जंगलातील पाणस्थळांभोवती रायमुनिया आणि बेशरम या वनस्पतींची अतोनात झालेली वाढ हे अलीकडील मानव-वन्यजीव संघर्षांचे एक प्रमुख कारण असल्याचे मत ज्येष्ठ वन अभ्यासक मारुती चितमपल्ली यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले. जंगल अनुभवातून काही गोष्टींचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर या साध्या साध्या वाटणाऱ्या या गोष्टी जंगलांची वाढ खुंटण्यात आणि वन्यजीवांचा दिनक्रम बदलण्यात कारणीभूत ठरू लागल्या असून जंगलतोड करणाऱ्या माणसाच्या जीवावर उठल्या आहेत. चंद्रपुरात अलीकडच्या दोन महिन्यांत वाघ आणि बिबटय़ांच्या हल्ल्यात १२ जणांचे बळी जाणे हा अशाच दुर्लक्षित कारणांचा परिपाक आहे, परंतु मूळ कारणांकडे वन खाते आणि स्वयंसेवी संघटनांचेही सपशेल दुर्लक्ष होत आहे, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली.
वाघ तसेच बिबटय़ांचे भक्ष्य असलेल्या तृणभक्ष्यी प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. हरीण आणि रानडुकरे हे बिबटय़ांचे प्रमुख खाद्य आहे, परंतु जंगल क्षेत्रात रायमुनिया आणि बेशरम वेगात फोफावत चालले आहे. नवेगावबांधमध्ये बेशरमाच्या वनस्पतींची समस्या प्रामुख्याने जाणवते. त्या समूळ उपटूनच नष्ट करण्याची मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्याची वेळ आली आहे. बेशरमाची मुळे समूळ नष्ट केली तरच त्यांची वाढ रोखता येऊ शकते, अन्यथा बेशरमाचे जंगल मोठय़ा प्रमाणात वाढल्याने दाट झाडीतून वाट काढणे कठीण असते आणि पाणवठय़ांवर पाणी पिण्यासाठी वन्यजीवांना जातादेखील येत नाही, या वस्तुस्थितीकडे चितमपल्ली यांनी लक्ष वेधले.
रायमुनिया ही ब्रिटिशांनी आणलेली वनस्पती आहे ज्याची काटेरी वेल आता हिंस्र श्वापदांच्या मुळावर उठली आहे. रायमुनियाच्या (लँटना) दाट जाळीत रानडुकरे आश्रय घेतात. त्यांची पिल्लेदेखील येथेच मोठी होतात. वाघ किंवा बिबटय़ाची चाहूल लागल्यावर ही पिल्ले काटेरी झुडपात शिरून स्वत:चा बचाव करतात. या जाळीत वाघ-बिबटय़ाला शिरता येत नाही, परिणामी त्यांना भक्ष्य उपलब्ध होत नाही, ही कारणेदेखील विचारात घेणे आवश्यक असल्याचे चितमपल्ली यांनी सांगितले. जमिनीत पाण्याचा पाझरा होतच नाही, कारण नवे इंजिनीअरिंग सपशेल चुकलेले आहे. नुसते सिमेंटचे रस्ते आणि गडर बांधून त्यावाटे पावसाचे पाणी थेट शहरांच्या बाहेर सोडण्यात येते. जमिनीत पाण्याचा निचरा झालाच नाही तर भूजल स्तर वाढणार कसा? असा सवाल करून जंगलातून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी अडवून धरल्यास जंगलात उन्हाळ्यात उद्भवणारी पाणीटंचाई बऱ्याच अंशी दूर करता येऊ शकते. यासाठी जंगलातील नदी-नाले-ओढय़ांच्या प्रवाहांवर प्रत्येकी ५० फुटांच्या अंतरावर बांध घातल्यास पाणी जमिनीत झिरपले जाऊ शकेल.
परिणामी जलस्रोत अधिक काळ वाहते ठेवता येऊ शकतात. खरे तर ही कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण झाली पाहिजेत. मात्र, अशी व्यवस्था नसल्यानेच आज जंगलातील वन्यप्राण्यांसाठी पाणी नाही, खाण्यासाठी अन्न नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जंगलात टँकरने पाणी पुरविण्याची वेळ आल्याने टँकर लॉबी बोकाळलेली आहे, पण अशी वेळच येऊ नये यासाठी पूर्वखबरदारी घेतली असती तर जंगलातील पाणवठे कोरडे पडले नसते आणि मानव-वन्यजीव संघर्षसुद्धा आज आहे तेवढय़ा प्रमाणात ऐरणीवर पोहोचला नसता, असे ठोकताळे त्यांनी मांडले. वनांचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी जंगलाची वाढ खुंटली असल्याचे आधी ध्यानात घ्यावे आणि असे का घडत आहे, याच्या कारणांचा शोध घेऊन उपाययोजना कराव्या अशा सूचनाही त्यांनी केल्या. यासाठी जमिनीवरील रायमुनिया तर पाणवठय़ांभोवताल बेशरम या दोन नैसर्गिक शत्रूंचा समूळ नायनाट करण्यात आला पाहिजे. दोन्ही वनस्पती जंगले संपवून टाकत असल्याने नवनव्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

तळी वाचविणे गरजेचे
खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही म्हणून बिबटे, अस्वल आणि वाघांसह अन्य वन्यप्राणी गावांच्या दिशेने धाव घेऊ लागले आहेत. यावरही उपाय आहेत, पण मूळ कारणांचा शोध घेऊन त्यानुसार पावले टाकली तरच याचा फायदा होऊ शकेल. नवेगावबांधमधील अशी तळी बेशरमाच्या वनस्पतींनी आक्रमली आहेत. ही तळी वाचविली तरच जंगलाला-गावाला पाणी मिळेल. एकटय़ा भंडारा-गोंदियात अशी १५-२० हजार तळी आहेत. पाटबंधारे विभाग, वन खाते आणि स्वयंसेवी संस्थांनी यावर विचार करावा, अशी सूचना मारुती चितमपल्ली यांनी केली.