एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या, उपनिरीक्षकालाच मारहाणीच्या दोन घटना, प्रेमप्रकरणातून युवकाची विवस्त्र धिंड, नगर शहरात दंगलसदृश तणाव आणि सुडाच्या भावनेतून महिलेवर चौघांकडून सामूहिक बलात्कार.. गृह राज्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांच्या जिल्ह्य़ातील गेल्या तीन महिन्यातील गुन्ह्य़ांची ही मालिका.
छोटय़ा-मोठय़ा गुन्ह्य़ांनी नागरिक त्रस्त आहेतच, मात्र या ठळक घटनाच अशा आहेत की, नगर जिल्ह्य़ातील कायदा व सुव्यवस्थेबाबत वेगळे काही भाष्य करण्याची गरजच नाही. पोलीस यंत्रणेचा वचक राहिला नाही हे त्याचे प्रमुख कारण आहे, मात्र ते एकमेव नाही. जिल्ह्य़ातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्यास अन्यही काही कारणे आहेत. मागच्या वर्ष, दोन वर्षांत सामाजिक अत्याचार किंवा अशा गुन्ह्य़ांचे प्रमाण प्रचंड वाढले, ही सर्वाधिक चिंतेची बाब आहे.
सोनई (नेवासे) येथील दलितांचे तिहेरी हत्याकांड, खर्डा (जामखेड) येथील दलित समाजातीलच युवकाची हत्या, जवखेडे (पाथर्डी) येथील एकाच कुटुंबातील तिघांचे हत्याकांड तसेच वांबोरी (राहुरी) येथे युवकाची काढलेली विवस्त्र धिंड आणि अगदी ताजे राजेगाव (नेवासे) येथील ४५ वर्षीय महिलेवर चौघांनी केलेला सामूहिक बलात्कार, या सर्व घटनांमुळे राज्याची मान खाली गेली.  कायद्याची भीती नाही, हेच यामागचे मुख्य कारण दिसून येते. सोनई येथील हत्याकांडात आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला, मात्र आजूनही आरोपी तुरूंगात आहेत. उशिराने पकडलेले खर्डा येथील आरोपी तुरूंगात आहेत. जवखेडेतील तिहेरी हत्याकांडातील आरोपीही विलंबाने पोलिसांना सापडले, तेही तुरूंगात आहेत.
अशा घटनांमध्ये तपासाच्या पातळीवर समाधानकारक स्थिती असतानाही पुढचे वांबोरीचे धिंड प्रकरण, सामूहिक बलात्कारासारखी घटना जिल्ह्य़ात घडलीच.
मागच्या काही वर्षांत प्रेमप्रकरणातूनच राज्य हादरवून टाकणाऱ्या घटना जिल्ह्य़ात घडल्या. त्याने सामाजिक स्वास्थ्य संपुष्टात आले. शेवगाव तालुक्यात सराईत गुन्हेगारानेच पोलिसाची हत्या केली. श्रीरामपूर येथे महिन्याभरात दोनदा पोलिसांवरच हल्ले झाले, त्यात दोन पोलीस उपनिरीक्षकांना गुन्हेगारांकडून मार खावा लागला. पोलीसच सुरक्षित नाही, तिथे नागरिकांचे काय, अशीच स्थिती दिसते.
‘ठोस परिणाम दिसतील!’
जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांना जिल्ह्य़ातील कायदा व सुव्यवस्था बिघडली हे मान्य नाही. सामाजिक अत्याचारांची कारणे मुख्यत: लोकांच्या मानसिकतेशी निगडित आहेत. त्यावर सामाजिक जागृतीही गरजेची आहे. अन्य गुन्हेगारीत वाढ झाली हे नक्की. मात्र तपासाच्या पातळीवरही प्रभावी काम सुरू आहे, असे गौतम म्हणाले. गुन्हेगार निर्ढावल्यामुळे समाजात गैरप्रकार वाढीला लागल्याचे नाकारता येणार नाही. मात्र आता अशा गुन्हेगारांच्या विरोधात मोहीमच सुरू केली आहे. या गुन्हेगारीचा कायमस्वरूपी बीमोड करायचा तर, कठोर पावले उचलावीच लागती, ती उचलली आहेत. त्यातून काही तत्कालिक छोटय़ा-मोठय़ा अडचणी येतील, मात्र त्यांचा सामना करून त्यावर मात करू. त्याला सुरूवात आता झाली आहे. नजीकच्या काळातच त्याचे ठोस आणि दुष्ट परिणाम दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.