विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला जिल्ह्य़ात अनेक जागांवर पराभवाचा सामना करावा लागल्याची कारणे शुक्रवारी शिवसेना नेते तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई व शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी जाणून घेतली. शिवसंपर्क अभियानांतर्गत निफाड, सिन्नर, इगतपुरी, देवळाली, नाशिक मध्य, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम या विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी देसाई व तरे यांनी संवाद साधला.
राज्यात शिवसंपर्क अभियान सुरू असून त्या अंतर्गत देसाई व तरे हे नाशिक जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आले आहेत. सात विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, उप जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुख, उपमहानगरप्रमुख आदींशी देसाई यांनी विविध मुद्दय़ांवर चर्चा केली. कधी काळी नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता.
 नाशिक शहरातील देवळाली वगळता तिन्ही मतदारसंघांत सेनेला पराभवाचा सामना करावा लागला. सध्याची जिल्ह्य़ातील राजकीय परिस्थिती, शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेचा आढावा घेत उभय नेत्यांनी जनतेसाठी सामाजिक व विधायक काम करण्याचे आवाहन केले. या वेळी सहकार राज्यमंत्री दादा भुसे, उपनेते बबनराव घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आ. योगेश घोलप, शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते उपस्थित होते.