सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात वाहतूक पोलिसांकडून ठिकठिकाणी वारंवार वाहनांची तपासणी करून पर्यटक व प्रवाशांना हैराण करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात एकाच मार्गाने प्रवास केला तरीही अनेक ठिकाणी वाहने व प्रवाशांची तपासणी करण्यात येते. त्यात पर्यटक व प्रवासी असतात. मुंबई-गोवा महामार्गावरदेखील तशा दक्षतेसाठी तपासणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत.
गोवा राज्यातून गोवा बनावटीची दारू मोठय़ा प्रमाणात महाराष्ट्र राज्यासह अन्य राज्यात बेकायदेशीरपणे नेण्यात येत आहे. त्या मोठय़ा गाडय़ा मात्र या तपासणीतून सहीसलामत सुटतात. मात्र किरकोळ एखादी-दुसरी गोवा बनावटीच्या दारूची बाटली गोवा परमिटवर नेणाऱ्या इसमाला त्रास देण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत.
सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक पोलीस तपासणी करत असतात असे पोलीस अधिकारी बोलताना सांगतात. पण राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील वाहतूक पोलिसांसारखा ससेमीरा पाठीमागे लागत नाही असे राजकीय नेत्यांचे म्हणणे आहे.
मध्यंतरी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचे सांवतवाडी नगराध्यक्ष बबन साळगांवकर व पत्रकारांनी वाहतूक पोलिसांच्या छळवणुकीकडे लक्ष वेधले होते. त्यावेळी पालकमंत्र्यांनीदेखील जिल्ह्य़ात एकदा वाहन, प्रवासी यांची तपासणी केल्यावर जिल्ह्य़ात ठिकठिकाणी उभे असणाऱ्या वाहतूक पोलिसांनी त्रास देऊ नये अशी योजना आखा असे निर्देश दिले होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील बहुतेक वाहतूक पोलीस प्रवासी व वाहनांच्या तपासणीसाठी हुज्जतदेखील घालतात. या वाहनात महिला असल्या तरी सौजन्यपूर्ण बोलत नाहीत, उलट त्यांच्या वर्दीतील उर्मट भाषेचा त्रासच अधिक होतो असे बोलले जात आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग पर्यटनावरदेखील परिणाम जाणवतो, असे व्यावसायिक सांगत आहेत.