बेळगावचे नामांतर बेळगावी करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयावर शनिवारी बेळगावात मराठी बांधवांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयाचा निषेध महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बठकीत घेण्यात आला. बठकीत आंदोलनाचे टप्पे निश्चित करण्यात आले असून सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. तर १ नोव्हेंबर रोजी बेळगाव बंद ठेवून काळा दिन पाळण्यात येणार आहे. तर दुसरीकडे कन्नड भाषकांनी बेळगावी नावाचे फलक शहरात विविध ठिकाणी लावून आनंद व्यक्त करतानाच मराठी भाषकांच्या जखमेवर मीठ चोळल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्नाटक राज्यातील डझनभर शहरांचे नामांतर करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला होता. या निर्णयानुसार बेळगावचे नामांतर बेळगावी असे करण्यात येणार आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात मराठी भाषकांमध्ये शनिवारी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मराठा मंदिर येथे दुपारी तीन वाजता झालेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या घटक समितीच्या महत्त्वपूर्ण बठकीत केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी आमदार वसंतराव पाटील होते. शासनाच्या निर्णयाला विरोध करण्याचा निर्णय बठकीत करण्यात आला. १ नोव्हेंबर रोजी बेळगाव बंद ठेवून काळा दिन पाळण्यात यावा, असे आवाहन पाटील यांनी केले. हे आंदोलन ताकदीनिशी पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.
सोमवार, २० ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासन निर्णयाचा निषेध करणारे निवेदन देण्यात येणार आहे. शासनाच्या या कृतीबाबत वरिष्ठ वकिलांशी चर्चा करून कोणती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याचाही निर्णय समिती घेणार आहे. सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या दाव्याबाबत सर्वानीच जागरुकपणे कार्य करावे. पुढील वाटचालीत एकत्र राहून काम करण्याचा निर्णय बठकीत घेण्यात आला. बठकीस उपस्थित असलेल्या युवकांनी मोदी सरकारला मते दिली, पण त्यांनी फसवणूक केल्याचा आरोप केला. बठकीस आमदार संभाजी पाटील, आमदार अरिवद पाटील, माजी आमदार दिगंबर पाटील, मनोहर किणेकर, दीपक दळवी, िनगोजी हुद्दार, मालोजी अष्टेकर, राजू मर्वे आदी उपस्थित होते.