशन्स घेतली जातात. शिवाय निवड करताना कथानकाची गरज लक्षात घेऊनच केलेली असल्याकारणाने कोणताही गोंधळ उरत नाही. प्रत्येक कलाकार हा सुरुवातीला नवीनच असतो, त्यांना पुढे आणण्यासाठी संधी द्यावी लागते. ती जोखीम घ्यावी लागते मात्र प्रेक्षकही त्यांना सहजपणे स्वीकारत असल्याने आम्ही ती वारंवार घेतोय इतकंच.

viva@expressindia.com