भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावरील संशोधनास मान्यता द्यावी, या मागणीसाठी गेले दोन दिवस विद्यापीठात सुरू असलेल्या उपोषणाला शनिवारी वेगळे वळण मिळाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शनिवारी ‘माहितीचा अधिकार व उपेक्षित घटक’ या विषयावरील चर्चासत्रादरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत गोंधळ घातला. या वेळी कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनाही धक्काबुक्की झाली. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच घडलेल्या या प्रकाराची तीव्र प्रतिक्रिया उमटली. अनेक संघटनांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निषेधाचे पत्रक काढून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
सामाजिक न्याय व विशेष साह्य़ विभाग अंगीकृत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी, पुणे) या संस्थेमार्फत विद्यापीठात हे चर्चासत्र आयोजित केले होते. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या उपस्थितीत व कुलगुरू डॉ. पांढरीपांडे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र सुरू असताना तेथे आलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी कुलगुरू डॉ. पांढरीपांडे यांना घेराव घालत वरील मागणीसाठी साकडे घातले. यावेळी गोंधळ होऊन रेटारेटी झाली. कार्यकर्त्यांंच्या घेराव्यात डॉ. पांढरीपांडे यांना धक्काबुक्की झाली. मात्र, या संदर्भात उशिरापर्यंत अधिक माहिती मिळू शकली नाही. मुंडे यांची सामाजिक न्यायाची भूमिका हा विषय निवडणाऱ्या माधव फड या विद्यार्थ्यांसह कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले होते.
पीएच. डी. करण्यास मान्यतेचे पत्र द्यावे, अशी मागणी होती. या गोंधळानंतर ही मागणी अखेर मान्य करण्यात आल्याचे विद्यापीठातून सांगण्यात आले. कुलगुरूंना लक्ष्य करण्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटना, बामुटा, कास्ट्राईब या संघटनांनी जाहीर निषेध केला. संघटनेचे अध्यक्ष पर्वतराव कासुरे, डॉ. कैलास पाथ्रीकर, बामुटाचे डॉ. सतीश पाटील, डॉ. राम पवार, कास्ट्राईबचे डॉ. यशवंत खिल्लारे व डॉ. एम. डी. शिरसाठ यांनी निषेधाचे पत्रक काढून गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
विद्यापीठात घडलेला हा प्रकार दुर्दैवी असून कुलगुरूंना धक्काबुक्की ही गंभीर घटना आहे. त्याचा आपण निषेध करीत असल्याचे विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य प्रा. संभाजी भोसले, पंडित तुपे, अ‍ॅड. सुभाष राऊत यांनी या संदर्भात बोलताना सांगितले.