धरमतर खाडीतील प्रकल्पांविरोधातील आंदोलन हाताळण्यात रायगड जिल्हा प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने आंदोलनाच्या अठराव्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार दगडफेक केली आहे. या दगडफेकीत सात ते आठ पोलीस कर्मचारी आणि आंदोलकही जखमी झाले आहेत.
धरमतर खाडीतील प्रकल्पाविरोधात विविध मागण्यांसाठी अलिबाग आणि पेण तालुक्यातील मच्छीमार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला बसले होते. मात्र आंदोलन सुरू होऊन १८ दिवस झाले तरी जिल्हा प्रशासननाने या आंदोलनाची फारशी दखल घेतली नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उद्योगमंत्र्यांनी या प्रकरणी तातडीने बैठक बोलवावी अशा मागणीवर आंदोलक ठाम होते. मात्र दोन्ही मंत्र्यांना वारंवार वेळ मागूनही त्यांनी बैठकीसाठी वेळ न दिल्याने शुक्रवारी आंदोलकांचा संयम सुटला. राज्य सरकारच्या निषेधाची प्रेतयात्रा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला आणि संघर्षांची ठिणगी पडली. संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर जोरदार हल्ला चढवला. खुर्चाही फेकून मारल्या. मिरचीची पूडही फेकून मारण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न सुरू केला. पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला म्हणून तुफान दगडफेकही करण्यात आली. सुमारे १० ते १५ मिनिटे ही धुमश्चक्री सुरू होती. यात सात ते आठ पोलीस कर्मचारी जखमी झाले. दोन ते तीन आंदोलकही जखमी झाले. तर जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. दरम्यान याच वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्पग्रस्तांच्या समस्या संदर्भात खासदार अनंत गीते बैठक घेत होते. मात्र दगडफेक सुरु झाल्याचे समजताच, जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर आले. दगडफेक करणाऱ्या जमावाला सामोरे जात त्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यांच्या हस्तक्षेपानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात घुसलेले आंदोलक पुन्हा बाहेर गेले.
मात्र यानंतर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत संपूर्ण जमावाला ताब्यात घेतले. या वेळी राज्य सरकार आणि पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी जरी बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला असला तरी आंदोलन संपलेले नाही. धरमतर खाडीतील प्रकल्पग्रस्तांचा लढा यापुढेही सुरूच ठेवणार असल्याचे संघर्ष समितीचे अध्यक्ष शाम म्हात्रे यांनी सांगितले.
आंदोलन करण्याची काँग्रेस नेत्यांवर वेळ
राज्य सरकार विरोधात गेल्या अठरा दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि कामगार नेते शाम म्हात्रे आणि माजी आमदार मधुकर ठाकूर करत होते. मात्र गेल्या अठरा दिवसांत त्यांना राज्य सरकारकडून साधे चर्चेचे निमंत्रणही आले नाही. तर मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी भेट देणेही टाळले.
खासदार पास पालकमंत्री फेल
भायमळा येथे झालेल्या अग्नितांडवातील विचारपूस करण्यासाठी पालकमंत्री सुनील तटकरे आज अलिबागमध्ये आले होते. मात्र त्यांनी धरमतर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न जाणून घेण्याची तसदी घेतली नाही. तर दुसरीकडे संतप्त झालेल्या जमावाला धैर्याने सामोरे जात खासदार अनंत गीते यांनी जमावाला शांत केले.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या
प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळाव्यात, खाडीलगत असणारे बाह्य़काठे तातडीने दुरुस्त केले जावेत, १५ वर्षांसाठी प्रत्येक कुटुंबाला १० लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून दिले जावेत. खारबंदिस्ती योजनांची दुरुस्ती केली जावी.