मराठी चित्रपटसंगीताला एका वेगळ्याच स्तरावर नेणारी संगीतकार जोडी म्हणजे अजय-अतुल. ‘अगंबाई अरेच्चा..’, ‘सावरखेड एक गाव’, ‘जत्रा’ यांसारख्या चित्रपटांपासून ते अगदी ‘सैराट’मधील गाण्यांपर्यंत अजय-अतुलची प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच छाप पडताना दिसली. त्यातही या संगीतकार जोडीची काही गाणी म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच असते. पण नुकत्याच एका कार्यक्रमामध्ये या संगीतकार जोडीची चांगलीच तारांबळ उडाली. औरंगाबाद येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये अचानक साऊंड ट्रॅक बंद पडल्यामुळे प्रेक्षकांसमोर त्यांची तारांबळ उडालेली पाहायला मिळाल्याची चर्चा होती.

औरंगाबाद येथील अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये अजय-अतुलच्या गाण्यांचा कार्यक्रम सुरु असताना अचानकच साऊंड ट्रॅक बंद पडला आणि त्यानंतर हे प्रसिद्ध गायक गाण्याऐवजी फक्त ओठांची हालचालच करत असल्याचे काही उपस्थितांचे म्हणणे होते. या कार्यक्रमाला स्वप्नील बांदोडकर, कुणाल गांजावाला, अभिजीत सावंत, योगिता गोडबोले या कलाकारांनीही हजेरी लावली होती. दरम्यान कार्यक्रम रंगात आलेला असतानाच साऊंड ट्रॅकचा घोळ झाला आणि सारे समीकरणच गोंधळल्याचे कळते. त्यानंतर तेथे उपस्थित वादकांनी हा सावळा गोंधळ सावरण्याचा प्रयत्न केला पण तोवर हा सारा प्रकार उपस्थितांच्या लक्षात आला होता. कार्यक्रमादरम्यान काही तांत्रिक बिघाडामुळे हा सारा प्रकार घडल्याचे तेथील तंत्रज्ञांनी सांगितले. यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मकरंद अनासपुरे यांनी या घटनेला काहीसे विनोदी रुप देत प्रसंग सावरुन नेण्याचा प्रयत्न केला.

अजय-अतुल यांच्या कार्यक्रमात झालेल्या या ‘गोंधळा’मुळे सध्या विविध चर्चांना उधाण आले आहे. लाईव्ह कॉन्सर्टमध्ये कलाकार खरोखरंच गातात की नाही असा प्रश्नही रसिकांच्या मनात घर करत आहे.