धाडीची खबर मिळताच विक्रेते आणि पुस्तके गायब
‘पायरेटेड’ पुस्तकांचे विक्रेते आणि पोलिसांचे साटेलोटे असल्यामुळेच कॉपीराइट कायद्याचा खुलेआम भंग करून रस्ते आणि पदपथावर ‘पायरेटेड’मराठी पुस्तके विकणाऱ्यांच्या विरोधात कोणतीही ठोस कारवाई होत नाही, असे चित्र समोर आले आहे. मराठीतील काही नामवंत प्रकाशकांना या संदर्भात आलेला अनुभव पुरेसा बोलका आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मराठीतील नामवंत प्रकाशकांच्या काही पुस्तकाच्या ‘पायरेटेड’प्रती रस्तोरस्ती उघडपणे विकल्या जात आहेत. याविरोधात कारवाई करण्यासाठी ‘राजहंस प्रकाशनचे प्रतिनिधी विनायक पणशीकर, ‘मौज’चे मुकुंद भागवत, परचुरे प्रकाशनाचे नरेन परचुरे यांनी नोव्हेंबर महिन्यात बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांची भेट घेऊन मुंबईत अनेक ठिकाणी विकल्या जाणाऱ्या ‘पायरेटेड’ मराठी पुस्तकांची सविस्तर माहिती त्यांना दिली. सिंह यांनी या प्रकाशकांना यलोगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. तक्रारीनंतर पोलीस अशा विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई करतील, असे आश्वासनही पोलीस आयुक्तांनी दिले.
यासंदर्भात पणशीकर यांनी सांगितले की, आम्ही यलोगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर १०-१५ दिवसांनी पोलीस ठाण्यातून आम्हाला दूरध्वनी आला. ही पुस्तक विक्री ज्या ज्या ठिकाणी चालते त्या ठिकाणी उद्या अमूक वेळेला छापा घालायचा आहे, तर तुम्हीही तेथे हजर राहा, असे सांगण्यात आले. पूर्वतयारी म्हणून पुस्तकांची विक्री चालते तेथे आदल्या दिवशी आम्ही आमचा एक माणूस पाठवला. पण धक्कादायक बाब म्हणजे तेथे एकही विक्रेता किंवा पुस्तके नव्हती. याचा अर्थ उद्या छापा पडणार, ही बातमी पोहोचल्यामुळेच त्यांनी आपला गाशा गुंडाळला होता. यातून काय ‘अर्थ’ काढायचा तो प्रत्येकाने काढावा, असे पणशीकर म्हणाले.