अखेर त्याला हवीहवीशी वाटणारी संध्याकाळ उजाडली. ते दोघे एकमेकांपासून थोड्याच अंतरावर असलेल्या आपापल्या ऑफिसमधून बाहेर पडले. रस्ता क्रॉस करून मरिनड्राईव्हची समुद्राची बाजू गाठेपर्यंत दोघांनी आपापल्या ऑफिसच्या गप्पा मारल्या. मात्र आता त्याला थेट मुद्द्यावर यायचं होतं, दोघांच्या गप्पांमध्ये तिसरं कुणी नको होतं. दोन दिवसांपूर्वीच पहाटेपर्यंत व्हॉटसअपवर गप्पा मारताना त्याने तिला थेट , तू मला आवडत असल्याचं सांगितलं होतं. म्हणजे तो नेहमीच सांगायचा पण तिला त्याचं बोलणं नौंटकी वाटायचं. अखेर त्याने थेट कबुली दिल्यानंतर तिने अपेक्षेप्रमाणे ‘थँक यू’ म्हणत त्याला गोडपणे नकार दिला. मात्र, वेळ कमी असल्याने त्याने ठरवल्याप्रमाणे मनाचा हिय्या करून तिला सगळ्या गोष्टी सांगून टाकल्या. मग तिने मी तुझ्याबद्दल अजून तसा विचार केलेला नाही आणि आपण ट्राय करून पाहायचा विचार केला तरी तशी परिस्थिती नाही, हे सांगून तो ‘कमिटेड’ असल्याची आठवण करून दिली. त्यानंतर त्याच्या मोबाईलची बॉटरी संपेपर्यंत दोघेहीजण या गुंत्यांचा सोक्षमोक्ष लावायचा की हे सगळं चालतंय तोपर्यंत एन्जॉय करायचं यावर बोलत राहिले. त्यानंतर झोप लागेपर्यंत त्याच्या मनात तिचाच विचार घोळत होता.

तिने माझ्यात गुंतू नकोस , मी होपलेस आहे सांगत त्याला हे सगळे इथेच थांबवू असं स्पष्ट सांगितलं होतं. पण मनात कुठेतरी ‘पिक्चर अभी बाकी है’ असं वाटत असल्याने त्याने स्वत:च्या मनाला फ्री-हँड देण्याचा निर्णय घेतला आणि झोपी गेला.

All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
supercars parked in gated society in Bengaluru
प्रत्येक घरासमोर उभ्या आहेत आलिशान ‘Supar Cars’; विदेशातला नव्हे भारतातील ‘या’ शहरातला आहे VIDEO
EVM and VV Pat Controversy Occurs Frequently
विश्लेषण : ईव्हीएममध्ये नोंदलेल्या प्रत्येक मताची पडताळणी शक्य आहे का? ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅट वाद वारंवार का उद्भवतो?
mutual fund, multi cap fund
मल्टिकॅप फंड : त्रिवेणी संगम…

त्यामुळे आजच्या भेटीत काय घडणार याचं त्याला टेन्शन आलेलं. तसं ते त्याला नेहमीच यायचं प्रत्येक गोष्टीचं. मात्र, ती भेटल्यापासून त्याचं सगळंच बदललं होतं. ती होतीच तशी… बिनधास्त, बोल्ड आणि प्रत्येकाला आपलसं करणारी. काजळ घातलेले तिचे डोळे आणि कुरळे केस तिच्या ल्युनाटिक पर्सनॅलिटीला चार चॉंद लावायचे.. हो ती होतीच ल्युनाटिक, चंद्राच्या दरदिवशी बदलत्या कलांप्रमाणे रोज तिच्यातला नवा वेडेपणा पाहायला मिळायचा… अर्थात त्याला तो हवाहवासा वाटायचा… तिला एकाजागी थांबायला किंवा गुंतायला आवडायचं नाही हे त्याला पुरेपूर माहित होतं.. तर तो या सगळ्याच्या उलट… तुसडेपणाच्या जवळ जाणारा अबोलपणा, मूर्तिमंत माणूसघाणेपणा आणि कमालीचा निरूत्साही.. केवळ मोजक्या लोकांमध्ये तो खुलायचा … एरवी प्रत्येकाशी मोजूनमापून बोलत ठराविक अंतर ठेवायची त्याची पद्धत होती. मात्र तिच्याशी ओळख झाल्यापासून तो अगदी पहिल्या चँटिंगपासून तो तिला सगळं मोकळेपणाने सांगायचा, अगदी पूर्वीची ओळख असल्यासारखा. तीदेखील त्याला तिच्या कोणालाच माहित नसलेल्या गोष्टींबद्दल सांगायची.. उदा: मी घरात देवासमोर दिवा लावते, सगळ्यांच्या पाया पडते आणि सरकारच्या पंचवार्षिक योजनेप्रमाणे रेंगाळत सुरू असलेली तिची लव्ह लाईफ इत्यादी.

मरिनड्राईव्हवर आज नेहमीपेक्षा जास्तच गर्दी होती. त्यामुळे त्याला बसायला मनासारखी जागा मिळत नव्हती. कशाला तडमडायला येतात इकडे लोक हा नेहमी गर्दी बघितल्यावरचा त्याचा ट्रेडमार्क विचार नेहमीप्रमाणे मनात चमकून गेला. पण आपल्यासारखंच अनेकजणांना मनं मोकळं करायला समुद्राचाच आधार वाटला असेल, ही अपरिहार्यता लक्षात आल्यानंतर त्याने सगळ्यांना समुद्रात ढकलून द्यायचा मगाचचा विचार बदलला. तब्बल अर्धा किलोमीटर चालल्यानंतर तिला चंद्र दिसत असलेली मनासारखी जागा मिळाली. तिने हसत हसत इथेच बसूया म्हटलं. हनुमानाने सूर्याबरोबर चंद्रालाही का गिळलं नाही, याचं त्याला वैषम्य वाटलं. त्यालाही चंद्र आवडायचा पण आताच्या क्षणी तो चंद्राविषयी जेलस फिल करत होता. सगळं थोडं स्थिरस्थावर झाल्यानंतर त्याने बोलायला सुरूवात केली. परवा रात्री आपणं बोललो ते काय होतं ?

फ्लर्टिंग करत होतास तू माझ्याशी हे बोलून ती हसली. षटकातला पहिलाच चेंडू बॉडीलाईन आल्यानंतर गांगरलेल्या फलंदाजाप्रमाणे तो प्रचंड कातावला.

अरे तू ऑलरेडी रिलेशनमध्ये आहेस ना ? काय चाललंय तुझं ? या तिच्या जाणूनबुजून टाकलेल्या प्रश्नार्थक बाऊन्सरने तो आणखी घायाळ झाला.

झक मारली आणि इथे आलो. हिच्यामागे लागण्यात काही अर्थ नाही. आता काहीतरी बोलून इथून दहा मिनिटांत निघायचं हे त्याने मनोमन ठरवलं.

तुला इतकंच कम्फर्टेबल नव्हतं वाटत नव्हतं तर कशाला आलीस इकडे ? त्याने चेंडू तिच्या दिशेने जोरदारपणे टोलावला.

मला इतरांचं मन मोडवत नाही, या तिच्या रिव्हर्स स्विंगने तो मनोमन आणखी चरफडला.

ओके आपण जाऊया या इथून,मी तुला मी जबरदस्ती इकडे यायला लावलं त्यासाठी सॉरी ही दोन वाक्य बोलून त्याने जोरकस फटका लगावायचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये टायमिंग नव्हतं.

मला हेल्थी फ्लर्टिंगशी काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण नंतर तुलाच त्रास होईल , तिने स्लोवर वन टाकून त्याला आणखी बुचकाळ्यात टाकलं.
हो नाहीतरी सगळं एकतर्फीच होतं… त्याने खूप वेळ एकही धाव न काढता आल्यामुळे फ्रस्ट्रेट झालेल्या फलंदाजाप्रमाणे विचार न करता चेंडू दूरवर सीमारेषेबाहेर भिरकावून दिला. पहिली टाईट ओव्हर संपली, पण मोव्हमेंटम आपल्या बाजूने आहे, यामुळे त्याला बरं वाटलं.

एव्हाना तो ब-यापैकी सावरला होता. तिला आपण अगदीच आवडत नसतो तर ती आपल्याबरोबर आलीच नसती, हा पॉझिटिव्ह विचार करून त्याने आपण वरच्या बाजुला समुद्राकडे तोंड करून बसायचे का, असे तिला विचारले. तीदेखील पटकन हो म्हणाली. तिचा हात पकडून असं समुद्राकडे पाहत बसायचं आणि गप्पा मारायच्या हे त्याचं ब-याच दिवसांपासूनच स्वप्न होतं. तुला उशीर होत असेल तर निघुयात हे अनेकदा उगाच सांगूनही ती त्याच्यासोबत बसून होती , याचा त्याला आनंद होता. मात्र मगाशी तिने फ्लर्टिंगचा बाऊन्सर टाकल्यामुळे इच्छा असूनही तिचा हात स्वत:हून पकडायची त्याची हिंमत होत नव्हती. एरवीही सहजपणे बोलता बोलता कोणत्याही मित्राचा हात पकडायची तिची सवय त्याला माहिती होती. तिच्या या मोकळ्या स्वभावाचं त्याला कौतूकही वाटायचं आणि कधीकधी काळजीही वाटायची.

एवढं करूनही तिचा हात पकडला तरी ती कोरडेपणा दाखवणार आणि त्यामुळे आपल्याला अपेक्षित “स्पेशल फिलिंग ” कधीच क्रिएट होणार नाही, हे तो खोलवर जाणून होता. तरीदेखील कधीतरी तिने स्व:तहून हात पकडावा असे त्याला मनोमन वाटायचे.
आता त्याने आहे त्यामध्ये समाधान मानून तिच्याशी बोलायला सुरूवात केली. इकडच्या तिकडच्या गोष्टींवरून सुरू झालेली चर्चा पुन्हा ती त्याला कशी आवडते, या मुद्द्यावर येऊन पोहचली.

तू मला हवा तसा नाहीस, तू माझा विचार सोडून दे, हे तिने पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितलं. माझं प्रेम एकाच व्यक्तीवर आहे आणि ते तुला चांगलं माहितीये. त्याच्या डोळ्यासमोर तिच्या शाळेपासूनच्या त्या मित्राचा चेहरा आला. गेल्या चार वर्षांपासून तो तिला प्रचंड आवडत होता. आपलं व्हॉटसएपवर झालेलं प्रेम यापुढे तकलादू आहे, हा विचार करून त्याने आता तिची मनधरणी करण्याचा प्रयत्न सोडून द्यायचं ठरवलं. मग त्याने गप्पांची गाडी तिच्या आवडत्या विषयाकडे वळवली.

तिला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडायचं आणि ती यावर तासनतास बोलू शकत होती , हे त्याला माहित होतं. फिरण्याचा विषय काढल्यावर तिची कळी लगेच खुलली आणि ती त्याला तिचे प्लान्स सांगयला लागली. बोलता बोलता तिने मी एक दिवस सगळं सोडून कायमची हिमाचलला निघून जाणार असल्याचं सांगितलं. तिकडे मला लहानशी झोपडी बांधून कोणतीच चिंता न करता मनाला वाटेल तसं जगायचंय. मेंढ्या पाळायच्या, त्या चरत असताना कोणत्यातरी झाडाखाली बसून पुस्तक वाचतं बसायचं, कोणत्याही एमिनिटीज आणि ब्रेण्डेड गोष्टींशिवाय आयुष्य जगायचं हे तिचं स्वप्न होतं. ती कायमची इतक्या दूर जाऊन राहणार , आपल्याला कधीच भेटणार नाही, ही कल्पनाही त्याला सहन होत नव्हती.

मी तुला हिमाचलला भेटायला आलो कधीतरी तर चालेल का, त्यानं विचारलं. त्याला कधीकधी स्वत:च्या या आशावादाचं खूप कौतूक वाटायचं. हल्ली तिलाही वाटायला लागलं होतं. मी तुला काहीचं कमिटमेंट न देता तू माझ्यावर एवढं प्रेम करतोस. हे ती अनेकदा बोलून दाखवायची. आताही त्याच्या प्रश्नावर ती खळाळून हसली. म्हणाली मी तुला माझा पत्ताही देणार नाही. त्यामुळे तो पुन्हा वैतागला. तुझं सध्याचं रिलेशन इतकं चांगलं सुरू असताना तू माझ्यात का अडकतोयस इतका, तिने त्याला न आवडणारा प्रश्न विचारला. त्यालाही माहिती होतं की आत्ताचं त्याचं रिलेशन खूप स्ट्रॉंग होतं आणि लवकरच दोघेहीजण लग्न करणार होते. पण ती आल्यापासून तो पुन्हा एकदा प्रेमात पडला होता आणि यामध्ये त्याला काहीही चुकीचं वाटत नव्हतं. एखादी व्यक्ती आवडत असेल तर नाकारण्यात काय अर्थ आहे, हा त्याचा सरळसरळ हिशोब होता. याचा अर्थ त्याचं आताच्या गर्लफ्रेंडवरचं प्रेम कमी झालं होतं असं आजिबात नव्हतं.

आता फक्त त्याला तिच्याइतकीच समजून घेणारी आणि आयुष्याकडे वेगळ्या नजरेतून पाहणारी पार्टनर मिळाली होती इतकचं. त्यामुळे तिला चेस करण्यात किंवा तू मला आवडतेस हे खुलेपणाने सांगण्यात त्याला कुठलाही कमीपणा वाटत नव्हता. ती या सगळ्यासाठी ‘वर्थ’ होती. हे सगळं कुठे जाऊन थांबणार याबद्दल त्याने कधीच विचार केला नव्हता. मात्र दोघांमधलं हे अंडरस्टँडिंग आयुष्यभर असंच राहावं असं त्याला वाटायचं . तिचा सगळ्यांना हवाहवासा वाटणारा स्वभाव किंवा फक्त फिजिकल एट्रेक्शन यामुळेच तो तिच्या प्रेमात पडला असं नव्हतं. तिच्याबरोबर फिजिकल होण्याचा विचार त्याच्या मनाला शिवलाच नव्हता असं नाही. पण आयुष्यभर फक्त तिचा हातात घेऊन किंवा तिच्या खांद्यावर हात टाकून नाहीतर ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बिलगायची , या गोष्टी त्याच्यासाठी पुरेशा होत्या. कारण त्याला ती मैत्रिण म्हणून जास्त आवडायची आणि हे बॉण्डिंग त्याला आयुष्यभर असावं असं वाटायचं.

याउलट ती त्याला नेहमी लांब ठेवायला बघायची. माझ्यात गुंतलास तर तुला त्रास होईल, असं वारंवार सांगायची. मात्र प्रकरण या सगळ्याच्या पुढे गेलं होतं.. ती कायमची त्याच्या मनात ठसली होती. आपण तिला आवडत नाही किंवा आवडलो तरी आपलं लग्न होणार नाही, याची त्याला पूर्ण जाणीव होती. तिची ‘आऊट ऑफ साईट आऊट ऑफ माईंड’ ही थिअरी त्याला पटत नव्हती, किमान तिच्याबाबत तरी ते शक्य नव्हतं. तू फ्लर्ट करतोस किंवा हे फक्त एट्रेक्शन आहे, हे सांगून ती त्याच्या प्रेमाचं अस्तित्वच नाकारायची तेव्हा त्याला खूप राग यायचा.

आतादेखील बोलता बोलता तिची गाडी याच रूळावर आली. तेव्हा तुला माझ्याबद्दल काही वाटतंच नाही, तर आपण इथे का आहोत असं विचारायचा मोह झाला. पण त्याने तो आवरला. हे सगळं सुरू असताना तिने अचानक त्याचा हात पकडला आणि गप्पा मारायला लागली. तिने हे असं केलं की त्याची सगळी समीकरणं विस्कटायची. मग त्याने पण तिचा हात घट्ट धरला आणि तिचं बोलणं ऐकायला लागला. एव्हाना चांगली हवाही सुटली होती, त्याला हव्या असणा-या गोष्टी जुळून आल्या होत्या. ती तिच्या ब-याच गोष्टी आपल्याला सांगते याचा त्याला आनंद वाटायचा. तिला हसताना किंवा बोलताना तो तासनतास पाहू शकत होता. आतादेखील ती समुद्राकडे पाहून बोलत असताना तिचा चेहरा न्याहाळत होता. सुख म्हणजे आणखी काय असतं, असं त्याला वाटलं. फक्त त्याला आवडणारे तिचे केस मोकळे नव्हते, एवढीच ती काय कमी होती. पण तो दिवसही नक्की येईल, याची त्याला खात्री होती. एवढ्यात रात्रीचे दहा वाजले आहेत हे त्याच्या लक्षात आलं. इथे रात्रभर बसलं तरी त्यांच्या गप्पा अशाच सुरू राहिल्या असत्या. त्यांच्यातली हीच गोष्ट त्याला सर्वात जास्त आवडायची. ती मनात काहीही नसून आपल्यासोबत इतका वेळ बसली, हे त्याच्यासाठी पुरेसं होतं. त्यामुळे आता आवरतं घेतलं पाहिजे हा विचार करून त्याने तिला निघुयात आता असं सांगितलं. तिनेदेखील गाण्याची एखादी मैफल कितीही रंगली तरी कुठं थांबायचं हे भान असलेल्या प्रोफेशनल गायकाप्रमाणे लगेच हो म्हटलं. तिचा हा आपल्याविषयीचा अलिप्तपणा आहे ना तिथेच आपल्या प्रेमाचं घोडं अडतं, हा विचार त्याच्या मनात आला. मात्र एकुणच तिला मनातल्या गोष्टी सांगितल्यापासून तिचा नकार ते आता तब्बल तीन तासांच्या गप्पा या सगळ्याचा विचार केल्यास आपल्या तिच्यासोबतच्या बॉण्डिंगचा ग्रोथ रेश्यो नक्कीच चांगला आहे, या जाणीवेने तो मनोमन सुखावला. ते एव्हाना रस्ता क्रॉस करून चर्चगेट स्टेशनच्या दिशेने चालायला लागले होते. त्याने एकदा मागे वळून मरिनड्राईव्ह, समुद्र आणि चंद्राकडे पाहिलं आणि कृतज्ञतेच्या भावनेने हसला… जणू ते तिघेही त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन बोलत होते, ‘वेल प्लेड माय बॉय’!!!

समाप्त.

– तीन फुल्या, तीन बदाम

© सर्व हक्क सुरक्षित