संवर्धनाकडे महाराष्ट्र सरकारचे साफ दुर्लक्ष
भारतातील एकाही प्राणीसंग्रहालयात रानम्हैस नाही, ही वस्तुस्थिती उघडकीस आली आहे. देशात एकूण १९८ नोंदणीकृत प्राणिसंग्रहालये असून त्यापैकी १४ प्राणिसंग्रहालये महाराष्ट्रात आहेत. देशभरातील प्राणीसंग्रहालयांमध्ये ४६,००३ प्राणिसंग्रहालये आहेत. यात ४३ टक्के सस्तन प्राणी, १८ टक्के सरीसृप प्रजाती आणि १ टक्के उभयचर आहेत. परंतु, एकाही प्राणिसंग्रहालयात रानम्हैस ठेवण्यात आलेली नाही. रानम्हशीची ओळख यापुढे फक्त चित्रातूननच नवीन पिढीला करून देण्याची वेळ येऊ नये, यासाठी एखाद्या तरी प्राणिसंग्रहालयात रानम्हैस ठेवावी लागण्याची वेळ येणार आहे. देशातील एकमेव बंदिस्त रानम्हशीच्या प्रजननाचा प्रयोग पुन्हा फसला आहे. त्यामुळे याची गंभीरता वाढली आहे.
जगातील रानम्हशींचे अस्तित्व धोक्यात असल्याने सर्वच देशांना यातील गांभीर्य जाणवू लागले आहे. रानम्हशींच्या संरक्षणासाठी छत्तीसगडच्या सीमेवरील कोलमरका आणि कोपेला ही दोन नवी खास अभयारण्ये विकसित करण्यासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने पुढाकार घेतल्याने रानम्हशी संरक्षणाची नवी कृती योजना पहिल्यांदाच अंमलात येईल. रानम्हशीची प्रजाती ही हत्ती आणि गेंडा प्राण्यानंतर जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक शक्तिशाली आणि सर्वात लांब शिंगे असलेली ही एकमेव सस्तन प्रजाती आहे. रानम्हशीची शुद्ध प्रजाती हा सर्वात मोठा प्रश्न वन्यजीव तज्ज्ञांपुढे आहे.
रानम्हशीची ओळख असलेल्या जनुकीय अभ्यासाच्या व्याप्तीवर सध्या संशोधन सुरू झाले आहे. भारतातच नव्हे संपूर्ण जगभरात रानम्हशींचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर होते. आज रानम्हैशींची थोडीफार वाढलेली संख्या दिसत आहे, त्याचे श्रेय आययुसीएनलाच जाते. कारण, नष्टप्राय होऊ लागलेल्या आंतरराष्ट्रीय वन्यजीवांच्या यादीत रानम्हशींना लाल सूचीत समाविष्ट केल्यानंतर याचे गांभीर्य लक्षात आले.  भारतात आसाम, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश, ओरिसा आणि महाराष्ट्राच्या काही भागात रानम्हशी शिल्लक राहिल्या आहेत. शिकार, जंगलांचा ऱ्हास आणि मूळ रानम्हशींची प्रजाती विशुद्ध होणे ही कारणे यासाठी जबाबदार आहेत.
 मूळ प्रजातीचा गावठी म्हशींसोबत होत असलेला संयोग जनुकीयदृष्टय़ा आणि शुद्ध रानम्हशीची प्रजाती अबाधित राखण्यातील सर्वात मोठा अडथळा आहे. हे पर्यावरणीय संतुलनाच्या दृष्टीने अत्यंत महागात पडले आहे. सद्यस्थितीत रानम्हशींची जगातील अंदाजित संख्या ४ हजार असून यातील ९० टक्के रानम्हशी भारतात आहेत, हीदेखील अत्यंत आशादायी बाब आहे. महाराष्ट्रात छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या कोलमरका आणि कोपेला भागात गेल्या काही वर्षांपासून रानम्हशी दिसून येत आहेत. रानम्हशींच्या अस्तित्वाचे महत्त्व लक्षात घेऊन राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने कोलमारा आणि कोपेला हा भाग अभयारण्य म्हणून घोषित करण्याची सूचना केली आहे. तरीही सरकार निर्णय घेऊ शकलेले नाही.
रानम्हशी संवर्धनाचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सरकारकडून प्रचंड दुर्लक्षित होत असून त्याची किंमत देशातील ही एक उमदी वन्यजीव जमात कायमची गमावूनच चुकवावी लागणार आहे. मध्य भारतात रानम्हशींच्या फक्त दोनच प्रजाती संरक्षित क्षेत्रात वास्तव्यास आहेत. उदांती-सीतानदी व्याघ्र प्रकल्प (छत्तीसगड) आणि प्रस्तावित कोलमरका अभयारण्य रानम्हशींच्या शुद्ध प्रजननासाठी उत्कृष्ट समजले जात आहेत. परंतु, यांची संख्या वाढवावी लागणार असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. भारत, नेपाळ, पाकिस्तान, भूतान आणि थायलंड एवढय़ाच देशात रानम्हशी शिल्लक आहेत. एवढय़ात रानम्हशींचे कळप आसामच्या  काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात आढळून येत असून संख्या दीड हजारावर आहे. अलीकडेच नागपुरात या महत्त्वाच्या विषयावरील कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय वन्यतज्ज्ञांनी हा विषय मांडल्याने याची सरकार दखल घेईल, ही अपेक्षा वाढली आहे.