पुणे-बेंगळुरू महामार्गावर पारगाव-खंडाळा गावाच्या हद्दीत रविवारी सकाळी ११.३०च्या सुमारास एसटी बसच्या प्रतीक्षेत असणाऱ्या प्रवाशांवर कंटेनर कोसळून झालेल्या अपघातात आठ जण ठार झाले. यात सहा महिलांचा समावेश आहे. समोरून आलेल्या एसटीला वाचविण्याचा प्रयत्न करीत असतानाच हा कंटेनर कोसळला आणि त्याखाली रस्त्याच्या कडेला उभे असणारे आठ प्रवासी चिरडले गेले.
पारगाव-खंडाळा गावातील एसटी स्थानकाजवळील उड्डाणपूल संपल्यावर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला. पुण्याकडे जाणाऱ्या साखरेच्या कंटेनरला ओव्हरटेक करून एक एसटी बस पुढे गेली. मात्र उतारावरून येताना या एसटीला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले आणि कंटेनर रस्त्याच्या कडेला कोसळला. मात्र या रस्त्यावर एसटीची वाट पाहणारे स्नेहा बापू वाघमारे, प्रमोद बापू वाघमारे, अविनाश गेडाम, शरिफा फकीर महमंद कच्छी, शबाना फक्रुद्दीन मांजोरी कच्छी, हवाबी फक्रुद्दीन मांजोरी कच्छी, सलभा आयुब खान, अंजुम गौसीया अहमद पटेल हे प्रवासी कंटेनरखाली चिरडले गेले. कंटेनरचा चालक नवनाथ गीते याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली. दोन तासांनंतर कंटेनर हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदतनिधी जाहीर केला आहे.