बॉलिवूडचे बाजीराव – मस्तानी म्हणजेच रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी आजवर कधीच त्यांच्या प्रेमाची उघडपणे कबुली दिलेली नाही. असे असले तरी अनेकवेळा त्यांच्या वागण्यातून एकमेकांबद्दलचे प्रेम दिसून आलेय. आपल्या ‘लेडी लव्ह’साठी रणवीर काहीही करू शकतो हे त्याच्या वागण्यातून अगदी सहज दिसून येते. दीपिकाच्या हॉलिवूड पदार्पणातील ‘xXx: रिटर्न ऑफ झेंडर केज’ची हटके प्रसिद्धी असो किंवा वाढदिवसाच्या दिवशी नव्याकोऱ्या कारमध्ये तिच्यासोबत सैरसपाटा करणे असो, या अतरंगी अभिनेत्याचे तिच्यावर असलेले प्रेम नेहमीच दिसून येते. त्याचप्रमाणे दीपिकाही ‘लाइव्ह वायर ऑफ बॉलिवूड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणवीर असलेले प्रेम दाखवून देत आलीये. ही सुंदर जोडी जेव्हा एकत्र दिसते तेव्हा त्यांची नेहमीच स्तुती करण्यात येते.

वाचा : PHOTO ..असे होते सोहा अली खानचे ‘बेबी शॉवर’

सोशल मीडियावर शुक्रवारी या दोघांचा एक खास फोटो व्हायरल झाला. रणवीर-दीपिका एकमेकांच्या अगदी जवळ आल्याचे त्यात दिसले. काल हे दोघंही मुंबईतील एका ठिकाणी एकत्र दिसले. या दोन्ही गोष्टींकडे पाहता गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या ज्या चर्चा सुरु आहेत त्यांना पूर्णविराम लागला असेल असे म्हणण्यास हरकत नाही. हे दोघेही बहुधा डिनर डेटला गेले असावेत असेच दिसून येते. दोघांनीही एकाच रंगाचे कपडे घातल्यामुळे फोटोग्राफर्सच्या नजरा आपसुकच त्यांच्याकडे वळल्या. ‘जेन्टलमॅन’ला साजेसे असे वागत रणवीर स्वतः दीपिकाला गाडीपर्यंत सोडण्यासाठी गेला होता.

वाचा : PHOTO पारंपारिक पद्धतीने झाले रियाचे लग्न

रणवीर आणि दीपिका लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात शाहिद कपूर आणि अदिती राव हैद्री यांच्याही भूमिका असून, सध्या मुंबईत चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. ‘पद्मावती’ यावर्षी नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.