अज्ञात व्यक्तींनी दहशत पसरवून सुरू केलेल्या संपामुळे घाबरलेल्या ‘मेरू’ चालकांना वाहने रस्त्यावर आणण्यासाठी सहकार्य करावे, अशी याचना ‘मेरू फ्लीट टॅक्सी’ व्यवस्थापनाने पोलिसांकडे केली आहे. ‘मेरू’चा पाच दिवसांपासून सुरू असलेला संप कोणत्याही कामगार संघटनेने पुकारला नसून यामुळे पंधराशे कुटुंबांना आर्थिक झळ बसत असल्याचे व्यवस्थापनाने म्हटले आहे.
मुंबईमध्ये फ्लीट टॅक्सीची सुरुवात करणाऱ्या मेरू टॅक्सीमध्ये पाच दिवसांपासून संप सुरू झाला आहे. मेरू चालकांना कंपनीत भरावा लागणारा विमानतळ कर अतिरिक्त असल्याचे सांगत काही मेरूचालकांनी अचानक संप जाहीर केला. मात्र या संपाला कोणत्याही संघटनेने पाठिंबा दिला नसल्याचा दावा व्यवस्थापनाने केला आहे. संप सुरू झाल्यावर मेरूचालकांना धमकाविण्यात येत असून पाच दिवसांमध्ये सुमारे ३० चालकांना मुंबई महानगर परिक्षेत्रात धमकावण्याचे आणि गाडय़ांवर हल्ले करण्याचे प्रकार झाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ पाहवा यांनी सांगितले. हल्ले करणारे आणि धमक्या देणारे कोणत्याही संघटनेचे नसून अज्ञात व्यक्तींच्या विरोधात तक्रार नोंदविण्यास आम्ही चालकांना सांगत आहोत. पण अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यामध्ये अडचणी येत आहेत. ठाणे, कल्याण, वसई, विरार, नालासोपारा, घाटकोपर येथे मेरूचालकांना धमकावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
‘मेरू’च्या सुमारे दोन हजार टॅक्सी मुंबई महानगर क्षेत्रामध्ये असून त्यातील केवळ पाचशे टॅक्सी सध्या रस्त्यावर प्रवासी वाहतूक करीत आहेत.