बालकांपासून ते महाविद्यालयीन तरुणांपर्यंत सर्वाच्याच बोटावर फिरणारे स्पिनर सध्या चर्चेत आहेत. स्पिनर फिरवल्यामुळे मानसिक ताणतणाव कमी होतो, एकाग्रता वाढते, असा दावा स्पिनर विकणारे सर्व दुकानदार करीत आहेत. पण स्पिनर हा इतर खेळांप्रमाणेच एक खेळ आहे, त्याचे व्यसनही लागू शकते. मुलांची एकाग्रता कमी का होते व ती कशी वाढवता येईल यासाठी वेगळे पारंपरिक तंत्र आहे.

सध्या बाजारात खूप तेजीने विक्री होत असलेल स्पिनर हे ऑटिस्टिक मुलांमध्ये एकाग्रता वाढविण्यासाठी वापरत असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. स्पिनर हा केवळ एक खेळ असून याच्या संकल्पनेमागे एकाग्रता वाढवणे किंवा मानसिक ताण कमी करणे, असा कोणताही तत्सम हेतू नसल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. या खेळाला केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि याचा खप वाढण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी स्पिनरचा संबंध लावला आहे. स्पिनर बोटावर फिरवल्यामुळे केवळ ते चक्रासारखे बोटावर फिरते. त्या वेळी त्याच्या मध्यभागी असलेल्या बेअिरगमुळे स्पिनर फिरवलेले बोट आणि त्या आजूबाजूच्या भागामध्ये कंपने निर्माण होतात. ही कंपने केवळ हातावर भोवरा फिरवल्यासारखी असतात. त्यामुळे त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी कोणताही संबंध नाही. हे साधन हाताच्या बोटांच्या हालचाली वाढवण्यासाठी वापरले जात असल्याचाही गैरसमज पसरविला जात आहे. त्यामुळे अनेक पालक आपल्या बालकांच्या मोटर अ‍ॅक्टिव्हिटीचा विकास व्हावा, या उद्देशानेही विकत घेत आहेत. हे साधन केवळ एखाद्या भोवऱ्यासारखे असून यामुळे बालकांच्या मोटर अ‍ॅक्टिव्हिटीला चालना मिळेल, असे कोणतेही शास्त्रीय तंत्र यामध्ये वापरले नसल्याचे फिजिओथेरपिस्ट मुक्ता गुंडी यांनी सांगितले. प्लॅस्टिकपासून ते धातूपर्यंत विविध प्रकारचे स्पिनर बाजारामध्ये उपलब्ध आहेत. यापैकी प्लॅस्टिकचे स्पिनर हे वजनाने हलके असल्यामुळे बोटावर फिरले तरी विशेष जाणवत नाही. परंतु धातूंचे स्पिनर वजनाने जड असल्यामुळे ते सतत बोटांवर फिरवले तर मात्र त्याचा ताण बोटावर येऊ  शकतो, असा माझा अंदाज आहे. फिजिओथेरपीमध्ये याचा कोणताही वापर करीत नाही, असे गुंडी यांनी सांगितले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या स्पिनर फॅडमुळे मात्र काही मुलांमध्ये सतत बोटावर स्पिनर फिरवण्याची सवय निर्माण झाल्याचेही दिसून आले आहे. अशा मुलांना स्पिनर हातात नसतील तर बेचैन झाल्यासारखे वाटते. एकाग्रता वाढवणारा खेळ असा गाजावाजा केले जाणारे हे स्पिनर खरे तर मुलांचे लक्ष विचलित करीत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वाणी कुल्हळी यांनी सांगितले.

डॉ. आशिष देशपांडे

बदलत्या जीवनशैलीनुसार लहान मुलांची झोप आणि आहार यामध्ये मुख्यत: बिघाड झाला आहे. शहरी दिनक्रम लांबल्यामुळे मुले शाळेत जाण्यासाठी सकाळी लवकर उठतात आणि रात्री पालक घरी उशिरा येतात किंवा उशिरा झोपतात, त्यामुळे मुलेही उशिरा झोपतात. यामुळे मुलांची आठ तासांची झोप पूर्ण होत नाही. परिणामी दिवसा ती उत्साही न राहिल्यामुळे कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे त्यांना अवघड जाते. त्यामुळे मुलांची किमान आठ तास झोप होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हल्लीच्या वाढत्या जंकफूडमुळे मुलांच्या आहारामध्ये साखरेचे प्रमाण वाढत आहे. आहारामध्ये कबरेदके, प्रथिने, जीवनसत्त्वे यांचा समतोल नसल्यामुळे शरीराला आवश्यक तेवढी ऊर्जा मिळत नाही. याचा त्यांच्या एकाग्रता क्षमतेवरही परिणाम होत आहे. शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये खाण्याच्या डब्यामध्ये भाजी-पोळीच असली पाहिजे. यासोबत काकडी, गाजरची कोंशिबीर असावी हे नित्याने सांभाळणे गरजेचे आहे. सतत मोबाइल, टीव्ही यांसारखी साधने समोर असल्यामुळे त्यामध्ये जे दिसते ते सहजपणे आत्मसात करण्याची सवय मुलांना लागली आहे. त्यामुळे पुस्तक वाचण्याचे काम करताना त्यांचा मेंदू ताण घेण्यासाठी लवकर तयार होत नाही. म्हणूनच मग मुले पुस्तक वाचताना लगेचच कंटाळतात.लहान मुलांना या वयामध्ये त्यांच्या आजूबाजूचे जग अनोळखी असल्यामुळे बऱ्याचदा असुरक्षित वाटत असते. त्याच्या हातून घडणाऱ्या चुका, अवतीभवती होणारी भांडणे आदी घटनांमुळे कोवळ्या वयामध्ये ही असुरक्षितता वाढतच जाते. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त वेळ मूल जर आई-वडिलांच्या सान्निध्यात घालवीत असेल तर असुरक्षिततेची भीती कमी होत जाते. पूर्वीच्या काळी घरांमध्ये अथर्वशीर्ष किंवा मनाचे श्लोक यांसारख्या उपक्रमांमधून पाठांतरावर भर दिला जायचा. त्यामध्ये समजून शिक्षण नसले तरी पाठांतर करण्याच्या सवयीमुळे एकाग्रपणे एक गोष्ट करण्याची सवय लागत होती. हल्ली यांसारखे उपक्रम मागे पडल्यामुळे मुलांची एकाग्रतेची शक्ती कमजोर बनत चालली आहे. ही शक्ती वाढवण्यासाठी काही खेळ हल्ली उपलब्ध आहेत. जसे की मनामध्ये पाच नावे लक्षात ठेवायची. उदा. सचिन, अनघा, राघव, मीरा, कबीर हातातले चार-पाच क्रमाने वर टाकत झेलणारे विदूषक आपण पाहिले आहेतच, तसेच या मुलांची नावे मनामध्ये एक एक वर उडवायची आणि खाली किती राहिले ते आठवायचे. या खेळामध्ये सुरुवातीला खूप गोंधळ उडतो. परंतु हळूहळू सवय झाली की मजा यायला लागते. असे अनेक खेळ आहेत, ज्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेचा विकास होत जातो. मुलांमध्ये प्रचंड ऊर्जाशक्ती असते. ही ऊर्जा मोबाइल किंवा टीव्हीसमोर बसून हळूहळू कमी व्हायला लागते. त्यासाठी मुलांनी मैदानावर अगदी घाम येईपर्यंत खेळले पाहिजे, तरच मुलांना शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा प्रसन्न वाटेल. मुलांची एकाग्रता ही कोणत्या खेळण्याशी जोडलेली असून ती त्याच्या सर्वागीण विकासाशी जोडलेली आहे