शीना प्रकरणाप्रमाणे तत्परता का नाही – कुटुंबीयांचा सवाल
‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणांचा अनुक्रमे सीबीआय आणि एसआयटीतर्फे करण्यात येणाऱ्या तपासाबाबत उच्च न्यायालयाने सोमवारी तीव्र असमाधान व्यक्त केले. दुसरीकडे शीना बोरा हत्या प्रकरणातील तत्परता दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा छडा लावण्यासाठी का नाही, असा सवाल दाभोलकर कुटुंबीयांनी करत तपास सीबीआयच्या एसआयटीकडे सोपविण्याची मागणी केली.
मुक्ता दाभोलकर आणि स्मिता पानसरे यांनी केलेल्या याचिकांवर सुनावणी न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती व्ही. एल. अचलिया यांच्या खंडपीठासमोर झाली. त्या वेळी न्यायालयाने दोन्ही प्रकरणांच्या तपासाबाबत तीव्र असमाधान व्यक्त केले. दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा शोध लावण्याबाबत सीबीआयचा तपास अद्यापही शून्यातच आहे. पानसरे यांच्या हत्येप्रकरणीही समीर गायकवाडला अटक करण्याव्यतिरिक्त एसआयटीने काहीच केलेले नाही, असे न्यायालयाने म्हटले.
त्यावर समीरवर आरोपपत्र दाखल करण्याची मुदत संपण्यास अद्याप १५ दिवस आहेत आणि तपास योग्य दिशेने सुरू असल्याचा दावा सरकारच्या वतीने अ‍ॅड्. मनकुँवर देशमुख यांनी केला.
तर सनातन संस्थेवर तपास केंद्रित करण्यात आला आहे आणि त्यादृष्टीने तपास सुरू आहे, असा दावा सीबीआयने केला. मात्र संस्थेतर्फे अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी केल्या जात असून अडथळे निर्माण केले जात आहेत, असा आरोप सीबीआयच्या वकील रेबेका गोन्साल्विस यांनी केला.

‘राजकीय दबावामुळे तपास रखडलेला’
राजकीय दबावामुळे सीबीआयला तपास पुढे न्यायचा नाही, असा आरोप दाभोलकर कुटुंबीयांच्या वतीने अ‍ॅड्. नेवगी यांनी केला. दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास न्यायालयाने सोपवल्यावर कामाचा ताण आहे, असे कारण पुढे करत सीबीआयने हात झटकण्याचा प्रयत्न केला होता. तीच सीबीआय शीना बोरा प्रकरणाचा तपास हाती आल्यावर ६० दिवसांच्या आत हजारपानी आरोपपत्र दाखल करते. अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे दाभोलकर प्रकरणाच्या तपासाला दिरंगाई होत आहे, असा दावा करणाऱ्या सीबीआयने शीना बोरा प्रकरणात मात्र अधिकाऱ्यांची फौज उभी केली आहे. दोन प्रकरणांमध्ये हा सापत्नभाव का, असा सवाल दाभोलकर कुटुंबीयांनी तपासाची सूत्रे एसआयटीकडे सोपविण्याची मागणी केली. त्याची दखल घेत सीबीआयच्या सहआयुक्त नीना सिंह यांनाच तपासाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.