डॉ. अभिजीत जोशी, अस्थिरोगतज्ज्ञ

आता अनेक ठिकाणी थंडी चांगली जाणवू लागली आहे. कुडकुडवणारी थंडी असताना सकाळी लवकर उठण्यापेक्षा मऊमऊ दुलई पांघरून ‘अजून पाच मिनिटं,’ असे म्हणत झोपून राहण्याकडेच बहुतेक जणांचा कल असतो. पण व्यायाम सुरू करण्यासाठी हे थंड, ताजेतवाने आणि सुखद वातावरण खूप चांगले समजले जाते. तेव्हा सकाळी झोपून राहू नका! लवकर उठा आणि व्यायामाला लागा.

प्रत्यक्ष व्यायाम करण्याआधी करण्याच्या ‘वॉर्म अप’ आणि ‘कूल डाऊन’ व्यायामांविषयी आपण यापूर्वी पाहिलेच आहे. खरे तर कोणत्याही ऋतूत ‘वॉर्म अप’ गरजेचेच आहे, पण थंडीत त्याची गरज अधिक. ते केल्यामुळे थंडीमुळे आखडलेले स्नायू जरा मोकळे होतात आणि व्यायाम करताना दुखापत होण्याची शक्यता कमी करता येते. शिवाय व्यायाम झाल्यावरही एकदम न थांबता ‘कूल डाऊन’चे व्यायाम करायलाच हवेत. हे दोन्ही प्रकारचे व्यायाम आपणास माहीत नसतील, तर ते जरूर एखाद्या प्रशिक्षित व्यक्तीकडून समजावून घ्यावेत.

चालणे/ जॉगिंग/ टेकडी चढणे

आता थंडीतल्या व्यायामांकडे वळूया. आपल्याकडे महाराष्ट्रात अगदी बर्फाळ प्रदेशासारखी थंडी नसते. त्यामुळे बाहेर जाऊन व्यायाम करणे शक्य असते. थंडीत जर नव्यानेच व्यायामाला सुरुवात करणार असाल तर चालण्याचा किंवा जॉगिंगच्या व्यायामाने सुरुवात करता येईल. हा अगदी साधा व्यायाम. शिवाय कोणताही खर्च न लागणारा. जे आधीपासून चालणे आणि जॉगिंग नियमित करतात त्यांना काही नव्याने सांगण्याची गरज नाही. पण नवख्या मंडळींनी किंवा ज्येष्ठ नागरिकांनी आधी थोडा वेळ सावकाश चालणे, मग थोडा वेळ जलदगतीने (ब्रिस्क वॉक) चालणे, परत पुन्हा थोडा वेळ सावकाश आणि पुन्हा जलद चालणे अशा प्रकारे व्यायाम केलेला चांगला. यात चालण्याची किंवा जॉगिंगची हळूहळू सवय होत जाते आणि एकदम खूप व्यायाम केल्याचा ताण होत नाही. आपल्या प्रकृतीला झेपेल त्यानुसार व्यायाम वाढवत नेता येतो.

घराच्या जवळपास एखादी टेकडी असेल तर उत्तमच. सकाळच्या ताज्या वातावरणात करण्यासाठी तोही उत्तम व्यायाम आहे. परंतु इथेही आपली प्रकृती आणि आपल्याला चढण्याची कितपत सवय आहे, याचा विचार करून व्यायाम वाढवत न्यावा लागतो.

सूर्यनमस्कार/ जोरबैठका

थंडीतल्या व्यायामांचा एक भाग म्हणून सूर्यनमस्कार आणि जोर-बैठका हा एक चांगला व्यायाम आहे. हे व्यायाम योग्य प्रकारे केल्यास स्नायूंना योग्य ताण मिळतो. त्यामुळे ते करण्याची पद्धत अवश्य शिकून घ्यावी. ज्यांना कंबरेचे काही आजार आहेत त्यांनी मात्र सूर्यनमस्कार करताना फार मागे वाकू नये. या दिवसांत सर्व प्रकारच्या मैदानी खेळांनाही सुरुवात करता येईल. ताज्या हवेत प्राणायम केल्यास तेही उत्तम.

थंडीत व्यायाम करताना

  • थंडी आहे म्हणून व्यायाम थांबवू नका, पण व्यायामापूर्वी व नंतरही ‘वॉर्म अप’ आणि ‘कूल डाऊन’चे व्यायाम करण्यास विसरू नका.
  • जिममध्ये किंवा घरात- कुठेही चार भिंतींच्या आत व्यायाम केला आणि लगेच बाहेर जाणार असाल तर बाहेर जाताना ट्रॅकसूट किंवा कोणतेही उबदार कपडे घालावेत. कारण बाहेरची हवा थंड असते.
  • थंडीत घाम येत नसला तरी शरीरातून पाणी कमी होण्याची क्रिया (डीहायड्रेशन) थंडीतही होऊ शकते. त्यामुळे दिवसभर पुरेसे पाणी आणि पातळ पदार्थ घेणे गरजेचेच.