“हॅलो, स्वरुप ऐक ना.. प्लीज लोअर परेलमधल्या पबमध्ये येतोस का लवकर? तुझी हेल्प हवीये यार.. इमर्जन्सी आहे.. सुरभी खूप प्यायलीये.. ती आऊट ऑफ कंट्रोल झालीये..” अंतरानं खूप घाईघाईत स्वरुपला कॉल केला.

“हॅलो, अंतरा का? मी स्वरुपचा बाबा बोलतोय.. अगं स्वरुप बाल्कनीत आहे. काय झालंय नेमकं?” स्वरुपच्या बाबांनी नेमकं काय घडलंय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला..

“काका, प्लीज स्वरुपला फोन देता का? खूप महत्त्वाचं काम आहे?”

“हो देतो…” स्वरुपचे बाबा स्वरुपकडं फोन देतात.. अंतरासोबत बोलल्यावर स्वरुप तात्काळ घरातून निघतो.. स्वरुपच्या बाबांनी त्याला काय झालंय, हे विचारण्याचा प्रयत्न करतात.. पण स्वरुप आल्यावर सांगतो, असं म्हणून घरातून निघातो..

स्वरुप धावत धावत बिल्डिंगच्या खाली आला.. गाडी काढली आणि वेस्टर्न एक्सप्रेस वेनं वेगाने लोअर परेलच्या दिशेने निघाला.. रस्त्यावर गाडी आणि मनात विचार वेग धरु लागले.. सुरभी प्रचंड दारु प्यायलीये आणि ती आऊट ऑफ कंट्रोल झालीये, हे अंतराचे फोनवरचे शब्द स्वरुपच्या कानात घुमत होते.. स्वरुप आणि सुरभीच्या ब्रेकअपला दोन वर्षे उलटून गेली असताना अचानक सुरभी असं काही करेल आणि तिची अशी भेट घडेल, असा विचारदेखील स्वरुपने केलेला नव्हता.. स्वरुप अवघ्या काही मिनिटांमध्ये लोअर परेलमधल्या पबजवळ आला.. सुरभी खरंच प्रचंड प्यायलेली होती.. तिच्या आसपास असणाऱ्या मित्र मैत्रिणींपैकी स्वरुपच्या ओळखीचं असं कोणीच नव्हतं.. अपवाद फक्त अंतराचा.. सुरभीचा नवा ‘मित्र परिवार’ कसा आहे, ते स्वरुपला एका नजरेत समजून आलं..

अंतराच्या मदतीनं स्वरुप सुरभीला गाडीत मागच्या सीटवर ठेवलं. अंतरादेखील सुरभीसोबतच मागच्या सीटवर होती… सुरभी दारुच्या नशेत बरळत होती…

“हे नेमकं काय सुरूये अंतरा? तुम्ही दोघी कोणासोबत गेला होतात? सुरभीला हे दारुचं अॅडिक्शन केव्हापासून?”, स्वरुपने गाडी चालवता चालवताच विचारलं..

“अरे हे सुरभीचे नवे फ्रेंड्स होते..”

“नवे फ्रेंड्स का? आणि फक्त सुरभीचे? तुझे नाही का?”, स्वरुपनं सुरभीचं नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी आणखी काही प्रश्न विचारले…

“ते माझे फ्रेंड्स नाहीत… ते फक्त सुरभीचे आहेत.. मी फक्त सुरभीला कंपनी देण्यासाठी आले.. आणि आता असं वाटतंय बरं झालं मी आले.. अन्यथा काय झालं असतं कुणास ठाऊक…” अंतराच्या चेहऱ्यावर सुरभीबद्दलची काळजी अगदी स्पष्ट दिसत होती.. सुरभी मात्र अजूनही शुद्धीवर नव्हती..

“अंतरा, तुझ्या घरी नेऊया का सुरभीला? कारण तुझे आई-बाबा बाहेरगावी असतात.. सुरभीच्या आई वडिलांना तिला या अवस्थेत पाहिलं तर खूप प्रॉम्बेल होईल.. त्यांना नाही पाहवणारं सुरभीला या अवस्थेत..” सुरभी, तिच्या आई-वडिलांविषयीच्या आपुलकीच्या भावनेनं स्वरुप म्हणाला…

अंतरानं होकार दिला… स्वरुप आणि अंतरा सुरभीला अंतराच्या घरी घेऊन आले.. सुरभी आता थोडी शांत वाटत होती.. थोड्या वेळानं ती झोपली.. सुरभीला झोप येईपर्यंत स्वरुप तिच्या बेडजवळ बसून होता.. सुरभी झोपल्यावर अंतराने घडलेला सारा प्रकार स्वरुपला सांगितला.. सुरभी आणि स्वरुपचे ब्रेकअप झाल्यावर सुरभी खूपच बिनधास्त वागू लागली होती.. आपल्याला काहीच फरक पडलेला नाही, आपण अगदी मजेत आहोत, असं दाखवण्याचा तिचा प्रयत्न होता.. त्यामुळंच मग आऊटिंग, पार्ट्या, धमाल हे सगळं सुरभीचं रुटिन बनलं होतं..

सुरभीत झालेला हा बदल स्वरुपसाठी नाही म्हटलं तरी धक्कादायक होता… सुरभी शांत झोपली आहे, हे पाहून स्वरुप तिथून निघाला.. पार्किंगमधून गाडी काढली आणि घराच्या दिशेने निघाला… दोन वर्षांपूर्वी सुरभी जे काही वागली, ती ज्या पद्धतीने अचानक सोडून गेली यापेक्षा आता सुरभी ज्या स्थितीत आहे, त्याचं दु:ख स्वरुपला जास्त होतं.. गाडी एकापाठोपाठ एक पूल चढत उतरत होती.. स्वरुपला त्याचं कॉलेजपासूनच रोलर कोस्टर राईड झालेलं आयुष्य आठवलं…

सिनिअर कॉलेजमध्ये स्वरुपनं पहिल्यांदा सुरभीला पाहिलं होतं.. स्वरुपचं ज्युनियर कॉलेजचं शिक्षणदेखील त्याच कॉलेजमध्ये झालं असल्यानं त्याच्यासाठी काहीच नवं नव्हतं.. सुरभीसाठी मात्र सारं काही नवं होतं.. नेहमी मुलींपासून चार हात लांब राहणाऱ्या, कट्ट्यापेक्षा लायब्ररीत रमणाऱ्या आणि फेस्टिव्हलच्या टाईम टेबलपेक्षा एक्झामच्या टाईम टेबलची अधिक चिंता असणाऱ्या स्वरुपची कळी सुरभीला पाहताच खुलली होती.. मात्र सुरभीला थेट जाऊन काही बोलण्याइतकी हिंमत स्वरुपमध्ये नव्हती.. त्यामुळे त्याने सुरभीची मैत्रीण अंतरासोबत मैत्री केली..

दिवस पुढे सरकत होते.. नोट्स एक्सचेंज करण्याच्या निमित्तानं अंतरा आणि स्वरुपचं बोलणं व्हायचं.. सुरभी अंतराची खास मैत्रीण… त्यामुळे मग स्वरुप आणि सुरभीचंदेखील बोलणं होऊ लागलं.. सुरभीचं ड्रेसिंग तसं मॉडर्न होतं… म्हणजे आपली असलीच एखादी गर्लफ्रेंड तर ती फारफार तर कुर्ती घालेल… अन्यथा पंजाबी ड्रेस बेस्टच, असा स्वरुपचा विचार होता… मात्र स्वरुपचा ड्रेसिंगबद्दलचा विचार जिथे संपायचा, तिथून सुरभीचा विचार सुरू व्हायचा… त्यामुळे अगदी मॉर्डन टॉप, त्यावर अॅक्सेसरिज आणि जिन्स… अशाच ड्रेसिंगमध्ये सुरभी कायम स्वरुपला दिसायची… मात्र का कोण जाणे, स्वरुपला सुरभी खूप आवडायची..

ती तुझ्या टाईपची नाही, असं अंतरानं वारंवार स्वरुपला सांगितलं होतं… मात्र स्वरुप काही ऐकायला तयार नव्हता.. एव्हाना सुरभी आणि स्वरुपचीदेखील चांगली मैत्री झाली होती… दोघेही फिरायला जायचे… स्वरुप आधीपासूनच हुशार होता… सुरभीसोबत राहून स्वरुपदेखील आजकाल कँटिनमध्ये दिसायला लागला होता… मात्र स्वरुप मित्रांपासून दुरावला होता… सुरभीच त्याचं विश्व बनली होती.. रात्ररात्रभर दोघे एकमेकांशी बोलायचे.. सोबत कॉलेजला यायचे-जायचे.. अखेर सेकण्ड इयरला असताना स्वरुपनं सुरभीला प्रपोज केलं… सुरभीनं कोणतेही आढेवेढे न घेता होकार दिला.. तो दिवस स्वरुपच्या आयुष्यातला सर्वाधिक आनंदाचा दिवस.. ‘आज में उपर आसमा निचे..’, ‘ऐ काश के अब होश में अब आने ना पाये’, अशी गाणी गातच स्वरुप घरी परतला..

स्वरुप आणि सुरभीचं काही दिवस अगदी व्यवस्थित सुरू होतं.. पण माणसाचा मूळ स्वभाव बदलता येत नाही.. एका बाजूला स्वरुपचं चौकटीत जगणं, त्यात सुरभीला बंदिस्त करु पाहणं आणि दुसऱ्या बाजूला सुरभीचं स्वच्छंदी जगणं, यातून दोघांमध्ये प्रचंड वाद होऊ लागले.. बंदिस्तपणामुळं सुरभीची घुसमट होऊ लागली तर सुरभीच्या स्वच्छंदी जगण्यामुळं स्वरुपची फरफटत होत होती.. अखेर लास्ट इयरला असताना सुरभीनं ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.. “आपण यापुढं एकत्र राहू शकत नाही.. शक्य असेल तर मला विसर.. मात्र तुझ्यासोबत राहणं मला शक्य नाही…” इतके मोजके शब्द अगदी कठोरपणे बोलून सुरभी निघून गेली… स्वरुप त्यानंतरचे कित्येक दिवस रडत होता…

दोन वर्षांपूर्वी घडलेलं सारं आजही स्वरुपला अगदी लख्ख आठवतं होतं…

बिल्डिंगचे गेट आल्यावर स्वरुपच्या गाडीची आणि मनातील विचारांची गती मंदावली.. सुरभी नीट झोपली असेल ना, तिची तब्येत ठिक असेल ना, असे अनेक प्रश्न स्वरुपच्या मनात येत होते.. सकाळी सुरभीला भेटून येऊ, या विचाराने स्वरुप झोपलाच नाही.. सकाळी लवकर तो अंतराच्या घरी गेला… सुरभी उठून बसली होती… स्वरुप काही बोलणार इतक्यात सुरभीने स्वरुपला मिठी मारली…

“मी नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय… इतके दिवस प्रयत्न करतेय… स्वत:ला सांगतेय सगळं काही व्यवस्थित आहे… अरे पण मी सगळ्यांना फसवू शकते… स्वत:ला कशी फसवू… तू प्लीज नको ना सोडून जाऊस…” सुरभीची दारु पूर्ण उतरली होती… तिच्या डोळ्यांमधून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या… स्वरुपच्या डोळ्यांच्या कडादेखील ओल्यावल्या होत्या…

“मी कुठे तुला सोडून गेलो होतो.. तूच गेलीस ना अचानक..? मला काहीही बोलण्याची संधी न देता..” स्वरुपचा आवाज कातर झाला होता..

“मान्य आहे.. चूक माझीच आहे.. तीच तर सुधारण्याचा प्रयत्न करते आहे.. प्लीज तू मला माफ कर.. यापुढं मी कधीही तशी वागणार नाही… प्रॉमिस…”

यानंतर सुरभी स्वरुप पुन्हा एकत्र आले… त्यांच्यात सर्वकाही सुरळीत सुरू होतं… पण मधल्या काळात जे काही झालं होतं, त्यामुळं सुरभीच्या अभ्यासाचा खेळखंडोबा झाला होता.. स्वरुपचं मात्र व्यवस्थित सुरू होतं.. मल्टिनॅशनल कंपनीची चांगली नोकरी होती… गाडी घेतली होती… त्या तुलनेत सुरभी खूप मागे राहिली होती.. दारुच्या आहारी गेल्यानं मधल्या काळात सुरभीचं खूप नुकसान झालं होतं.. मात्र सुरभी आणि स्वरुपच्या एकत्र येण्यात या गोष्टीचा अडथळा येत नव्हता.. त्याचं छान चाललं होतं.. स्वरुपचं ऑफिस आणि सुरभीचा अभ्यास सुरू होता… पण मधल्या काळातल्या गोष्टींमुळं सुरभीला अभ्यास नीट जमत नव्हता.. त्यात दारुच्या अॅडिक्शनमुळं तिचं अभ्यासाकडं दुर्लक्ष होतं होतं..

एके दिवशी स्वरुपने सुरभीला नेहमीप्रमाणे कॉल केला.. कॉल रिसिव्ह झाला नाही.. स्वरुपनं पुन्हा पुन्हा कॉल केला… मेसेज केले… समोरुन उत्तर येत नव्हतं.. स्वरुप सुरभीच्या घरी गेला.. घराला कुलूप होतं.. सुरभीचे आई-बाबा खूप दिवसांपूर्वीचे परदेशी गेल्याचं शेजाऱ्यांकडून कळलं… पण दररोज घरी येणारी सुरभी काल आलीच नाही, अशी माहिती शेजारच्यांनी दिली… विशेष म्हणजे अंतरालाही काहीच माहिती नव्हतं.. सर्व काही व्यवस्थित सुरू असताना सुरभी अचानक गेली कुठं, असा प्रश्न स्वरुपला पडला.. आपल्या सुखाला नेमकी कोणाची नजर लागली, याचा विचार करुन स्वरुप रडवेला झाला…

क्रमश:

– तीन फुल्या, तीन बदाम

 

© सर्व हक्क सुरक्षित