“श्रेयस, मला तुला भेटायचं आहे.. तू प्लीज लवकर ये..” गावाहून परतताच श्रद्धाचा सकाळी फोन आला..

“हो.. येतो मी.. पण नेमकं काय झालंय..?” श्रद्धाच्या आवाजावरुन खूप मोठा प्रॉब्लेम झाल्याचं श्रेयसच्या लक्षात आलं..

lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
thane lok sabha seat, BJP s Sanjeev Naik, Launches Campaign in Thane, Emphasizes Charitable Birthday Celebration, sanjeev naik in thane lok sabha, mahayuti, shinde shivsena,
वाढदिवसाच्या निमित्ताने संजीव नाईक यांची मतपेरणी
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?
mentally retarded girl rape marathi news
धक्कादायक! मतिमंद मुलीवर अत्याचार, तरुणाविरुद्ध गुन्हा

“ते मी तुला भेटल्यावर सांगते.. मी आता ऑफिसला जातेय.. तू प्लीज थोडं लवकर निघ ऑफिससाठी.. मला ऑफिस बिल्डिंगच्या खाली भेट..” श्रद्धाच्या आवाजात त्यावेळी श्रेयसला कधी नव्हे इतकं टेन्शन जाणवलं..

“हो.. मी येतो.. तू नको काळजी करु.. आपण काहीतरी सोल्युशन काढू..” श्रेयसनं श्रद्धाला समजवण्याचा प्रयत्न केला..
दुपारचं ऑफिस असूनही श्रेयस त्या दिवशी एक तास लवकर निघाला.. ऑफिस बिल्डिंगच्या खाली येताच श्रेयसनं श्रद्धाला कॉल केला.. श्रद्धा दुसऱ्या मिनिटाला बँकेतून बाहेर आली.. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड टेन्शन जाणवतं होतं.. श्रेयस आणि श्रद्धा जवळच्याच एका कॉफी शॉपमध्ये गेले..

“बोल श्रद्धा, काय झालंय.. तू इतकी डिस्टर्ब का आहेस..?” श्रेयसनं विचारलं..

“श्रेयस, मी तुला एक प्रश्न विचारते.. त्याचं तू खरंखरं उत्तर दे.. कारण तुझ्या एका उत्तरावर आपल्या दोघांचं भविष्य अवलंबून आहे..” श्रद्धा खूप विचारपूर्वक बोलत होती..

“श्रद्धा, मी तसंही तुझ्यासोबत खोटं बोलत नाही.. विचार..” श्रेयस म्हणाला..

“आपण खूप चांगले मित्र आहोत.. पण आपण खरंच फक्त फ्रेंड्स आहोत का..? की त्याहीपेक्षा जास्त आहोत..? तुझ्या मनात नेमकं काय आहे..?” श्रद्धानं थेट मुद्याला हात घातला होता..

“अचानक हा प्रश्न का विचारलास तू..? सर्व ठिक आहे ना..? नेमकं काय झालंय गावाला..?” श्रद्धाच्या प्रश्नांनी गोंधळलेल्या श्रेयसनं प्रतिप्रश्न केले..

“गावी मुलगा बघण्याचा कार्यक्रम होता.. मला कोणतीच पूर्वकल्पना नव्हती.. सगळं काही इतक्या वेगानं घडलं की मला काय करावं, काय बोलावं हेच कळत नव्हतं.. मग वाटलं आधी तुझ्याशी बोलावं.. प्लीज सांगा श्रेयस, तुझ्या मनात नेमकं काय आहे..?” श्रद्धाची मानसिक अवस्था किती बिकट आहे, याचा अंदाज श्रेयसला आला..

“हे बघ श्रद्धा.. तुझ्या मनात काही आहे का? या प्रश्नाचं उत्तर तुला माहित आहे.. पण तरीही मी तुला सांगतोय.. माझं तुझ्यावर प्रेम आहे..” श्रेयसनं कबुली दिली होती..

“माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे..” श्रद्धा गोड हसली होती.. तिच्या डोक्यावरचं ओझं अवघ्या काही मिनिटांमध्ये उतरलं होतं.. “इतके दिवस का बोलला नाहीस तू श्रेयस? मलाच विचारावं लागलं..” श्रद्धाच्या प्रश्नात तक्रारीचे सूर होते.. मात्र त्यातही लडिवाळपणा होता..

“अगं मी विचार केला होता की सर्व काही आपोआप घडू दे.. काही दिवस जाऊ दे.. नातं आणखी घट्ट होऊ दे.. आणि मी अजून लहान आहे ना..? तू मोठी आहेस ना? म्हणून मी म्हटलं हळूहळू होईल सर्व नीट..” श्रेयसनं उत्तर दिलं..

“आपल्या वयातलं अंतर आपल्यातलं अंतर वाढवणार नाही ना, याची खूप भीती वाटते.. कारण आपल्या दोघांचे आई-बाबा ५ वर्षांचं अंतर समजून घेतील असं वाटत नाही.. १-२ वर्षांचा प्रश्न असता तर गोष्ट वेगळी होती अरे..” श्रद्धा खूप विचारपूर्वक बोलत होती..

“आपण समजवू दोन्ही आई बाबांना.. डोन्ट वरी.. आणि लवकर समजवू तुझे आई-बाबा तसेही घोड्यावर बसलेत..” श्रेयसनं श्रद्धाच्या चेहऱ्यावरील टेन्शन दूर करण्यासाठी मुद्दाम विनोद केला..

“ए, माझ्या आई बाबांना काही बोलायचं नाही हा.. मुलगी हवीय ना त्यांची..? आदर द्यायचा हा.. तुझे पण आई-बाबा आहेत ते..” श्रद्धानेदेखील हसत हसत गंमत केली..

नक्की वाचा- Love Diaries : गुंतता हृदय हे…

वर्षभरात श्रद्धाचं लग्न उरकायचं, असं श्रद्धाच्या आई-बाबांनी ठरवलं होतं.. त्यामुळे आता काहीही करुन श्रेयसला त्याच्या घरच्यांसोबत, श्रद्धाच्या आई-बाबांसोबत बोलावं लागणार होतं.. मात्र श्रेयस आणि श्रद्धामध्ये जसं वयाचं अंतर होतं, तशी इतरही अंतरं होती.. श्रद्धा करिअरमध्ये बऱ्यापैकी स्थिर झाली होती.. पगारही तसा चांगला होता.. श्रेयस जेमतेम २३ वर्षांचा.. करिअर आत्ता कुठे सुरु झालं होतं.. त्यामुळे स्थैर्याचा काही पत्ताच नव्हता.. पगार बरा होता.. मात्र तरीही श्रद्धाच्या तुलनेत कमीच होता.. श्रद्धा आणि श्रेयसनं कधीही याचा इतका विचार केला नव्हता.. मात्र घरच्यांकडून हा सारा विचार केला जाणार होता.. त्यामुळे आता श्रद्धा आणि श्रेयसची सारी कसोटी लागणार होती.. श्रद्धानं श्रेयसबद्दल तिच्या मामा-मामीला सांगितलं होतं.. मात्र तरीही आई-बाबांना समजवणं महत्त्वाचं होतं..

एक दिवस श्रेयस श्रद्धाच्या घरी गेला.. तसं तो आधीही एक दोनदा तिच्या घरी गेला होता.. मात्र आता तो थेट श्रद्धाला मागणी घालण्यासाठी श्रद्धाच्या आई-बाबांना भेटणार होता.. नमस्कार वगैरे करुन झाल्यावर श्रेयस मूळ विषयाला हात घालणार, त्याच्या आधीच श्रद्धाच्या बाबांनी बोलायला सुरुवात केली..

“हे बघ, तुम्ही जो काही विचार केलाय, ते होणं शक्य नाही.. मी शांतपणे आणि विचारपूर्वक बोलतोय.. तुमच्या वयात अंतर आहे.. तू आता कुठे नोकरी करायला लागला आहेस.. आमची मुलगी वेल सेटल्ड आहे.. त्यात दोन्ही घरची परिस्थितीदेखील वेगळी आहे..” श्रेयस काही बोलण्याआधीच श्रद्धाच्या बाबांनी नकारघंटा वाजवली..

“तुमचं म्हणणं अगदी खरं आहे.. मात्र आम्ही मॅनेज करु.. पैसा, स्टेटस, आर्थिक स्थैर्य सर्व महत्त्वाचं आहे आणि ते मी नाकारत नाही.. मात्र त्यासाठी वेळ द्यायला हवा ना..? आता माझं करिअर सुरु झालंय, दोन-तीन वर्षांत होईन मीदेखील सेटल.. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचं प्रेम आहे एकमेकांवर.. आम्ही सोबत असताना खूप आनंदात असतो.. प्लीज तुम्ही मला समजून घ्या..” श्रेयस समजवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता..

“हे बघ.. २-३ वर्ष थांबणं आमच्यासाठी शक्य नाही.. श्रद्धासाठी खूप चांगली स्थळं येतायत.. खूप चांगला पगार असलेली, आर्थिक स्थिती उत्तम असलेली मुलं आहेत.. प्रेम वगैरे ठिक आहे… मात्र त्यामुळे पोट भरत नसतं..” श्रद्धाच्या बाबांनी विषय संपवण्याचा प्रयत्न केला.. श्रेयस काही बोलणार इतक्यात श्रद्धाने बोलायला सुरुवात केली..

“बाबा, काय चाललंय स्टेटस, पगार, आर्थिक स्थिती..? आणि इतरांची तुलना तुम्ही श्रेयससोबत कुठे करताय..? आपण कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी टेंडर नाही मागवत आहोत.. आणि मला आयुष्याचा जोडीदार हवाय, एटीएम नकोय.. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आनंद, सुख.. आणि ते मला श्रेयससोबत असताना मिळतं.. हे एकमेव कारण पुरेसं आहे श्रेयससोबत आयुष्य घालवण्यासाठी.. पैसा काय कमावता येईल.. आनंदी असणं जास्त महत्त्वाचं..” श्रद्धाच्या बोलण्यात ठामपणा होता.. बँकेत असताना अतिशय मृदू आवाजात बोलणारी श्रद्धा इतक्या खंबीर आणि ठामपणे बोलताना श्रेयसनं पहिल्यांदाच पाहिली.. मात्र तरीही बाबांवर फारसा परिणाम झाला नव्हता..

श्रेयस आणि श्रद्धाचं भेटणं सुरु होतं.. श्रेयसनं त्याच्या घरी हळूहळू श्रद्धासोबतच्या नात्याबद्दल कल्पना दिली.. तिथेही विरोध झाला.. मात्र तिथेही श्रद्धा आणि श्रेयसनं खिंड लढवली..

“वयाचा काय प्रश्न आहे बाबा..? असं ठरवून प्रेमात पडता येतं का..? तुम्ही प्लीज समजून घ्या ना..” श्रेयसनं आई-बाबांना सांगितलं..

“अरे समजून घ्या काय..? लोक काय म्हणतील..? वयाचा विचार केला का तुम्ही..? अरे आता कुठे नोकरीला लागला आहेस.. पुढचं शिक्षण, करिअर याकडे लक्ष द्यायचं सोडून काय चाललंय तुझं..? आणि इतकी काय घाई लग्नाची तुला..?” श्रेयसच्या बाबांनी एकापाठोपाठ प्रश्नांचा मारा केला..

“बाबा, लग्नाचा श्रेयसच्या शिक्षणावर काहीही परिणाम होणार नाही.. लग्नानंतर घरातली सर्व जबाबदारी माझी असेल.. मला शनिवार, रविवार सुट्टी असते.. मी घरातलं सर्व मॅनेज करेन.. श्रेयस त्याच्या शिफ्ट सांभाळून त्याचा पुढचा अभ्यास करेल.. मात्र प्लीज फक्त वयात अंतर आहे, म्हणून तुम्ही नकार देऊ नका.. आणि राहता राहिला प्रश्न लोकांचा.. तर लोक काय विचार करतील, असा विचार करुन आपण जगायचं का..? हा माझ्या मनाला पडलेला प्रश्न आहे..” श्रद्धानं अगदी अचूक वेळी बाजू सावरली होती.. स्वत:च्या घरी बोलताना अगदी ठामपणे बोलणारी श्रद्धा श्रेयसच्या आई-बाबांशी बोलताना मात्र प्रेमळपणे बोलत होती.. आपल्या बोलण्यातून माणसं तुटणार नाहीत, उलट ती जुळतील अशा पद्धतीने श्रद्धानं तिचं म्हणणं मांडलं होतं.. श्रेयसच्या आईच्या तर डोळ्यातूनच होकार समजला होता.. श्रेयसचे बाबादेखील कालांतराने नरमले होते.. त्यामुळे अर्धी मोहिम फत्ते झाली होती..

दिवस पुढे सरकत होते.. मात्र श्रद्धाच्या घरातील स्थिती काही बदलत नव्हती.. श्रद्धाच्या घरात कायम तणाव होता.. श्रद्धाचा २९ वा वाढदिवस जवळ येत होता.. मात्र घरी काहीच सकारात्मक घडत नव्हतं.. वाढदिवसदेखील इतर दिवसांसारखाच सुरु झाला.. सुट्टी घेऊन घरी थांबण्यात काही अर्थ नाही, म्हणून श्रद्धा आई-बाबांना नमस्कार करुन ऑफिसला निघाली.. ऑफिस संपल्यावर श्रेयसला भेटायचं असं ठरलं होतं.. संध्याकाळी दोघेही भेटले.. मात्र श्रद्धा सेलिब्रेट करण्याच्या मूडमध्येच नव्हती.. श्रेयससोबतच्या नात्याचं काय होणार, हा प्रश्न तिच्या मनात होता.. तितक्यात श्रद्धाच्या मामाचा फोन आला.. त्यानं तिला तातडीनं घरी बोलावलं.. श्रेयस आणि श्रद्धा लगेच निघाले.. आता आणखी काय प्रॉब्लेम झालाय, या विचारानं दोघांचंही टेंशन वाढलं होतं..

श्रद्धा घरी पोहोचली.. सोबत श्रेयसदेखील होता.. वाढदिवसाचा केक रेडी होता.. श्रद्धाच्या आई-बाबांच्या चेहऱ्यावर अनेक दिवसानंतर पूर्वीसारखा आनंद दिसत होता.. घरातलं वातावरणच बदलंल होतं.. नेमकं काय झालंय, हेच कळत नव्हतं..

“अरे काय हे चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह घेऊन आला आहात तुम्ही दोघं..?” श्रद्धाचा मामा गमतीनं म्हणाला..

“अहो मामा, काय झालं..? अचानक बोलावून घेतलं.. त्यामुळे टेन्शन आलं.. सर्व ओके आहे ना..?” श्रेयसनं टेन्शनमध्येच विचारलं..

“ओके नाही.. एकदम व्यवस्थित आहे.. वाढदिवस आहे ना श्रद्धाचा म्हणून आलो आम्ही.. बाकी नाही.. आणि वाढदिवस तिचा असला तरी गिफ्ट तुम्हा दोघांना मिळणार आहे, बरं का..” श्रद्धाच्या मामीनं गुगली टाकली..

मामीचं वाक्य संपताच श्रेयसचे आई-बाबा आपल्या खोलीतून बाहेर आले..

“हा आमचा मुलगा इथे काय करतोय..?” श्रेयसच्या बाबांनी विचारलं..

“अहो, तुम्ही इथे काय करताय..?” श्रेयसने बाबांना विचारलं..

“बापाला उलटं प्रश्न विचारु नको.. सूनबाईंचा वाढदिवस आहे म्हणून आलोय..” श्रेयसच्या बाबांच्या उत्तरानं सगळेच हसू लागले..
“दृष्ट काढायला हवी तुम्हा दोघांची.. किती गोड दिसताय सोबत.. आणि श्रद्धा तर बघ सूनबाई म्हटल्यावर कशी लाजतेय..?” श्रेयसची आई कौतुकाने म्हणाली..

“हा खूप मोठा आणि सुखद धक्का आहे आमच्यासाठी.. आम्हा दोघांना सांगाल का हे मत आणि मनपरिवर्तन नेमकं कसं झालंय..?”

“मी सांगतो..” श्रद्धाचे बाबा मामा म्हणाले.. “तुम्हा दोघांनी तुमच्या नात्याबद्दल मामा-मामींना सांगितलंच होतं.. मग श्रेयसदेखील घरी येऊन गेला.. तेव्हापासून मामा-मामी आम्हाला सतत समजवतायत… आज सकाळी मामाचा फोन आला.. तर तू घरी नव्हतीस.. तेव्हा मामा म्हणाला, आतापर्यंत एकुलत्या एका पोरीच्या सुखासाठी सर्व केलंत.. आता फक्त एक करा, तिच्या लग्नाला नाही म्हणू नका.. लोकांचं काय आहे, आज बोलतील, उद्या गप्प होतील.. मुलीचा आनंद महत्त्वाचा.. आणि उगाच जबरदस्ती करुन दोन संसार उभं करण्यापेक्षा आणि मग ते मोडण्यापेक्षा एक चांगला संसार उभं राहणं महत्त्वाचं..” श्रद्धाच्या बाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते..

“आणि आमचे तीर्थरुप इथे कसे आले..? मातोश्री कशा पोहोचल्या..?” श्रेयसनं उत्सुकतेनं विचारलं..

“ते तर आम्हालादेखील माहित नाही,” श्रद्धाचे मामा-मामी एका सूरात म्हणाले..

“ते मी सांगते..” एवढा वेळ शांत असलेली श्रद्धाची आई म्हणाली.. “सकाळी मामाचा फोन येऊन गेला आणि हे काही वेळ शांतच होते.. मग काय माहित काय झालं.. यांनी थेट श्रेयसच्या आई-बाबांना फोन केला.. त्यांना येण्याची विनंती केली.. आणि मग काय श्रेयसचे आई-बाबा आले..” श्रद्धाच्या आईनं पूर्ण घटनाक्रम सांगितला..

“पण तुमच्याकडे आई-बाबांचा फोन नंबर कुठून आला..?” श्रद्धानं विचारलं..

“एकदा तुझ्याच फोनमधून घेतला होता.. तुम्ही ऐकत नाही म्हटल्यावर एकदा त्यांच्याशी बोलूनच सर्व सोक्षमोक्ष लावावा, म्हणून घेतला होता.. मात्र आज सोयरिक जुळवण्यासाठी कामी आला..” श्रद्धाच्या बाबांनी सांगितलं..

अवघ्या काही मिनिटांमध्ये श्रद्धा आणि श्रेयसच्या आयुष्याला कलाटणी मिळाली होती.. इतक्या दिवसांपासून असलेलं डोक्यावरचं ओझं उतरलं होतं.. श्रद्धाचा वाढदिवस अगदी आनंदात सेलिब्रेट झाला.. दोन्ही आई-बाबा आणि या सगळ्यांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे मामा मामी यांनी श्रद्धा आणि श्रेयसला त्यांच्या आयुष्यातलं सर्वात मोठं गिफ्ट दिलं होतं..

समाप्त..

तीन फुल्या, तीन बदाम

© सर्व हक्क सुरक्षित