अभिनेता राजकुमार राव याचा ‘न्यूटन’ या चित्रपट बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकणार आहे. यंदाच्या वर्षीच्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपटामध्ये ‘न्यूटन’ चित्रपटचा खास शो दाखविण्यात येणार असल्याची माहिती राजकुमार रावने ट्विटरच्या माध्यमातून दिली. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित मासुरकर यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये राजकुमार राव एका कारखुनाची भूमिका साकारताना दिसेल. चित्रपटाचे कथानक छत्तीसगडच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाष्य करणारे असून नक्षलवाद आणि माओवादीच्या दहशतीमध्ये असणाऱ्या छत्तीसगडमधील निवडणूका पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी राजकुमार प्रयत्न करताना दिसणार आहे.

यापूर्वी राजकुमारने ‘अलिगढ’ चित्रपटातील मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अभिनयाने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. राजकुमारने आपल्या ‘न्यूटन’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन चित्रपटाच्या टीमला देखील शुभेच्छा दिल्या आहेत. या चित्रपटाच्या आपल्या भूमिकेबद्दल राजकुमार म्हणाला की, या चित्रपटात मी एका सामान्य नागरिकाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. घनदाट जंगलामध्ये नक्सलवाद्यांशी संघर्ष कथा प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. माझी भूमिका ही एका सामान्य नागरिकाची कहाणी सांगणारी अशीच आहे.

यापूर्वी हंसल मेहता दिग्दर्शित ‘अलिगढ’ या चित्रपटात मनोज वाजपेयीबरोबर अभिनेता राजकुमार राव याने स्क्रिन शेअर केली होती. मनोज वाजपेयी यांनी चित्रपटामध्ये सिरास नावाच्या प्राध्यापकाची भूमिका साकारली होती.  प्राध्यापक सिरास यांना मदत करणाऱ्या पत्रकाराच्या भूमिकेत राजकुमार दिसला होता. अभिनेता म्हणून एक तप काम केल्यानंतर राजकुमारसारख्या नव्या पिढीच्या कलाकारांबरोबर  संवेदनशील विषयावरच्या चित्रपटात काम करणे ही आपल्यासारख्या अनुभवी अभिनेत्यासाठी पर्वणी असल्याचे मनोज वाजपेयी यांनी म्हटले होते.  अलिगढ विद्यापीठातील प्राध्यापक श्रीनिवास रामचंद्र सिरास यांची सत्यकथा या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक हंसल मेहता यांनी केला होता. या चित्रपटाने देखील आंतरराष्ट्रीय महोत्सव गाजविल्याचे दिसले होते.