भीषण दुष्काळात, रणरणत्या उन्हात काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या साक्षीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेली आश्वासने अजूनही कोरडीच आहेत. बाबरा, कामठा, निधोना गावांत बदल घडला तो एकाच रस्त्याचा. जेथून राहुलबाबांची गाडी गेली, तेवढा रस्ता झाला. पण त्यांच्या साक्षीने बाबरा-कामठा रस्त्यासाठी ५ कोटी ३५ लाखांचा निधी देण्याची घोषणा हवेत विरली.
निधोना गावात रोजगार हमीच्या कामाची पाहणी राहुल गांधी यांनी केली होती. पाच हजार लोकसंख्येच्या या गावात शिरताना शेतीच्या बांधबंदिस्तीची कामे हाती घेण्यात आली. त्यांची पाठ फिरली आणि मजूर निघून गेले, असे चित्र माध्यमांमधून समोर आल्यानंतर या कामाकडे प्रशासनाने लक्ष दिले. काम झाले आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे महिनाभर उशिरा का असेना, सर्वाची मजुरी दिली गेली. निधोना गावचे सरपंच सांगत होते, ‘रोहयोचा फायदा झाला, असे म्हणावे लागेल. कारण अजून आमच्या विहिरींना पाणी आहे. पण किती दिवस टिकेल, हे कसे सांगणार?’ पण गावात सरपंचांच्या या मताशी बहुतांशजण सहमत नाहीत. राहुलबाबा परतले आणि काम बंद पडले. त्यामुळे या कामाचा अजिबात लाभ झाला नसल्याचे गावकरी सांगतात.
अशीच अवस्था बाबरा येथील शेतकऱ्यांची आहे. ज्या रस्त्याने राहुल गांधी जाणार होते, त्या रस्त्याकडेला असणाऱ्या रामेश्वर थोरा यांच्या शेतात त्यांनी शेततळ्याची पाहणी केली. रामेश्वरला शेततळे मिळाल्याने आनंद झाला. अधिक उत्पादन घेऊ, असे त्यास वाटत होते. त्याने मिरची लावली. पण म्हणावा तसा लाभ झाला नाही. तो म्हणतो, ‘योजना देण्यापेक्षा शेतीमालाला भाव मिळाला तर बरे होईल.’ याच गावात बाबरा ते कामठा रस्त्यासाठी ५ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ना निधी मिळाला, ना काम सुरू झाले. मागणी आहे तशीच आहे. गावकरी म्हणतात, ‘नेते आले त्या निमित्ताने एक रस्ता तरी झाला, तेवढाच त्यांचा विकासाला हातभार.’