कै. विश्राम बेडेकरलिखित ‘टिळक आणि आगरकर’ हे सुमारे तीन दशकांपूर्वी साहित्य संघाने रंगभूमीवर आणलेलं नाटक आज २०१७ मध्ये पुनश्च रंगभूमीवर आले आहे. ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढय़ाचे नेतृत्व केले, देशाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण भूमिका निभावली, त्या महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू यांनाच नव्हे, तर तद्नंतरच्या काळात देशाचा विकास आणि आंतरराष्ट्रीय मंचावर देशाची ओळख निर्माण करणाऱ्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनाही कालबाह्य़ व संदर्भहीन ठरवण्याचे र्सवकष प्रयत्न नव्या सत्ताधाऱ्यांकडून होत असताना टिळक आणि आगरकरांसारख्या त्यांच्याही आधीच्या पिढीतल्या राजकीय-सामाजिक क्षेत्रातील धुरिणांवरचे हे नाटक रंगमंचावर आणण्याचे प्रयोजन काय असावे बरे, असा प्रश्न पडतो. एकेकाळी किती उत्तुंग उंचीचे नेते आपल्या देशात होऊन गेले, आणि आजचे आपले तथाकथित नेते काय योग्यतेचे आहेत, याची तुलना सुज्ञांनी मनोमन तरी करावी, हा नाटककर्त्यांचा हेतू असावा कदाचित. काय असेल ते असेल; परंतु यानिमित्ताने एक उत्तम नाटक पुन्हा पाहण्याची संधी रसिकांना मिळत आहे यात शंका नाही.

राष्ट्रीय विचारांचा शिक्षणप्रसार व समाजप्रबोधनाचा वसा घेऊन शिक्षण आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात एकत्रितपणे पायाभूत कार्य करणारे लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर हे दोघे मूळचे जीवश्चकंठश्च मित्र. पुढे त्यांच्यात ‘आधी राजकीय सुधारणा की आधी सामाजिक सुधारणा’ यावरून वाद उद्भवला. त्यावरून त्यांच्यात असलेले मतभेद टोकाला गेले आणि ते एकमेकांपासून दुरावले. आगरकरांनी आपल्या सामाजिक सुधारणांच्या आग्रही मतांच्या पुरस्कारार्थ ‘सुधारक’ हे स्वतंत्र पत्र काढले. ‘केसरी’ व ‘मराठा’ ही वृत्तपत्रे टिळकांच्या हाताशी होतीच. त्यांतून राजकीय सुधारणांचे प्रतिपादन टिळक हिरीरीने करत होते. याउलट, आगरकरांनी ‘सुधारक’मधून हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा-परंपरा व चालीरीतींवर घणाघाती हल्ले चढवले. त्यासाठी प्रसंगी ब्रिटिशांकरवी कायदे करून या अनिष्ट रूढी-परंपरांचे निर्मूलन करण्यासही आगरकरांचा पाठिंबा होती. टिळकांचा मात्र याला कडाडून विरोध होता. त्यांचं म्हणणं : हिंदू धर्मातील अनिष्ट गोष्टी समाजाला विश्वासात घेऊन आणि त्यांचे प्रबोधन करून हळूहळू बदलता येतील. कायद्याच्या जबरदस्तीने ते करणे योग्य नाही. त्यातही ब्रिटिशांसारख्या परकीय सत्तेच्या मदतीने या गोष्टी साध्य करायचा प्रयत्न झाल्यास हिंदू समाजाच्या एकजुटीत फूट पडेल आणि राजकीय स्वातंत्र्याच्या चळवळीचीही हानी होईल.  मात्र, आगरकर, रानडे, भांडारकर आदी समाजसुधारकांचे म्हणणे असे, की समाजातील अनिष्ट प्रथा-परंपरा समूळ नष्ट झाल्याशिवाय समाजाचे उत्थान होणे शक्य नाही. आणि राजकीय स्वातंत्र्य मिळाले तरी ते पेलण्यासाठी जी प्रगल्भता लागते, ती अनिष्ट रूढी-परंपरांच्या विळख्यात अडकलेल्या मागासलेल्या समाजात सापडणे दुर्मीळच.  खरे तर या दोन्ही विचारधारा आपापल्या ठिकाणी योग्यच होत्या. परंतु त्यातून टिळक आणि आगरकरांमध्ये वादाची ठिणगी पडून त्यांची मैत्री तुटली आणि उभयतांत कायमचे शत्रुत्व आले. इतके, की एकमेकांच्या हेतूंबद्दलही शंका घेण्यापर्यंत त्यांची मजल गेली. टिळकांनी आगरकरांना ‘देशद्रोही’, ‘बोलके सुधारक’ अशा शेलक्या शब्दांनी घायाळ केले. तर आगरकरांनीही टिळकांच्या कथनी आणि करणीतील विसंगतींकडे निर्देश करत त्यांच्यावर प्रतिगामित्वाचे आरोप केले.

Voter Sympathy, Voter Sympath gain crowd in public meeting, Chhagan Bhujbal, sharad pawar, Chhagan Bhujbal said Voter Sympathy will not win Election, nashik lok sabha seat, lok sabha 2024, elction campaign, mahayuti seat allocation,
सहानुभूतीमुळे शरद पवार यांच्या सभांना गर्दी – छगन भुजबळ यांचे मत
Krishna Janmabhoomi case mathura
‘श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद’ भाजपासाठी फायद्याचा ठरणार? मथुरावासीयांच्या काय आहेत भावना?
raj thackray mns latest news
अग्रलेख: मनसबदारच..
What Satej Patil Said?
सतेज पाटील यांचा हल्लाबोल, “भाजपा देशपातळीवर २१४ जागांच्या वर जात नाही, कार्यकर्त्यांना गाजर..”

हे सारं जरी असलं तरी या दोघांच्या कुटुंबांत निरपवाद सख्य होतं. टिळकांच्या पत्नी सत्यभामा आणि आगरकरांच्या पत्नी यशोदा यांचा परस्परांबद्दलचा जिव्हाळा कधीच आटला नाही. म्हणूनच टिळकांच्या मुलीच्या- कृष्णेच्या लग्नाचं निमंत्रण आगरकरांना देण्यासाठी सत्यभामाबाईंनी टिळकांना भाग पाडले. मात्र, तरीही त्यांच्यातले संबंध शेवटपर्यंत सुधारले नाही ते नाहीच. आगरकरांना त्यांच्या शेवटच्या आजारात टिळकांना भेटण्याची तीव्र इच्छा होती. परंतु ती अधुरी राहिली.

नाटककार विश्राम बेडेकरांनी ‘टिळक आणि आगरकर’मध्ये या दोघांतील तीव्र वैचारिक मतभेदांचा आणि त्यांच्यातील अकृत्रिम स्नेहाचा उत्कट आलेख चितारलेला आहे. एकाच वेळी राजकीय-सामाजिक मतभिन्नतेमुळे त्यांच्यात निर्माण झालेली कमालीची कटुता, त्यातून त्यांनी परस्परांविरुद्ध आपापल्या वृत्तपत्रांतून ओढलेले सणसणीत कोरडे.. आणि दुसरीकडे त्यांच्या कुटुंबांमधील अकृत्रिम स्नेह, जिव्हाळा, त्यातून निर्माण झालेली भावनिक कुतरओढ यांचे टोकदार दर्शन नाटकात घडतं. त्या काळाचे संदर्भ, त्यावेळची पुण्यातली राजकीय-सामाजिक पाश्र्वभूमी, तत्कालीन समाजमन, सुधारणावाद्यांच्या आणि त्यांना विरोध करणाऱ्यांच्या परस्परविरोधी कारवायांमुळे ढवळले गेलेले पुणे.. असा व्यापक पट विश्राम बेडेकरांनी या नाटकात उभा केला आहे. कौटुंबिक आणि सार्वजनिकतेचा हा संमिश्र, परंतु गोळीबंद आविष्कार बेडेकरांना त्यांच्या सिनेक्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवामुळे घडवता आला असणार यात संशय नाही.

आता प्रयोगाबद्दल..

दिग्दर्शक सुनील रमेश जोशी यांनी साकारलेला ‘टिळक आणि आगरकर’चा हा प्रयोग काही तांत्रिक बाबी वगळता निर्दोष आहे. पात्रनिवडीपासून प्रसंगांच्या गुंफणीपर्यंत.. तसंच त्यातलं उत्कट, तरल भाव‘नाटय़’ बाहेर काढण्याची कामगिरी त्यांनी उत्तमरीत्या पार पाडली आहे. तो काळ, त्यावेळचे संदर्भ, वातावरण, त्या काळातली माणसं, त्यांचे आचार-विचार, व्यक्त होण्याच्या मासलेवाईक पद्धती इ. नाटकात तपशिलांत उभे राहते. दोन थोर व्यक्तींमधला कडवा वैचारिक संघर्ष, त्यातून त्यांचं एकमेकांपासून दुरावत जाणं, त्यात उभयतांच्या कुटुंबांची होणारी घुसमट, बाहेरचे सामाजिक दबाव, त्याची परिणती व त्यातून उभयतांमधल्या संघर्षांला मिळणारं खतपाणी.. हे सारं त्यातल्या प्रक्षोभक, परंतु तरल नाटय़ानिशी दिग्दर्शकानं प्रत्ययकारीतेनं आकारलं आहे.

गोरक्षणासारखा सध्या पुन्हा ऐरणीवर आलेला विवाद्य मुद्दा ‘टिळक आणि आगरकर’मध्येही चर्चिला गेला आहे. आडमुठय़ा गोरक्षकांच्या टोकाच्या आग्रहातून निर्माण होणारे पेच आणि त्यावरचे टिळकांचे मत यानिमित्ताने लोकांसमोर येणे उचित ठरावे. दोन महानुभाव केवळ वैचारिक भिन्नतेपायी कधी कधी कसे खालच्या पायरीवर उतरतात, याची सखेद जाणीवही यातून होते. सुधीर ठाकूर यांनी केलेलं टिळक-आगरकरांच्या घरांचं नेपथ्य कालसुसंगत असलं तरी जुजबी वाटतं. त्यांनी प्रकाशयोजनेची जबाबदारीही सांभाळली आहे. ज्ञानेश पेंढारकर आणि नंदलाल रेळे यांनी पाश्र्वसंगीतातून नाटकाची मागणी पुरवली आहे. सुभाष बिर्जे-रमेश वर्दम (रंगभूषा), सयाजी शेंडकर-जयवंत सातोस्कर (वेशभूषा) आणि भारती माने (केश/वेशभूषा) यांनी पात्रांना ‘व्यक्तिमत्त्व’ दिलं आहे.

लोकमान्य टिळकांच्या भूमिकेत सुनील रमेश जोशी हे त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळे शोभले आहेत. टिळकांचा करारीपणा, ठाम वैचारिक बैठक, संबंध ताणले गेलेल्या आगरकरांच्या घरी लेकीच्या (कृष्णा) लग्नाचे निमंत्रण द्यावयास पत्नीच्या आग्रहास्तव नाइलाजाने जावे लागले असताना जुन्या मित्राबद्दलच्या स्नेहापोटी त्यांचे आद्र्र होणे.. असे टिळकांच्या व्यक्तित्वातील अनेकविध कंगोरे त्यांनी यथार्थपणे दाखवले आहेत. आगरकर झालेले कृश प्रकृतीचे आकाश भडसावळे अस्थम्याचे रुग्ण वाटतात. आगरकरांच्या विचारांतली तर्ककर्कशता.. किंबहुना, अतिरेकी हट्टाग्रह मुद्राभिनयासकट अवघ्या देहबोलीतून त्यांनी व्यक्त केला आहे. शेवटच्या आजारात त्यांना टिळकांच्या भेटीची लागलेली आस प्रेक्षकांचे डोळे पाणावते. नयना आपटे यांची तोंडाळ, प्रेमळ काकू लोभसवाणी. संध्या म्हात्रेंनी आगरकरांची कोकणस्थ ब्राह्मणीपणाचा अर्क असलेली, परिस्थितीने जेरीस आलेली आई वास्तवदर्शी साकारली आहे. गायत्री दीक्षित (टिळकांची पत्नी सत्यभामा) आणि अनुष्का मोडक (आगरकरांची पत्नी यशोदा) या दोघींनीही आपल्या पतींच्या वैचारिक संघर्षांपायी व त्यातून उद्भवलेल्या सामाजिक रोषास सामोरे जातानाची घुसमट, कोंडमारा व सोशीकता नेमस्तपणी व्यक्त केली आहे. विक्षिप्ताचार्य गोपाळराव जोशी (पहिल्या भारतीय महिला डॉ. आनंदीबाई जोशी यांचे पती) यांच्या भूमिकेत जगदीश जोग फिट्ट आहेत. अथर्व गोखलेंचा नाना आगरकर बोलभांड कार्यकर्त्यांचा नमुना ठरावा. श्वेता सातवळेकर (यमी), बहार भिडे (शास्त्रीबुवा/ भटजी) आणि हर्षल सूर्यवंशी (लखोबा/ गृहस्थ) यांनी चोख कामं केली आहेत.