शेंद्रा औद्योगिक वसाहतीत गृहोपयोगी वस्तू बनविणारी लिब्राह कंपनी सुमारे ८०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. अडचण न आल्यास कंपनीमार्फत २०१६ मध्ये फ्रिज उत्पादन सुरू होईल. त्यासाठी कंपनीस ४५ एकर जागा देण्याचे ठरविण्यात आले.
शेंद्रा येथे स्टरलाईट कंपनीकडे ६५ एकर जमीन होती. मात्र, त्यांना प्रकल्प उभारता न आल्याने ती औद्योगिक विकास मंडळास परत घेण्याची प्रक्रिया सुरू होती. या जागेसंदर्भात न्यायालयात वादही सुरू होता. मात्र, काही अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत मोठय़ा प्रकल्पाची जागा अन्य प्रकल्पास मिळत असल्याचे सांगितले. स्टरलाईट कंपनी प्रशासनाबरोबर चर्चा झाल्यानंतर जागेचा प्रश्न निकाली काढण्यात आला.
लिब्राह कंपनीने जागेसाठी पहिला हप्ता म्हणून सुमारे सव्वा दोन कोटी रुपये औद्योगिक विकास मंडळाकडे सुपूर्द केले. या उद्योगामुळे सुमारे दीड हजार जणांना रोजगार मिळू शकतो, असा अंदाज आहे.
सावे यांच्या मंत्रिपदासाठी प्रयत्न
दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टय़ात येत्या काळात मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. तसे राजकीय पाठबळ औरंगाबाद शहरातून उभे राहावे, या दृष्टीने प्रयत्नही सुरू झाले आहेत. विशेषत औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांना नव्या मंत्रिमंडळात उद्योग राज्यमंत्री करावे, अशी व्यूहरचना केली जात आहे. उद्योग क्षेत्रातील काही मंडळींनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन तसे प्रयत्न केले. नव्याने होणाऱ्या गुंतवणुकीला चालना देण्यास उद्योगमंत्री मराठवाडय़ाचा असावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.