सात जिल्ह्यांमध्ये कुष्ठरोगाचा प्रसार
राज्यात २००५ पर्यंत कुष्ठरोग हद्दपार करण्याचा आरोग्य यंत्रणेचा दावा हवेत विरला असून, अजूनही नवीन कुष्ठरोगी निदर्शनास येत आहेत. त्यातच दरवर्षी दोन हजारांवर कुष्ठरोगग्रस्त लहान मुलांची भर पडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार २०१४-१५ मध्ये नवीन कुष्ठरुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या २०४५ इतकी होती. २०१५-१६ मध्ये ही संख्या २०९४ पर्यंत पोहोचली आहे. नवीन कुष्ठरुग्णांमध्ये लहान मुलांचे शेकडा प्रमाण ११.४० टक्के झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेसह केंद्र सरकारने डिसेंबर २००५ पर्यंत दर १० हजार लोकांमध्ये १ कुष्ठरुग्ण कमी करण्याचे निर्देश दिले होते, पण गेल्या १५ वर्षांत ते साध्य होऊ शकले नाही. मध्यंतरीच्या काळात कुष्ठरोग नाहीसा झाल्याचे सांगण्यात येत होते, पण राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये कुष्ठरोगाचा प्रसार होत असल्याचे दिसत असून त्यात विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, वध्र्यासह ठाणे, रायगड आणि नंदूरबार जिल्ह्यांचा समावेश आहे. गेल्या सात वर्षांपासून राज्यात दरवर्षी दोन हजारांवर लहान मुले कुष्ठरोगग्रस्त असल्याचे निदर्शनास येत आहे.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम हा केंद्र शासन अनुदानित असून, या कार्यक्रमाचे सर्वसाधारण आरोग्यसेवेत एकत्रीकरण झाले आहे.
राज्यात हा कार्यक्रम राज्य शासन, जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत राबवण्यात येतो. ग्रामीण भागात आरोग्यसेवेतील अधिकारी आणि कर्मचारी नियमित भेटी देतात, तसेच प्रशिक्षित आशा वर्करमार्फत गावपातळीवर संशयित कुष्ठरुग्ण शोधले जातात, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. कुष्ठरोगाचा संशय आल्यास रुग्णाने स्वत:हून तपासणीसाठी जवळच्या आरोग्य केंद्रात यावे, यासाठी आरोग्य शिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. यात प्रभातफेरी, शालेय प्रश्नमंजूषा, आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कार्यशाळा, समाजातील विविध स्तरासाठी गटचर्चा याबरोबरच कुष्ठरुग्णांसाठी विकृती तपासणी शिबिरे, आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण सत्र, घरोघरी संपर्क अभियान, मोक्याच्या ठिकाणी प्रदर्शने, पोस्टर्स लावणे, हस्तपत्रिका वाटप करणे, असे उपक्रम राबवण्यात येतात, असे एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात दरवर्षी ऑक्टोबर, जानेवारी आणि फेब्रुवारीत विशेष कुष्ठरोग शोध व उपचार मोहीम राबवण्यात येते, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
उपक्रम कागदोपत्रीच
यातील बरेचसे उपक्रम हे कागदोपत्रीच आहेत, अशी ओरड सुरू झाली आहे. मध्यंतरीच्या काळात कुष्ठरोग निदान आणि त्याचे निवारण करणारी यंत्रणा मोडीत काढल्याने कुष्ठरोगाचा धोका पुन्हा वाढल्याचे आता लक्षात येऊ लागले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषाप्रमाणे कुष्ठरोगामुळे डोळ्यांनी दिसणाऱ्या व्यंगाचे प्रमाण दर १० लाख लोकसंख्येमागे एकपेक्षा कमी असायला हवे, पण महाराष्ट्रात हे प्रमाण ५.९८ आहे.