चॉकलेट, सुक्यामेव्यासोबत ‘ओल्या’ भेटीचा पर्याय

दिवाळीचा उत्सव एकटय़ाने साजरा होत नाही. मनाचा आनंद वाढवणाऱ्या, उत्साह ओसंडायला लावणाऱ्या या सणात इतरांनाही सामील करून घेण्यासाठी भेटवस्तूंची देवाणघेवाण होत असते. अशा वेळी मिठाई, चॉकलेट, फराळ, सुकामेवा यांचा पर्याय निवडला जातो. मात्र, यंदाच्या दिवाळीत भेट‘खाऊ’मध्ये पेयाचीही भर पडली आहे. यंदा अनेक ठिकाणी भेटवस्तू म्हणून शॅम्पेनही विक्रीस उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जिभेवर चर्रचर्र करत घशाखाली सरकणाऱ्या शॅम्पेनच्या गोड घुटक्यानिशी दिवाळीचा आनंद यंदा साजरा होताना दिसणार आहे.

दिवाळीला चकली, लाडू, चिवडा हे फराळाचे पदार्थ भेटीदाखल देण्याऐवजी मिठाई, सुकामेवा, चॉकलेट्स अशा खाद्यपदार्थाची निवड केली जाते; परंतु आता त्यांना शॅम्पेन हॅम्परचा पर्याय उभा राहिला आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केटमध्ये सध्या आकर्षक सजावटीमध्ये अनेक प्रकारची शॅम्पेन हॅम्पर ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. परदेशी बनावटीची चॉकलेट्स आजूबाजूला पेरून आकर्षकपणे वेष्टनात गुंडाळलेल्या या हॅम्परच्या खरेदीकडे ग्राहकांचाही ओढा आहे.

युरोप-अमेरिका व तत्सम देशांतून सण-उत्सव साजरे करताना आपण ‘शॅम्पेन’ अथवा ‘वाइन’चा होणारा वापर पाहतो. आता हीच शॅम्पेन आपल्या दिवाळसणातही स्थिरावू पाहते आहे. या बहुतांश शॅम्पेन फ्रूट प्रकारातील आहेत. त्यामुळे त्या सामान्य दुकानांमध्ये विक्राकरिता सहज उपलब्ध होतात.

चॉकलेट टर्की, मलेशिया व अमेरिका या देशांतील आहेत. या चॉकलेटमध्ये नटीज, ड्रायफ्रूट्स, डार्क चॉकलेट व अन्य फ्लेवर्स उपलब्ध आहेत. १५ ते २० प्रकारची चॉकलेट येथे विक्रीस असून सोनेरी व पारदर्शक वेष्टनात लपेटून विक्रीस ठेवण्यात आली आहेत. चॉकलेटची अत्यंत छोटी पाकिटे १५०, तर मोठी पाकिटे १ हजाराच्या वर आहेत, तर ‘शॅम्पेन हॅम्पर’च्या किमती अगदी ७५० रुपयांपासून साडेपाच हजारापर्यंत आहेत. साडेपाच हजारांत दोन शॅम्पेन व टोपलीभर चॉकलेटचा समावेश आहे. यात सुक्या मेव्याचे आकर्षक पुडे ग्राहकांसमोर स्वस्त पर्याय म्हणून उपलब्ध आहेत. यंदा ग्राहक आकर्षक बॉक्सना सर्वाधिक पसंती देत असून ते आपल्या पद्धतीने ‘शॅम्पेन हॅम्पर’ बनवून देण्याची मागणी करत आहेत, असे क्रॉफर्डमधील विक्रेते ए. खान यांनी सांगितले.