पालिकेच्या निवडणूकीत माझ्या कुटुंबातील एकही सदस्य रिंगणात उतरणार नाही. त्यामुळे माझी ही लढाई केवळ माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आहे, असे मनोगत माजी मंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी संध्याकाळी काही प्रमुख कार्यकर्ते व नगरसेवकांशी हितगुज करताना व्यक्त केले. त्यामुळे नाईक राष्ट्रवादीतच राहणार असल्याची चर्चाही आता सुरु झाली आहे.
माझे काँग्रेस, भाजप, शिवसेना हे प्रमुख पक्ष स्वागत करायला तयार आहेत पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चार दिवसापूर्वी माझी या विषयावर सविस्तर चर्चा झाली आहे. त्यामुळे आशा स्थितीत पक्ष सोडावा का याबाबत कार्यकर्त्यांनी मला दोन दिवसात सूचना कळवाव्यात, असेही नाईक म्हणाले.
ठाणे जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक राष्ट्रवादी सोडून भाजप मध्ये प्रवेश करणार अशी गेली एक महिना चर्चा सुरु आहे. अलीकडे ते शिवसेना नेत्यांच्या संर्पकात असल्याचेही बोलले जात आहे.
याच काळात ठाणे जिल्ह्य़ातील जिल्हा परिषद, पंचायत, आणि पालिका निवडणूकीपासून त्यांना पक्षश्रेष्ठींनी दूर ठेवले आहे. त्यामुळे या चर्चेला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.
या पाश्र्वभूमीवर त्यांनी मंगळवारी खैरणे येथील आपल्या कार्यालयात काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांशी पुन्हा संवाद साधला.
त्यावेळी मला भाजप, शिवसेना, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून चांगल्या ऑफर असल्याचे स्पष्ट केले. मी काय निर्णय घ्यावा ते कार्यकर्त्यांनी मला येत्या दोन दिवसात कळवावे असे स्पष्ट करुन त्यांनी चेंडू कार्यकर्त्यांच्या कोर्टात टोलवला आहे.
ऐरोली विधानसभेची एक जागा संदीप नाईक यांच्या स्वरुपात नाईक यांनी टिकवली आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी नवी मुंबईत ४२ प्रभागात आघाडीवर असल्याने नाईक त्याच पक्षाच्या चिन्हावर पालिका निवडणूकांना सामोरे जाण्याच्या तयारीत आहेत.

माझे काँग्रेस, भाजप, शिवसेना हे प्रमुख पक्ष स्वागत करायला तयार आहेत. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चार दिवसापूर्वी माझी या विषयावर सविस्तर चर्चा झाली आहे. त्यामुळे आशा स्थितीत पक्ष सोडावा का याबाबत कार्यकर्त्यांनी मला दोन दिवसात सूचना कळवाव्यात.
– गणेश नाईक