बारामती तालुक्यातील मुर्टी मासाळवाडी येथे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत ग्रामस्थांनी सुळे यांना मतदान न केल्यास गावाचा पाणीपुरवठा तोडण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली धमकी पोलिसांच्या लेखी केवळ अदखलपात्र ठरली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पवारांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी केलेल्या चौकशीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी दिली. बारामती मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मुर्टी-मासाळवाडी येथे सभा घेऊन आम्हाला मतदान न केल्यास पाणीपुरवठा बंद करण्याची अजित पवार यांनी धमकी दिल्याची तक्रार ‘आप’चे उमेदरवार सुरेश खोपडे यांनी ग्रामीण पोलिसांकडे केली होती. याप्रकरणी निवडणूक आयोगने जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. याबाबत पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी सांगितले की, खोपडे यांनी ग्रामीण पोलिसांकडे १७ एप्रिल रोजी तक्रार दिली होती. त्यामध्ये अजित पवार यांनी सार्वजनिक प्रचार सभा घेतली. मुर्टी मासाळवाडी येथील गावातील नागरिकांना सुप्रिया सुळे यांना मतदान न केल्यास गावचे पाणी बंद करण्याची धमकी दिली होती. या तक्रारीची पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने चौकशी केली. चौकशीमध्ये सार्वजनिक सभा घेण्यात आली नसल्याचे आढळून आले. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या चौकशीत कोणत्याही प्रकारची धमकी दिली असल्याचे स्पष्ट झालेले नाही. आपल्याकडे आलेल्या तक्रार अर्जावर ४८ तासात निर्णय घेणे आवश्यक असते. त्यामुळे याप्रकरणी भारतीय दंड संहिता १७१ एफ/ सी कलमांन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजित पवार यांच्याबाबतीत आलेल्या तक्रारीचा तपास केल्यानंतर या प्रकरणात त्यांनी कोणतीही जाहीर सभा घेतली नाही व त्यात कुणाला धमकावले नाही.
पुणे ग्रामीण पोलिसांचा अहवाल