त्या सभागृहात दिव्यांचा, झुंबरांचा इतका लखलखाट होता तरीही दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम प्रथेनुसार अतिशय सुंदर रीतीने सुरू होता. सुंदर मोराची नक्षी असलेली ती लख्ख उजळवलेली समई. त्या समईला गुंडाळलेला मोगऱ्याच्या फुलांचा गजरा, त्या समईभोवती काढलेली सुंदर रांगोळी, त्यातल्या त्या सात वाती.. सगळ्यांच्या हस्ते प्रज्वलन झाल्यावर त्या सातही वाती जेव्हा उजळू लागल्या तेव्हा इतर दिवे झुंबरं सगळं फिकं पडलं. काय जादू असते ना या ज्योतीमध्ये!

संध्याकाळीसुद्धा देवाशी दिवा लावल्यावर सारं स्वयंपाकघर कसं एकदम प्रसन्न वाटू लागतं. देव्हाऱ्यातल्या मूर्तीही किती चैतन्यमय वाटू लागतात. संधिप्रकाशानंतर अंधार पडू लागताना मनात दाटणारी हुरहूर या उजळलेल्या ज्योतीने कुठच्या कुठे दूर निघून जाते.. खरंच एवढीशी ज्योत पण माणसाचं मन उजळवू शकते. अवतीभोवतीचा छोटासा का होईना पण आसमंत उजळवू शकते. दिसताना अगदी छोटीशी दिसणारी ज्योत.. पण काही क्षणही तिच्यावर आपण हात धरू शकत नाही. होळीत पेटणाऱ्या अग्नीचंच खरं तर एक रूप पण त्या ज्वालांसारखं कसंही पसरणारं नाही तर अतिशय शांत आणि संयमित, चैतन्यदायक आणि आश्वासक, गंभीर तरीही प्रसन्न.. तेजस्वी आणि सात्त्विक.. आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला लावणारं. ही ज्योत पाहाताना अनेकदा विचार येतो मनात की, आपल्याला अशी ज्योत होता आलं तर.. उग्र, प्रखर, तापदायक नकोच.. तर आल्हाददायक, पण तरीही स्वत:चा आब राखणारी.. आपल्या छोटय़ा कुटुंबाला, स्नेहीजन परिवाराला उजळवणारी.. प्रसन्न प्रकाश देणारी..

siddharth chandekar shares post for chinmay mandlekar
“जहांगीरच्या नावावरून घाणेरड्या भाषेत…”, सिद्धार्थ चांदेकर ट्रोलर्सवर संतापला; चिन्मय मांडलेकरला केली विनंती
prarthana behere reveals why she left mumbai
प्रार्थना बेहेरेने का सोडली मुंबई? नवऱ्यासह ‘या’ ठिकाणी थाटला संसार; कारण सांगत म्हणाली, “अभिला सतत…”
shweta shinde recall college days memories and connection with kareena kapoor and vivek oberoi
मराठमोळ्या श्वेता शिंदेचं शाहिद कपूर, विवेक ओबेरॉय अन् करीनाबरोबर आहे खास कनेक्शन; म्हणाली, “हे कलाकार तेव्हा…”
naik family members loyal with congress and ncp entered in mahayuti
वसंतराव नाईक कुटुंबियात राजकीय फूट

खरं तर आपल्या प्रत्येकाच्या मनात कुठली ना कुठली ज्योत उजळलेली असतेच.. उत्साहाची, आनंदाची, आत्मविश्वासाची, सहृदयतेची, प्रेमाची, आशेची, श्रद्धेची, असं एक ही मन नाही की, ज्यात ज्योत नाही.. भुकेलेल्याच्या पोटात भुकेचा डोंब असला तरी मनात आशेची ज्योत असतेच.. सगळं संपलं तरी शून्यातून विश्व निर्माण करण्याची आत्मविश्वासाची ज्योत कुठल्या तरी मनात प्रज्वलित झालेली असते. ज्योत प्रज्वलित नाही, असं मन नाही.. फक्त आपल्याला मनात डोकावून बघता येत नाही! ना स्वत:च्या ना इतरांच्या म्हणून आपल्याला चिंता, काळज्या, विवंचना, कमतरता यांची वरवर चढलेली काजळी दिसते पण याच काजळीच्या खाली असणारी ज्योत दिसत नाही.. ज्याला ही छोटीशी प्रज्वलित झालेली ज्योत दिसते त्याचा मार्ग मग प्रकाशाचा बनतो.. त्या दीपकलिकेच्या मंद प्रकाशात योग्य रस्त्यावर पाऊल ठेवण्याएवढा उजेड नक्कीच असतो. पूर्ण मार्ग नाही उजळला तरी हरकत नाही निदान योग्य पाऊल टाकण्यासाठी पावलापुरता प्रकाशही पुरेसा असतो.. हा पावलापुरता प्रकाश देण्याची प्रत्येक मनाची क्षमता असते, कारण विवेकाची वात आणि विचारांचं तेल असतंच आपल्यात. कबीरजी तर पुढे जाऊन म्हणतात एकवेळ बाहेरच्या दिव्यातलं तेल संपेल, त्याची वात संपेल पण आपल्या अंतरंगात तेल आणि वातीशिवायच एक ज्योत प्रज्वलित आहे. ‘बिन बाती बिन तेल दिया जले’ हा चैतन्याचा दिवा अखंड उजळलेला आहेच. आपण प्रकाशाचे उपासक आहोत, तमसो मा ज्योतिर्गमय.. ही आपली आस आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे आपली धाव आहे. म्हणूनच आपल्या संस्कृतीला ज्ञानाचं एवढं कौतुक आहे, कारण अज्ञान म्हणजे अंध:कार. आणि हा अंधकार दूर करणारा गुरू हा म्हणूनच दिवा आहे. ‘भूतकाळाचा दुवा आणि भविष्यकाळाचा दिवा’ म्हणजे गुरू असं रवीन्द्रनाथ म्हणतात. निराश मनाच्या घनदाट काळोखात आशा प्रकाशाची एक तिरीप ही किमया करून जाते. उजळलेल्या ज्योती पाहताना मनात विचार येतो कधी अज्ञानतम दूर करणारी तर कधी निराशेचा अंध:कार दूर करणारी ज्योत आपल्याला होता आलं तर.. समाजात आपल्या भरीव कार्याने ज्ञानाचे, प्रगतीचे.. लख्ख दीप प्रज्वलित करणारी अनेक असामान्य माणसं आहेत. आपण सामान्य माणसं.. कदाचित तेवढे शक्तिशाली दीप आपण नाही बनू शकणार पण निदान छोटय़ा परिघाला प्रकाशित करणारी ज्योत तर आपण नक्कीच बनू शकू. जात्यावर दळणाऱ्या एका स्त्रीनं, समोर बसलेल्या, संसाराच्या दु:खानं खचून गेलेल्या आपल्या मैत्रिणीला सांगितलं..

सदा देखावा उजेड देखू नये अंध:कार

मग हासत हासत होतो दु:खाचा स्वीकार..

आपल्या मैत्रिणीला हे सांगणारी ही स्त्री स्वत: फार मोठी सुखात होती असं नाही, पण संसारातल्या अभावाच्या अंधारापेक्षा जे आहे त्याचा प्रकाश तिला जास्त महत्त्वाचा वाटतो. एकदा प्रकाश पाहायची सवय झाल्यावर दु:खातलं ही सुख आपण शोधू लागतो. खचून गेलेल्या मैत्रिणीसाठी ही स्त्रीच एक ज्योत ठरली.. आशेची, उत्साहाची.. असं कुणाच्या तरी आयुष्यात आपणही ज्योत बनलो तर.. बरं ही ज्योत म्हणजे ‘पूर्णमद: पूर्णमिदम् चं’ प्रत्यक्ष दिसणारं उदाहरण.. पूर्णातून पूर्ण काढलं तरी पूर्णच राहतं.. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ज्योत. एक ज्योत दुसऱ्या वातीला उजळवते, आपले सगळे गुणधर्म देऊन उजळवते पण म्हणून दुसरी ज्योत प्रज्वलित झाल्यावर पहिली ज्योत कमी होते का? नाही होत. पहिली ही पूर्ण राहते आणि दुसरीही पूर्ण उजळते. आपण आपल्या विचाराने, कृतीने, वाणीने दुसऱ्याचं मन उजळवताना नकळत आपलं ही मन प्रकशित होत असतंच.

‘जैसी दीपकलिका धाकुटी परी बहु तेजाते प्रकटी’ किती खरं वर्णन केलंय माउलींनी. त्या छोटय़ाशा ज्योतीला दीपकलिका म्हणणाऱ्या माउलींच्या प्रतिभेला काय म्हणायचं! सोनचाफ्याची नुकती उमलू लागणारी कळी संपूर्ण खोली सुगंधित करते तशी ही उजळलेली छोटीशी दीपकळी ही सारा आसमंत उजळते. आपलं मन उजळवून टाकते. या संदर्भात मागे एक छान गोष्ट वाचली होती.

एका राजाला तीन मुलं होती. तिघेही आता तरुण आणि राज्य सांभाळायला समर्थ झाले होते. राजाला एक चिंता मात्र सतत सतावत होती, आता या तिघांपैकी राज्य नेमकं द्यायचं कोणाकडे? मंत्र्याने राजाला मुलांची परीक्षा घ्यायला सांगितलं. राजाने तिघांनाही समोर बोलावलं आणि सांगितलं की, तुमचा महाल तुम्ही कुठल्याही एकाच प्रकारच्या वस्तूने भरून दाखवा. मोठय़ा मुलाने धान्याची सगळी कोठारं रिकामी केली आणि आपला महाल भरला. वडिलांना सांगितलं, ‘‘मी धनधान्याने राज्य समृद्ध करेन.’’ दुसऱ्या मुलाने राज्यभरच्या बागेतून वेगवेगळी फुलं गोळा करून आणली आणि त्याने आपला महाल भरला. वडिलांना सांगितलं, ‘‘आपल्या राज्याची कीर्ती या फुलांच्या सुगंधासारखी दश दिशांना पसरावी यासाठी मी प्रयत्न करेन.’’ तिसऱ्याच्या महालापाशी कसलीच गडबड नव्हती, धान्याच्या गोणी नव्हत्या, फुलांच्या करंडय़ा नव्हत्या.. सगळं शांत. बाबा परीक्षा घ्यायला आलेत कळल्यावर तो मुलगा उठला. महालाच्या मध्यभागी एक छोटीशी पणती ठेवली होती. ती पणती त्याने लावली आणि एका क्षणात सारा महाल प्रकाशाने भरून गेला. मुलगा म्हणाला, ‘‘बाबा, कमीत कमी साधनसंपत्तीत मी राज्याचा आणि मनाचा कोपरा न् कोपरा उजळवण्याचा प्रयत्न करेन.’’ राज्य कोणाच्या हाती सुपूर्द करण्यात आलं हे सांगायला नकोच..

दिवाळीच्या पूर्वसंध्येला आमच्या इथल्या तलावाच्या काठाकाठाने शेकडो पणत्या लावल्या होत्या. प्रत्येक जण आपली एक पणती घेऊन आला होता. दिव्याची विधिवत पूजा झाल्यावर प्रत्येकाला आपली पणती लावायला सांगितली. अतिशय तन्मयतेने प्रत्येकजण पणती उजळवत होता. हळूहळू तलावाचा काठ शेकडो ज्योतींनी प्रकाशित झाला. त्या ज्योती तर सुंदर दिसत होत्याच पण त्या उजळवणारी मंडळीही तेजस्वी भासत होती. किंबहुना ज्योत फक्त बाहेर उजळलीच नव्हती तर ती त्या सगळ्यांच्या अंतरंगातही प्रकशित झाली होती. प्रत्येक माणूस म्हणजे एक ज्योत.. वा! काही क्षण हे जे भासलं ते जर प्रत्यक्षात घडलं तर.. तर बाहेरची दिवाळी पाचच दिवस असली तरी अंतरंगात रोजच दिवाळी असेल.

धनश्री लेले

dhanashreelele01@gmail.com