श्रेया अतिशय बोलक्या स्वभावाची. सर्वावर प्रेम करणारी. त्यांचा आदर करणारी. श्रेयाच्या सासरचे आणि माहेरचे सर्वच जण तिच्याशी चांगले वागत. याचे कारण तिचा माफ करण्याचा स्वभाव. त्यांनी चुका करायच्या, तिला गृहीत धरायचे आणि तिने मात्र मोठय़ा मनाने सारे विसरून त्यांना पाठीशी घालायचे. श्रेया लहानपणापासूनच हे करत आली आहे. अजूनही करते आहे. परंतु सतत ‘वाइझ गर्ल’ची भूमिका निभावून आता ती कंटाळली आहे. तिच्यापाशी सारेच आपले मन मोकळे करतात. तिचा सल्ला घेतात. परंतु श्रेयाला मात्र स्वत:शीच आपले मन मोकळे करावे लागते. ती एक लेक आहे, बहीण आहे, पत्नी आहे, आई आहे, व्यावसायिक आहे. ही सारी नाती तिला एकटीलाच निभावावी लागतात. मात्र, तिने नेहमी इतरांना समजून घ्यावे, धोरणीपणाने व हुशारीने वागावे असे गृहीत धरले जाते. पण तिलाही भावना, संवेदना,मते आहेत, हे इतरांच्या लक्षातच येत नाही. ही सारी नाती निभावून नेत असताना तिचे एकटेपण तिला जाणवत राहते. परंतु सांगणार कोणाला? दर्शवू गेले तरी कळणार कुणाला? समजा- कळले, तरीही कुणाला ते जाणवेल, पटेल याची खात्री नाही. तसेच त्यावर कुणी काही करेल ही शाश्वतीही नाही. हे एकटेपण स्वैर वागण्याची इच्छा बाळगून स्वत:साठी अवकाश निर्माण करणाऱ्याचे नाही, तर नात्यांबद्दल रंगवलेल्या काहीएक कल्पना उराशी बाळगणाऱ्या, परंतु त्यांचा चक्काचूर झालेल्या अवस्थेत जगणाऱ्या व्यक्तीचे आहे. अशा व्यक्तीवर परिस्थिती, इतरांचे वागणे, दृष्टिकोन किंवा कधी त्यांच्या स्वत:च्याच विशिष्ट निवडीमुळे हे एकटेपण लादले गेलेले असते.
प्रत्येक नाते हे आपले वैशिष्टय़ घेऊन येत असते. त्यात कडू-गोड गोष्टी सामावलेल्या असतात. त्या दोन व्यक्ती ते नाते जितके एकत्रितपणे बहरवतात तितके ते दीर्घकाळ ताजे राहते. पण ही जबाबदारी नात्यातल्या एकानेच सतत बजावली तर त्या व्यक्तीला काही काळाने रीतेपणाचा अनुभव येऊ शकतो. एखाद्या नात्यात प्रत्येक गोष्ट, निर्णय वा निवड जर कुणा एकाच व्यक्तीच्या मनासारखी सतत होत राहिली तर ते नाते म्हणजे केवळ उपचार बनतो. समोरची व्यक्ती त्या नात्यामध्ये कुठेच नसते. हेच ते एकटेपण. म्हणजे वरकरणी त्या नात्याचे नाव मोठे; परंतु आतून सारंच पोकळ. नात्यात ती व्यक्ती असते, मात्र दिसत नाही. ती हाक मारते, पण कुणी प्रतिसाद देत नाही. ती व्यक्ती बोलते, पण कुणालाच ते ऐकू जात नाही. ती व्यक्ती तिची बाजू समजावयाला गेल्यास समोर समजून घेणारा कुणीही नसतो. असे हे नात्यातले एकटेपण. त्या व्यक्तीला स्वत:ला प्रकर्षांने जाणवणारे; परंतु इतरांना ते समजावता न येणारे.
आपल्यापैकी बहुतेकांनी ही भावना कधी ना कधी अनुभवली असेल. काहींना तर ती सवयीचीच असेल. त्यामुळे स्वाभाविकही वाटू लागली असेल. ही भावना अल्प काळ असो वा दीर्घ काळ; तिचे पडसाद तुमच्या जीवनात उमटतातच. नैराश्याकडे ढकलण्याची ताकद असणाऱ्या तसेच शरीरस्वास्थ्यावर विपरीत परिणाम करू शकणाऱ्या या भावनेला वेळीच आळा घालणे गरजेचे असते. या एकटेपणाचे घाव मनावर बसत राहतात. त्यामुळे त्यावर त्वरित मलमपट्टी करणे योग्य. एकटेपणाने ग्रासलेल्या व्यक्तींना त्या भावनेशी लढा देण्यास साहाय्य करणे हे आपले कर्तव्य आहे. एकटेपणाच्या या भावनेमुळे व्यक्तीचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही प्रभावित होतो. याउलट, काहीजण असेही मानतात, की भोवतालच्या जगामुळे आपल्याला एकटेपण आले. या दोन्हीही गोष्टी खऱ्या असतात. नात्यात एकटेपण जाणवायला लागले की आपण इतरांच्या निष्काळजीपणाची, निष्ठूरपणाची चर्चा करतो आणि एकटेपणाची भावना अधिकच तीव्र होते. एकटेपण चक्रव्यूहासारखे आहे. एकदा का आत शिरलो की वेळीच बाहेर पडण्यासाठी पावले न उचलल्यास त्यात आपण अडकतच जातो. आणि काही काळानंतर आपला आत्मविश्वास ढासळून हीच आपली योग्यता आहे असे वाटू लागते. आणि त्यास आपणच कारणीभूत आहोत असे वाटू लागते. त्यामुळे एकटेपणामागचे कारण काहीही असले (म्हणजे त्यासाठी आपणच दोषी असो वा नसो, इतरांची चूक असो वा नसो) तरी ती भावना नष्ट करणे गरजेचे आहे.
एकटेपणाशी झगडून ते नष्ट करण्याचे काही मार्ग-
* दुसरे कुणीतरी आपल्याला या दुष्टचक्रातून बाहेर काढेल, अकस्मात काही जादू होऊन परिस्थिती बदलेल, काळ सरेल तसे सारे ठीक होईल अशी निष्क्रिय भूमिका घेण्यापेक्षा आपण स्वत:च त्याबद्दल पाऊल उचलून एकटेपणाची ही भावना मनातून काढून टाकण्यासाठी स्वत:च पुढे सरसावायला हवे. सुरुवातीला भीती वाटेल, नकोसे वाटेल, पण तरी प्रयत्न जारी ठेवायला हवेत. निदान प्रयत्न केल्याचे तरी मनाला समाधान वाटेल. अंधारातून सूर्यप्रकाशात गेल्यावर प्रथम डोळे दिपतात, परंतु कालांतराने सूर्याची ऊब हवीहवीशी वाटू लागते.
* नात्याचे स्वरूप लक्षात घेऊन तुटलेली भावनिक नाळ पुन्हा कशी जोडता येईल याची चाचपणी करावी. इतरांच्या भूमिकेतून त्यांचे आयुष्य व आपले नाते पाहण्याचा प्रयत्न करावा. नेमके कुठे चुकते आहे, हे ओळखण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. आपला राग, निराशावाद, अवास्तव भूमिका, अपेक्षा, नकारात्मक दृष्टिकोन हेच तर आपल्या एकटेपणाला जबाबदार नाहीत ना, याचा मागोवा घ्यावा. जमल्यास हे रीतसर लिहून काढावे. नात्याला पोषक व बाधक वर्तनांची यादी तयार करावी. पोषक वर्तनांचे प्रमाण व पातळी वाढेल यासाठी प्रयत्नशील असावे. आपल्याला बऱ्याचदा याची उत्तरे मिळतील, परंतु परिस्थितीचा दोष जास्त असल्यास (जो निश्चित असू शकतो.) मात्र आपल्याला स्वसंरक्षक भूमिका घेण्याची गरज भासू शकते. आपण वस्तुस्थितीनिष्ठ वागत असल्याचे आपल्याला वाटत असेल (जे योग्य विश्लेषण असेल वा नसेल; पण त्याची स्वत:शी प्रामाणिक, विश्लेषणात्मक संवाद साधून वा एखाद्या विश्वसनीय व्यक्तीशी संवाद साधून खात्री करून घ्यावी.) तर मात्र आपल्या प्रयत्नांची दिशा भिन्न होऊ शकते. आपला मोर्चा मग स्वत:कडे वळवावा लागेल. आपल्या प्रगतीचे ध्येय आपण योजावे व त्याजोगे मार्गक्रमणही. भावनिक एकटेपणाच्या भावनेचे नियोजन करताना एक सत्य आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. ते म्हणजे या नात्यापलीकडेही जग असून त्या जगातही आपले काही स्थान असते. आणि एकटेपणाशी झुंज देताना त्या जगातील आपला वावर सुरू ठेवणेही गरजेचे व उपयुक्त आहे. आपल्यावर अपेक्षारहित प्रेम करणाऱ्या, आपले कौतुक असणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात राहावे. त्यांचे आपल्याबद्दलचे प्रेम व कौतुक ही आपली ऊर्जा ठरू शकते. एकटेपणामुळे लादल्या गेलेल्या हताश क्षणांकडे असहायतेने पाहण्याऐवजी त्या क्षणांचा स्वत:च्या उन्नतीसाठी कसा उपयोग करता येईल याचा विचार करावा. आपल्या आवडीनिवडी, छंदांसाठी वेळ राखून ठेवावा. त्यांची जोपासना करावी. हे स्वैर वागणे नसून एकटेपणाला छेद देण्याची ही प्रक्रिया समजावी.
ही भूमिका व हे मार्ग पुरेसे नसले तरी उपयुक्त मात्र आहेत. एकटेपणाकडे बिचारेपणाच्या दृष्टिकोनातून न पाहता स्वत:जवळ जाण्याची संधी म्हणून पाहावे. अर्थात सामाजिक जीवन हे मनुष्याच्या आयुष्याचे अविभाज्य अंग आहे. त्यामुळे एकटेपणाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहताना दीर्घकाळ कोषात अडकून पडू नये, हेही खरे. कारण स्वत: निवडलेले एकटेपण आणि लादले गेलेले एकटेपण या दोन्ही मानसिकता भिन्न आहेत आणि त्यांचे पडसादही. यात आपण कोणत्या साच्यात बसतो हे आजमावावे आणि योग्य तो मार्ग निवडावा. एकटेपणा नव्हे, तर एकत्रितपणा हीच मनुष्याची खरी शक्ती आहे. त्यामुळे आपले ध्येय गाठण्यासाठी स्वत:ला प्रलोभनांपासून दूर ठेवून विचलित न होण्याकरता निवडलेले एकटेपण हे काही अंशी योग्य असले तरीही लादले गेलेले भावनिक एकटेपण हे मात्र आपली मानसिक स्थिती पोखरून टाकते. त्यामुळे भावनिक बंधांच्या सशक्तीकरणाकडे लक्ष द्यावे, हे केव्हाही योग्य.
केतकी गद्रे – ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
model code of conduct for general elections by central election commission
पहिली बाजू : आचारसंहिता : रोखठोक तरीही मानवी!
Ram Navmi 2024 Ram Raksha Stotra Reading Benefits in Marathi
Ram Navami 2024 : जाणून घ्या ‘रामरक्षा’ अन् भगवान शंकराचा ‘हा’ संबंध; पाहा, दररोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याचे फायदे
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र