कॉलेजात पहिलं वर्ष हे सगळं नवीन वातावरण समजून घेण्यात असंच निघून गेलं. म्हणजे फ्रेंड्स सर्कल वगैरे असं काहीच झालं नाही. माझ्या कॉलेजात अॅडमिशन मिळालेला माझ्या शाळेतला मित्र राजेश हाच काय तो माझा ‘फ्रेंड’ आणि तोच माझा ‘सर्कल’. तो आणि मी दोघं एकत्रच कॉलेजात जायचो, लेक्चर अटेंड करायचो, बंक देखील एकत्रच करायचो. घरी येतानाही एकमेकांशिवाय पाय निघत नसे. किंबहुना आम्ही जास्त कुणाशी ओळख करण्याच्या भानगडीतच पडलो नव्हतो. किंवा तशी गरज वाटत नव्हती. पण बारावीच्या वर्षात चित्र पूर्ण बदललं. माझ्या ओळखी वाढू लागल्या होत्या. राजेशनेही काहींशी बोलण्यास सुरूवात केली होती. परिक्षेसाठी मागे-पुढे बसणाऱयांसोबत ओळख कॉलेजच्या पहिल्या वर्षात तशी झाली होती. पण बारावीत ही ओळख मैत्रित रुपांतरीत झाली. एक दिवस कँटीनमध्ये राजेशसोबत बसलो होतो. (लेक्चर बंक करून)

दोन वडापाव घ्यायचे आणि टेबल पकडून पुढचे काही तास तिथेच घालवायचे हे असं राजेश आणि माझं सुरू झालं होतं. त्यात आणखी दोन मित्रही सामील झाले होते. एक दिवस राजेश माझ्या समोर बसला होता आणि मागून त्याला कुणीतरी ‘हाय’ म्हटलं. मी काही मागे पटकन लक्ष दिलं नाही.

“अरे, राजेश तू पण इकोचा लेक्चर बंक केला. व्वा.” असा एका मुलीचा आवाज आला आणि मी पटकन मागे वळून पाहिलं. ती मुलगी आमच्या टेबल जवळ राजेशशीच बोलण्यासाठी येत होती. पांढऱया रंगाचं अगदी साधं टी-शर्ट..कोणतीही अक्षरं किंवा काहीच भंपक असं डिझाईन वगैरे काहीच नसलेलं. निळ्या रंगाची जीन्स आणि पाठीवर छोटीशी सॅक…मोकळे सोडलेले केस, एका हाताला पांढऱया रंगाचा केसाचा रबर अडकवला होता आणि दुस-या हातात कोल्ड्रींगची बॉटल होती.

ती समोर येऊन बसली. राजेशसोबत बोलू लागली. “अरे..तू पण इकोचे लेक्चर बंक करणार मग, माझं कसं होणार. एक्झामला माझी वाट लागणार. मी आधीच सांगतेय इको हा माझा विक पॉईंट आहे. फर्स्ट इयरला मी इकोत काठावर पास झालेय.”
ती राजेशशी बोलत होती आणि राजेशही तिच्या प्रश्नांना उत्तरं देत होता. दरम्यान, तिनं बोलता बोलता हातातला केसाचा रबर काढून केस बांधले आणि कोल्ड्रींग प्यायलाही सुरूवात केली. मी काहीच बोलत नव्हतो. मी फक्त तिच्याकडे पाहात होतो. ती राजेशशी बोलण्यात गुंग होती. इतक्यात तिच्या मैत्रिणी आल्या.. “चल, बाय येते मी”, असं म्हणून तिने राजेशचा निरोप घेतला. मी तिच्याकडे मागे वळून पाहिलं आणि राजेशला विचारलं.

“कोण रे ही?”

”ती ‘राधिका’ परिक्षेला माझ्या मागच्या बाकावर बसायची” राजेशने सांगितलं.

गेल्या वर्षभरात माझं मन विचलित झालं नव्हतं, पण त्यादिवशी घरी परतताना मला राधिकाच दिसत होती. माझ्या डोळ्यासमोरून तिचा चेहरा काही जात नव्हता.

तशी ती मॉर्डन होती. पण इतर मुलींपेक्षा वेगळी होती ना मेकअप,ना आपल्या सौंर्द्याचा गर्व. .सडपातळ बांध्याची.. पांढऱया रंगाच्या टी-शर्टमध्येही उठून दिसणारी राधिका मला का कोणास ठावूक पण पहिल्याच भेटीत खूप भावली होती. राजेशची मैत्रिण म्हटल्यानंतर माझीही ओळख झालीच. म्हणजे तशी राजेशनेच ओळख करून दिली. आमचं बोलणं सुरू झालं..नोट्सच्या बहाण्याने कधी लायब्ररी तर कधी कॅन्टीन असं वेळ घालवणं सुरू होतं. व्हॉट्सअॅप ग्रुप होता आमचा..त्यात आता राधिका देखील अॅड झाली होती. त्यामुळे मला नंबर देखील सहज मिळाला. पर्सनल चॅटींगसाठी मीच पुढाकार घेतला. कारण, तिच्याकडून असं काही अपेक्षितच नव्हतं. एव्हाना आम्ही चांगले मित्र झालो होतो. कदाचित माझ्या एकंदर वागण्यावरून तिने अंदाज बांधला असेल, पण मैत्रिच्या पुढे आमची गाडी अजून ढकलली गेली नव्हती. कॉलेजात रोज भेटणं, बोलणं, खूप वेळ सोबत एकत्र असणं सर्व नेहमीप्रमाणे सुरू होतं. डेज देखील आम्ही एकत्र सेलिब्रेट केले. आम्हा दोघांनाही एकमेकांची कंपनी आता आवडू लागली. खरंतर आम्हा दोघांपेक्षा आता इतर मित्रमैत्रिणींना आमचं काहीतरी लफडं सुरूय असं वाटू लागलं. आम्हा दोघांनाही याची कल्पना होती. पण कुणी पुढाकार घेत नव्हतं. पण कॉलेजचा ‘अॅन्युअल डे’ त्यासाठी निमित्त ठरला. दुपारचं कॉलेज असल्याने साधारण साडेसहापर्यंत नेहमी आम्ही आपापल्या घरी असायचो. (म्हणजे जावं लागायचं) पण त्यादिवशी ‘अॅन्युअल डे’ होता. अंधार पडल्यानंतर राधिका आणि मी भेटण्याची ती पहिलीच वेळ होती. मी कॉलेजला बसने जायचो, कारण मला ते सोपं होतं. पण राधिका ट्रेनने यायची. ‘अॅन्युअल डे’ला मी आणि राजेश लवकरच पोहोचलो होतो. छान पार्टीमूड होता. कार्यक्रमांना सुरूवात देखील झाली होती. पण मी राधिकाची वाट पाहात होतो. तिला फोन देखील केला होता. त्यामुळे ती येणार असल्याचं निश्चित होतच. त्यादिवशी राधिका पहिल्यांदा साडी घालून येणार होती. तसं आदल्या दिवशी तिने चॅटवर सांगितलंही होतं.

राधिका समोरून चालत येत होती तसा मी माझ्याच जगात हरवून गेलो. काळ्या रंगाची साडी आणि लाल रंगाच्या ब्लाऊजमध्ये राधिका खूप गोड दिसत होती. मोकळे सोडलेले केस आणि पुढे येणाऱया बटा सारख्या बाजूला सावरत ती जशी चालत जवळ आली..तशी माझ्या मनाची धडधड वाढली होती. मी खूप इंप्रेस झालो होतो.

“हाय, फ्रेंड्स कशी दिसतेय मी” तिचा पहिला प्रश्न.

मोनिका, समृद्धी यांनी तिचं कौतुक केलं आणि राधिकानेही त्या दोघींच कौतुक केलं. मला राधिका त्यादिवशी खूप भावली होती. आता आम्ही कार्यक्रम पाहायला सुरूवात केली होती. मुद्दाम राधिकाच्या बाजूलाच मी बसलो होतो. मी काही बोलणार इतक्यात.. “सम्या..तू नाही सांगितलंस मी कशी दिसतेय ते?” (ग्रुपमध्ये मला सगळे सम्याच म्हणायचे)

“अग, खूप छान दिसतेयस. अॅच्युली मी केव्हाच सांगणार होतो. पण मी काही बोललो तुझ्याबद्दल की..यू नो ना..हे सगळे मग आपल्याला चिडवायला लागतात म्हणून नाही बोललो. म्हटलं पर्सनली सांगेन”

“तुला, नाही आवडत का आपल्याला चिडवतात ते?”

“नाही ग, तसं नाही. मी तुला काय वाटतं याचा विचार करतो.”

“मी, नाही लक्ष देत त्याकडे. आपल्याला काय वाटतं हे महत्त्वाचं”

राधिकाच्या एकंदर बोलण्यावरून मला सकारात्मक नोटिफिकेशन्स मिळाले होते. पण माझी बोलण्याची अजिबात हिम्मत होत नव्हती. कार्यक्रमात एका गाण्यावर आमच्या मित्र-मैत्रिणींनी नाचायला सुरूवात केली होती. राधिकाला देखील नाचायचं होतं पण साडीमुळे तिला मनसोक्त नाचणं शक्य नव्हतं. ती सर्वांमधून हळूच बाहेर गेली. मी तिच ग्रुपमधून बाहेर जाणं आधीच नोटीस केलं होतं..मग मी देखील मागे येऊन तिला कंपनी म्हणून तिच्यासोबत उभा राहिलो. सगळ्यांना नाचताना आम्ही पाहात होतो. इतक्यात आम्ही दोघांनीही एकाच वेळी एकमेकांकडे पाहिलं. अप्रतिम टायमिंग होतं ते. माझ्याकडे पाहाताच तिने नजर खाली केली आणि डोळ्यासमोर आलेली केसाची बट पुन्हा एकदा तिने कानाच्या मागे नेली. मला कळलं होतं. हिच ती वेळ आहे. आपण राधिकाला सांगायला हवं. मी धाडस केलं.

“राधिका, ऐक ना. मला तुला काहीतरी सांगायचं होतं.”

“हमम..” ती एवढंच म्हणाली.

मी कशीबशी हिंमत केली आणि एकदाचं मन मोकळं केलं. “राधिका, आय लव्ह यू”

ती काहीच म्हणाली नाही. तिने फक्त माझ्याकडे पाहिलं. छान हसली आणि पुन्हा आमच्या ग्रुपमध्ये जॉईन झाली. मी तिथेच उभा होतो. तिच्याकडे पाहात होतो. साडीमुळे मुक्तपणे नाचता येत नसतानाही ती जमेल तितक नाचत होती. तिच्या चेहऱयावर आनंद होता. तो मी पाहिला होता. नाचताना हळूच ती माझ्याकडे अधूनमधून नजर टाकत होती. मी बाजूलाच असलेल्या झाडाला टेकलो आणि राधिकाकडे एक टक पाहू लागलो होतो. तिचं माझ्याकडे पाहून लाजणं माझ्या लक्षात आलं होतं. मला उत्तर मिळालं होतं.

आम्ही दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. कोणताही विचार..कसलंही टेन्शन किंवा काही काही नव्हतं. फक्त राधिका आणि मी. लेक्चर कमी आणि कॅन्टीनमध्ये मुक्काम वाढला होता. तिच्या बाजूला बसून सर्व गप्पा मारत असताना टेबलाखाली हळूच तिचा हात पकडणं…तिने तो घाबरून टाळणं, मग मी “काय, झालं” या अविर्भावाने तिच्याकडे पाहून दोन्ही हात टेबलावर घेऊन रागावल्याचं नाटकं करणं आणि मग तिने पायाला पाय मारून माझी विचारपूस करणं. मला मनवणं.

आम्ही एकमेकांसाठी खूप कन्फर्टझोन झालो होतो. एव्हाना आमच्यात फुलत असलेल्या प्रेमाची कुणकूण मित्रमंडळींनाही लागली होती. त्यांनी चिडवल्यानंतर राधिकाचं लाजणं सर्वकाही सांगून गेलं होतं. आता ग्रुपमध्येही काहीच लपून राहिलं नव्हतं. राधिकासाठी आता मी ‘सम्या’चा ‘समू’ झालो होतो. राधू-समू..मेड फॉर इच अदर..ब्ला ब्ला ब्ला..असं सारं मित्रमंडळींचं हवा देणं सुरू होतं.

राधिका आणि मी आता खूप जवळ आलो होतो. एके दिवशी मूव्हीला जायचा प्लान झाला. तेही फ्रेंड्स सर्कलच्या नकळत. म्हणजे एकांत मिळण्यासाठी आम्हीच तसं ठरवलं होतं. दोन कॉर्नर सीट. राधिकाचा हात पकडून तिच्या खांद्यावर डोकं ठेवून मूव्ही पाहिला. राधिकाचं माझ्या गालावर अलगद हात फिरवत माझी काळजी करणंही सुरू होतं. तिच्या खांद्यावरून डोकं काढून आता तिच्याकडे एक टक पाहू लागलो.

“समीर..असा काय बघतोयस माझ्याकडे..मूव्ही समोर आहे.”

“तूला बघतोय..”

“नको, असा पाहूस..मला कसंतरी वाटतं.”

“तेच..तर पाहायचंय मला.”

“काय?”

“तुझं लाजणं.. जे मला पाहायला खूप आवडतं”

राधिकाच्या चेहऱयावर हसू उमटलं होतं. मी आता तिच्या जवळ गेलो होतो. राधिकाच्या ओठांच्या अगदी जवळ पोहोचलो होतो. तिने लाजून..मला टाळलं.

“राधिका…बघ ना इथे”

“नको”

“काय झालं..राधू लाजतेय होय माजी”

“नाही. समीर..तू नको काही बोलूस..मला नाही राहावणार”

“ठीकए..” असं मुद्दाम नाराजीत बोलून मी मागे जाणार इतक्यात राधिकाने माझा हात घट्ट पकडून मला थांबवलं. राधिका जवळ आली होती. मीही जवळ जाऊन राधिकाला आता किस केलं होतं. माझे दोन्ही हात तिच्या चेहऱयावर कानाजवळ होते. इतक्यात मूव्हीमध्ये हिरोईन किंचाळल्याचा आवाज झाला आणि आम्ही दोघंही दचकलो. मागे सरलो आणि पुन्हा स्क्रिनकडे पाहू लागलो.. आम्ही दोघंही हसत होतो. मी राधिकाकडे पाहिलं..तिचा चेहरा लाजेने बहरला होता. गालावर छान खळी पडली होती. माझ्या चेहऱयावरही तिला आनंद दिसत होता. ते तिच्या डोळ्यांतून मला कळत होतं.

आमच्या भेटीगाठी आता वाढत होत्या. दोघंही एकमेकांची कंपनी खूप एन्जॉय करत होतो. आमच्या रिलेशनशीपबदद्ल कॉलेजमध्ये आणि तिच्या आणि माझ्या सर्वच फ्रेंडसना कळलं होतं. दोन वर्ष कशी उलटून गेली काही कळलच नाही. दोन वर्षात आम्ही अनेक क्षणांचे सोबती झालो. खूप साऱया आठवणी आमच्या गाठीशी होत्या. पण आता दोन वर्षांनंतर अचानक राधिकाच्या वागण्यात मला बदल दिसू लागला होता. सुरूवातीला मी राधिकाच्या बदललेल्या वागण्याकडे दुर्लक्ष करत होतो. पण काही दिवसांनी स्पष्ट जाणवू लागलं होतं. राधिका आता मला टाळत होती..कारण..

क्रमश:

 

– तीन फुल्या, तीन बदाम

 

© सर्व हक्क सुरक्षित