वर्सोवा आणि जुहूदरम्यानच्या समुद्रकिनाऱ्यावर चौपाटीचा विकास
नागरीकरणाच्या फेऱ्यात अडकलेल्या मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांना समुद्राचे काळे पाणी आणि अस्वच्छ किनारे यांचे दर्शन घडते. त्यातल्या त्यात जुहू आणि वसरेवा येथील चौपाटय़ांवर पर्यटकांची गर्दी जमते. परंतु, याच चौपाटय़ांच्या मधोमध आता आणखी एक चौपाटी आकारास येत असून ‘अंधेरी चौपाटी’ असे तिचे नामकरण करण्यात येत आहे. जुहू आणि वसरेवा चौपाटय़ांच्या दरम्यान समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या झोपडय़ा हटवून या ठिकाणी नवीन चौपाटी विकसित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या चौपाटीवर बनाना राइड, पॅराग्लायडिंग, मोटर राइड अशा सागरी क्रीडा प्रकारांचा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे.
वर्सोवा बीचच्या अंधेरीकडील भागावर जवळपास दीडशेच्या आसपास झोपडय़ांची अतिक्रमणे होती. ही अतिक्रमणे एकदा हटवल्यावरही पुन्हा तयार होत होती. अखेर सात वेळा ही अतिक्रमणे हटवण्याची कारवाई केल्यावर हा किनारा मोकळा झाला. मुख्यत: वर्सोवा चौपाटीच्या दक्षिणेकडील व जुहू चौपाटीच्या शेजारील हा भाग असून ही चौपाटी अंधेरी भागात असल्याने याचे ‘अंधेरी चौपाटी’ असे नामकरण करण्यात आले आहे. ही चौपाटी साडेतीन किलोमीटर लांब असल्याने बऱ्याच मोठय़ा भागात पर्यटकांना मौज करता येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत या सुविधांची निर्मिती करण्यात येणार असून यासाठी निविदा मागवण्यात आल्या असल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. सागरी क्रीडा प्रकार असलेली ही पहिलीच चौपाटी असून मुंबईतील पर्यटनाला यामुळे वेगळे आयाम मिळतील, असे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन यांनी सांगितले.
चौपाटीवर काय काय?
’ राफ्टिंग, बोटिंग, मोटर बोट्स, पॅराग्लायडिंग, बनाना राइड यांच्यासह अनेक सागरी क्रीडा प्रकार.
’ या ठिकाणी एक जेट्टीदेखील उभारण्यात येईल.
’ पर्यटकांसाठी प्रसाधन गृहे व काही खोल्यांची व्यवस्था.
’ अंधेरी चौपाटी व जुहू चौपाटीच्या दरम्यानच्या खाडीवर पादचाऱ्यांसाठी लाकडी फळय़ांचा छोटा पूल.