सरकारने स्वीकारलेल्या खासगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाच्या धोरणामुळे शिक्षण व्यवस्थेचे प्रचंड बाजारीकरण झाले असून घटनेने दिलेला समान व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा मूलभूत अधिकार प्राप्त करणे सर्वसामान्यांना अवघड झाले आहे. या विरोधात जनजागृती करून सर्वसामान्यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय शिक्षा अधिकार मंचने सहकारी-समविचारी संस्था व संघटनांच्या सोबतीने देशभरात संघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. २ नोव्हेंबर रोजी देशातील ईशान्य, दक्षिण, पश्चिम, पूर्व व उत्तर अशा पाच ठिकाणांवरून ही यात्रा निघणार आहे. या उपयात्रांपैकी पश्चिमेकडील प्रवाह गोवा, कोकण, कोल्हापूर व पुणे मार्गे नाशिकला येणार आहे.
अखिल भारतीय शिक्षा अधिकार मंच संघटनेशी अनेक शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व नागरी हक्कांसाठी संघर्ष करणारे जोडलेले आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सरकारने अंगीकारलेल्या धोरणांमुळे शिक्षण व्यवस्थेत अनेक प्रकारचे भेद निर्माण झाले आहेत. सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याचा अधिकार डावलला जात आहे. या संपूर्ण विषयावर जनजागृती करण्यासाठी संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती येथील शिक्षण बाजारीकरणविरोधी मंचने दिली. पश्चिमेकडून येणारा यात्रेचा प्रवाह गोवामार्गे महाराष्ट्रात येईल तसेच मुंबईहून येणारा प्रवाह खरोलीमार्गे नाशिक शहरात येईल. या माध्यमातून शहरातील विविध ठिकाणी पथनाटय़ व घोषणाफलक, मानवी साखळी याद्वारे कार्यकर्ते जनजागृती करतील. या यात्रेत शिक्षण बाजारीकरणविरोधी मंचासह लोकनिर्णय सामाजिक संस्था, राष्ट्र सेवा दल, ज्ञान विज्ञान समिती, छात्र युवा संघर्ष समिती आदी संघटना सहभागी होणार आहेत.