कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेक मध्यमवर्गीयांना चार कोटी २४ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी आर्यरूप टूरिझम रिसॉर्ट प्रा. लि. कंपनीच्या तत्कालीन प्रशासनाधिका-याला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने लातूरमध्ये अटक केली आहे. नितीन चंद्रकांत गुप्ते (५८, रा. बांद्रे, मुंबई) असे त्याचे नाव असून त्याला सोलापूरच्या न्यायदंडाधिका-यांनी येत्या २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
या घोटाळ्यात अडकलेले कंपनीचे एजंट पुंडलिक इंगळे व सुनील पवार (रा. पिंपरी, पुणे) यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तर आर्यरूप कंपनीचे, संचालक रवींद्र देशमुख, वसुधा देशमुख, उदयसिंह घोरपडे तसेच कर्मचारी राजन पांडे व राजेश पालिवार हे पाचजण अद्यापि फरार आहेत. आर्यरूप टूरिझम कंपनीने राज्यात अनेक ठिकाणी गुंतवणुकीची योजना आखून अनेकांची आर्थिक फसवणूक केली असून सोलापुरातही अनेक मध्यमवर्गीयांना गंडा घालण्यात आला आहे. सोलापुरात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांपैकी अंबादास पुठ्ठा यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती. या गुन्ह्य़ाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला असून त्यानुसार या विभागाचे सोलापुरातील पोलीस उपअधीक्षक महादेव बिराजदार व पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी नितीन गुप्ते याचा शोध घेऊन त्याला अटक केली.