मधुमेहाचे निदान महिलांमध्ये बहुतांशी उशिरा होते. महिला अजूनही स्वत: आपल्या रक्ततपासणीस फारशा राजी नसतात. काही वेळेस एखाद्या व्यावसायिक कंपनीने केलेल्या वा एखाद्या धोरणासाठी करण्यात येणाऱ्या रक्त तपासणीत मधुमेह तळ्यात वा मळ्यात आहे हे आढळून येते. काही वेळेस मधुमेहामुळे होणाऱ्या लक्षणांनी म्हणजेच वारंवार मूत्रविसर्जनास जाणे, अंगावर पुरळ येऊन खाज येणे, वजन वाढत जाणे, पायात पेटके येणे, हातापायाला मुंग्या येणे, डोळ्याचा त्रास होणे म्हणून रुग्ण येतात.

मधुमेह हा आजार दोन प्रकारांत विभागला जातो. एका प्रकारात स्वादुिपडात इन्सुलिन तयार होत नाही. हा वयाच्या पंचवीस वर्षांच्या आत निदर्शनास येतो. तेव्हा त्यावरील उपचारात आहाराबरोबर इन्सुलिन इंजेक्शन्सचा योग्य वापर फायदेशीर ठरतो. तर वयाच्या ३५ व्या वर्षांनंतर वा गर्भारपणी निदान झालेल्या मधुमेहात इन्सुलिन तयार झाले तरी त्याची कार्यक्षमता कमी असल्याने यकृत वा मांसल भागात साखरेची साठवण न होता रक्तातील साखर वाढत राहते. मूत्रविसर्जनातील साखर वाढते वा मूत्रिपडात मूत्राद्वारे आलेल्या साखरेचे अभिशोषण होऊन पुन्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.

मधुमेहाची सर्वसाधारण लक्षणे म्हणजे कोणतीही झालेली जखम भरून येण्यास वेळ लागणे, मूत्राशयातील विकार विशेषत: जंतुसंसर्ग वारंवार होणे, रोगजंतुसंसर्ग वारंवार होऊन त्वचारोग बळावणे, दात-हाडे यांची बळकटी कमी होणे, वारंवार गर्भपात होणे तसेच बाळाच्या श्वसनक्रियेत वा बाळास व्यंग निर्माण होणे, बाळ अधिक वजनाचे असले तरी श्वसनसंस्थेत बिघाड असणे, वेळेआधी रजोनिवृत्ती येणे, मानसिक बदलामुळे लंगिक जीवनात अडथळा येणे, रजोनिवृत्तीनंतर हाडातील बदलामुळे वारंवार अस्थिभंग होणे. मधुमेहाचे निदान झाल्यानंतर योग्य ते उपचार तात्काळ करणे जरुरीचे असते. कारण रक्तातील वाढलेल्या साखरेमुळे हृदय-रक्ताभिसरण संस्था, मज्जासंस्था, अन्नपचनसंस्था, नेत्रपटल, अस्थिसंस्था व सर्वसाधारणपणे सर्वच शरीरावर कमी-जास्त प्रमाणात अपाय होतात.

स्त्रियांची आयुर्मर्यादा आता ७५ वर्षांपर्यंत पोहोचल्याने गरोदरपणी होणाऱ्या मधुमेहाचे निदान करायला हवे. साधारण चौथ्या-पाचव्या महिन्यानंतर गरोदरपणी सर्वच रक्ततपासण्या होतात, परंतु २४ ते २८ आठवडय़ांत रक्त तपासणी करून घ्यावी. यातील निर्देशांकाप्रमाणे उपचार तर करावेच पण ज्यांना गरोदरपणी मधुमेह झाला आहे अशा स्त्रीने प्रसूतीनंतरही दोन-तीन महिने रक्त तपासणी करावी. अशा स्त्रियांपकी ५० टक्के स्त्रियांना वयाच्या ४० व्या वर्षांनंतर मधुमेह होण्याची शक्यता असते.

मधुमेहात आहार, व्यायाम, औषधे यांच्यासोबत खालील गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

  • हायपोथायरॉईड, उच्च रक्तदाब, तसेच वजन कमी करण्याची वा रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्याची स्टॅटीन्ससारखी औषधे घेत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • रजोनिवृत्तीकडे झुकत असल्यास वारंवार अस्थिभंग होण्याची शक्यता असते.
  • रजोनिवृत्तीवर उपाययोजना म्हणून आलेली एच.आर.टी ची औषधे समजून घेऊनच वापरात आणावीत.
  • मधुमेहासाठी उपाययोजना ही आयुष्यभरासाठी आहे हे लक्षात ठेवावे. पण औषधात दर सहा महिन्यांनी बदल होऊ शकतो.
  • मधुमेही रुग्णाने लंगिक जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा.
  • प्रसूतीनंतर घेण्यात येणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांसंबंधी स्त्रीरोगतज्ज्ञांकडून माहिती मिळवावी, हल्ली इस्ट्रोजेन-प्रोजेस्टेरॉन अतिशय कमी असलेल्या गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध आहेत.

मधुमेही रुग्णाने काटेकोरपणे पाळावयाच्या सूचना

  • प्रत्येकाची जीवनशैली वेगळी असल्याने स्वत:ची शैली स्वत: तयार करा.
  • व्यायामामध्ये चालण्यासोबत इतर व्यायाम करून स्नायू व मांसल भागातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवा.
  • वर्ष, दोन वर्षांतून डोळ्यांची तसेच दात, कान, घसा यांची तपासणी करावी.
  • घराबाहेर पडताना पायात फक्त बूटच वापरावेत. पायाला होणारी जखम पटकन बरी होत नाही.
  • रक्ततपासणी, हृदयरोग तपासणी याबरोबर थॉयरॉईड तपासणी महत्त्वाची ठरते.
  • दारू, तंबाखू, सिगरेट अशा व्यसनांपासून दूर राहावे.
  • वजनातील चढउतार तुम्हाला अधिक कळतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका.
  • त्वचारोगाचे वा मूत्रदाहाचे कारण मधुमेह असेल तर साखर नियंत्रित झाल्याशिवाय इतर उपाययोजना चुकीची ठरते.
  • मधुमेहाच्या जोडीने उच्च रक्तदाब काही वर्षांनी सुरू होतो.
  • मधुमेहाने घाबरून न जाता योग्य आहार, योग्य व्यायाम व योग्य बदलती औषधे अशी त्रिसूत्री पाळावी. मधुमेह आटोक्यात ठेवण्याचा सकारात्मक प्रयत्न करा, यात कठीण काहीच नाही.

rashmifadnavis46@gmail.com