बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याच्या ‘रईस’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरच्या शेवटी सनी लिओनीची एक झलकही दिसते. या सिनेमात सनी, झिनत अमान यांच्या ‘लैला ओ लैला’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

शाहरुखसोबत पहिल्यांदा काम करायला मिळाले यामुळे सध्या सनी भलतीच खूश आहे. खरंतर सनीने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या सिनेमाचा ट्रेलर शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले की, ‘मनोरंजनाच्या या दुनियेत काही लोक असे असतात, जे तुमचं आयुष्य बदलून टाकतात. धन्यवाद… शाहरुख आणि राहुल ढोलकिया मला एक संधी दिल्याबद्दल.’

सनीच्या या ट्विटचे शाहरुखनेही फार प्रेमळपणे उत्तर दिले. तो म्हणाला, ‘तू फार सुंदर आहेस. ‘रईस’ सिनेमाचा एक भाग बनण्यासाठी धन्यवाद. नेहमी हसत राहा.’

दरम्यान, ‘रईस’ हा सिनेमा गुजरातच्या दरियापूरमधील अवैध दारुचा व्यवसाय करणाऱ्या अब्दुल लतीफच्या जीवनावर आधारित आहे. अब्दुल लतीफ हा दाऊच्या जवळचा व्यक्ती होता. छोटे मोठे अवैध धंदे करणारा अब्दुल अंडरवर्ल्डचा डॉन कसा झाला या भोवती सिनेमाचे कथानक फिरताना दिसणार आहे. या सिनेमातील भूमिका उठावदार करण्यासाठी शाहरुख खानने लतीफच्या मुलाचीही भेट घेतली होती. लतिफचा मुलगा मुश्ताक अहमदने शाहरुखला सहकार्य देखील केले.

या सिनेमाच्या चर्चेला नव्याने तोंड फुटले ज्यावेळी लतिफच्या मुलाने शाहरुखकडे १० कोटीची मागणी केल्याची माहिती मिळाली होती. मुश्ताकने पैशांची मागणी केल्यानंतर शाहरुखने त्याला भेटण्यास टाळाटाळ केली होती. इंग्रजी वृत्तपत्र ‘डिएनए’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुश्ताकने शहारुखकडे १० कोटीची मागणी केली होती. तसेच सध्या शाहरुखच्या सिनेमाच्या प्रदर्शनामध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी मुश्ताक तयारी करत असल्याची देखील चर्चा होती. शाहरुख खान, नवाझुद्दिन सिद्दिकी, माहिरा खान, मोहम्मद झिशान आयुब यांच्या या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सनीच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचे तर, ती सध्या ‘तेरा इंतजार’ या सिनेमाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता अरबाज खान याची मुख्य भूमिका आहे.