गोव्यात दोन भावांच्या संशयास्पद मृत्यूचं प्रकरण समोर आलं आहे. दोन्ही मुलांसह त्यांची आईदेखील घरातच बेशुद्धावस्थेत आढळली आहे. दोन्ही भाऊ भुकेने मरण पावल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलांची आई दोन्ही मुलांकडून कडक उपवास करून घेत होती. गेल्या अनेक दिवसांपासून ही दोन्ही मुलं दिवसाला केवळ एक खजूर खात होती. कॅशेक्सिया आणि कुपोषण हे दोन्ही मुलांच्या मृत्यूचं संभाव्य कारण असल्याचं शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी नमूद केलं आहे.

मोहम्द जुबैर खान आणि अफान खान अशी या मृत मुलांची नावं आहेत. त्यांची आई रुक्साना खान हिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. तिच्या मानसिक आरोग्याच्या तपासणीसाठी तिला गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या मानसोपचार आणि मानवी व्यवहार संस्थेत (IPHB) पाठवलं जाणार आहे.

या मुलांचे वडील नजीर खान आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी २४ एप्रिल रोजी मडगाव एक्वेम येथे आले होते. घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे त्यांनी बराच वेळ दरवाजा ठोठावला. परंतु कोणीही दरवाजा उघडला नाही. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलीस नजीर खान यांच्या घरी दाखल झाले आणि दरवाजा तोडून आत गेले. पोलिसांनी घरात पाहिलं की अफान खान एका खोलीत मृतवस्थेत पडला होता, तर जुबेर दुसऱ्या खोलीत पडला होता. त्यांची आई अंथरुणावर बेशुद्धावस्थेत पडली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार या मुलांचे वडील नजीर खान हे पत्नीबरोबर सातत्याने होणाऱ्या भांडणाला कंटाळून मडगावमधील दुसऱ्या घरात राहायला गेले होते. उपवास करणं, अनियमितपणे जेवण करणं हे पती-पत्नीच्या भांडणाचं प्रमुख कारण होतं. दरम्यान, नजीरचे भाऊ आणि मृत अफान, जुबेर यांचे काका अकबर खान म्हणाले रुक्साना आणि तिची मुले गेल्या काही महिन्यांपासून घराबाहेर आले नव्हते. तिघेही बाहेरच्या जगाशी पूर्णपणे विभक्त झाले होते. अकबर खान म्हणाले, नजीरचं घर आर्थिकदृष्ट्या खूप संपन्न आहे. तरीदेखील त्याच्या पत्नी आणि मुलांनी अशा प्रकारण उपवास करणारं आम्हा सर्वांना कोड्यात टाकणारं आहे.