नंदन निलेकणी यांचे प्रतिपादन
नव्याने अस्तित्वात येत असलेले तंत्रज्ञानाच्या संदर्भातील प्लॅटफॉम्र्स भविष्यातील अनेक गोष्टींसाठी नव्या  संधी निर्माण करतील. आता आलेल्या आधार क्रमांकामुळेच काही कोटींची नवीन बाजारपेठ उभी राहणार असून ‘आधार’वर आधारित येणाऱ्या नवीन मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्सचा त्यामध्ये मोठा वाटा असेल, असे प्रतिपादन यूआयडीआयचे प्रमुख नंदन निलेकणी यांनी गुरुवारी येथे केले.
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कंपन्यांची शिखर संस्था असलेल्या नासकॉमच्या २०१३च्या वार्षिक अधिवेशनात आयोजित ‘फ्यूचर फॉरवर्ड  इमॅजिनिअरींग इंडिया’ या परिसंवाद वक्ते म्हणून नंदन निलेकणी बोलत होते. येणाऱ्या पाच वर्षांत भारतामध्येच तब्बल २००० कोटींची बाजारपेठ निर्माण होणार आहे. या विषयी बोलताना ते म्हणाले की, आता सरकारने ‘आधार’च्या निमित्ताने बँक खात्यापासून ते सबसिडी आणि तुमच्यापर्यंत पोहोचणाऱ्या इतर सेवाही एकत्रित केल्या आहेत. येणाऱ्या काळात या एकत्रित सेवांची संख्या वाढलेली असेल. त्यामुळे उपयुक्त अशा मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स संख्याही वाढणे महत्त्वाचेच असणार आहे. येणाऱ्या काळात अशी अनेक अ‍ॅप्स ‘आधारमय’ होतील. गुगल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन म्हणाले की, भारतामध्ये इ- कॉमर्सची सुरुवात अवघ्या तीन वर्षांपूर्वीच झाली आहे. तेव्हा ही बाजारपेठ केवळ  दोन दशकोटींची होती. गेल्या तीन वर्षांमध्ये या क्षेत्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधांमध्ये वाढ झालेली नसतानाही ही बाजारपेठ १० दशकोटींपर्यंत पोहोचली आहे. येत्या पाच वर्षांमध्ये ही बाजारपेठ तब्बल १०० दशकोटींची होईल. त्यासाठी संबंधित कंपन्यांनी आतापासूनच कंबर कसायला हवी.

जीएसटीसाठी कंपनी स्थापन
येणाऱ्या काही महिन्यांमध्ये गुडस् अ‍ॅण्ड सव्‍‌र्हिसेस टॅक्स संपूर्ण देशभरात अस्तित्त्वात येणार आहे. त्यामुळे विक्रीकरापासून ते स्टॅम्प डय़ुटीपर्यंत अनेक गोष्टी बाद होणार असून देशभरामध्ये एकच करप्रणाली सर्व राज्यांमध्ये लागू होईल. त्याची काटेकोर अंमलबजावणी शक्य व्हावी यासाठी आता जीएसटीएम अशी व्यवस्थापन कं पनी सरकारने स्थापन केली आहे. इथेही सर्व सेवांमधील कर एकत्रित करण्यात आले असून तिथे आयटी कंपन्यांसाठी नवीन संधींचे दालन खुले झाले आहे, अशी माहिती निलेकणी यांनी या प्रसंगी दिली.