ई कॉमर्स संकेतस्थळांवरून धार्मिक वस्तूंची विक्री जोरात; घरबसल्या वस्तू मागवण्यावर भर

दिवाळीच्या निमित्ताने ‘ई कॉमर्स’ संकेतस्थळांवर भरत असलेल्या खरेदीजत्रेत यंदाही स्मार्टफोन आणि टीव्हीची मागणी जोरात आहे. १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचे ३२ इंचांचे एलईडी टीव्ही आणि दहा हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ४जी फोनला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे या वस्तूंच्या विक्रीत पाचपट वाढ झाली असतानाच यंदा धार्मिक अथवा धर्मकार्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचीही ‘ऑनलाइन’ विक्री तेजीत सुरू आहे. दिवे, देव्हारे, धार्मिक पुस्तके यासोबतच ग्राहक गोमूत्र आणि शेणाच्या गोवऱ्याही ‘ऑनलाइन’ ऑर्डर करत असल्याचे यंदा आढळून आले आहे.

दिवाळीमध्ये खरेदीसाठी ऑफलाइन बाजाराबरोबरच यंदा ऑनलाइन बाजारातही तेजी आहे. विविध ई-व्यापार संकेतस्थळांनी गेल्या पाच-सहा दिवसांत आयोजित केलेल्या खरेदी जत्रेच्या तब्बल आठ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली. यानंतर पुन्हा एकदा सर्वच संकेतस्थळांनी खरेदीजत्रेची घोषणा करत हा उद्योग कोटय़वधींच्या उलाढालींसाठी सज्ज झाला आहे. परंतु, पहिल्या टप्प्यात सर्वाधिक मागणी ३२ इंचांचे एलईडी टीव्ही आणि ४जी स्मार्टफोनला असल्याचे निरीक्षण ई-व्यापार संकेतस्थळांनी नोंदविले. त्या खालोखाल गृहपयोगी वस्तू आणि चप्पल व बूट या विभागात सर्वाधिक मागणी नोंदविण्यात आल्याचेही ई-व्यापार संकेतस्थळांनी आपल्या विक्री अहवालात नमूद केले आहे.

हे सर्व विभाग दरवर्षी विक्रीचा एक नवीन विक्रम घडवित असतात. पण यंदा धार्मिक विभागात विक्रमी विक्री झाली असून ही विक्री मोबाइलच्या विक्रीच्या पाच टक्के इतकी नोंदविण्यात आली आहे. तर गृहपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीच्या तुलनेत १५ टक्के इतकी नोंदविण्यात आली आहे. या विभागात विविध प्रकारचे दिवे, रांगोळी याचबरोबर सर्वाधिक मागणी ही गोमूत्र आणि गोवऱ्या यांना असल्याचे निरीक्षण विक्री अहवालात नमदू करण्यात आले आहे. या विभागातील वाढती मागणी ही सर्वच ई-व्यापार संकेतस्थळांसाठी आश्चर्यकारक होती.

खरेदीचा जोर दिवाळी आणि दिवाळीनंतरही काही काळ कायम राहील असे ‘व्हिडिओकॉन’चे संचालक अनिरुद्ध धूत यांनी म्हटले आहे.  दिवाळी हा खरेदीचा सण मानला जातो या कालावधीत ग्राहक गॅझेट, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि स्मार्टफोनच्या खरेदीस सर्वाधिक पसंती देत असल्याचे निरीक्षण ‘विवो इंडिया’चे सीएमओ विवेक झांग यांनी नोंदविले. या कालावधीत स्मार्टफोनची विक्री सर्वाधिक विक्रीतील वाढ नोंदविली जात असल्याचेही ते म्हणाले.

मोठय़ा टीव्हीची हौस

यावेळच्या दिवाळी खरेदीमध्ये प्रामुख्याने ३२ इंच व त्याहून मोठय़ा स्क्रीनच्या टीव्हीला सर्वाधिक मागणी आहे. फ्लॅटपॅनल टीव्हीमध्ये एलईडी सर्वाधिक मागणी असेलेला टीव्ही असल्याने लवकरच एलईडीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता ‘सॅनसूई’चे चिफ ऑपरेटिंग अधिकारी अमिताभ तिवारी यांनी स्पष्ट केले. याचबरोबर या कालावधीत अनेकजण छोटय़ा स्क्रीनऐवजी मोठय़ा स्क्रीनची निवड करीत होते. तर यंदाच्या दिवाळीत जीवनशैलीशी संबंधित उत्पादनांनाही विशेष मागणी असून या उत्पादनांसाठी ग्राहक अधिक किंमत मोजण्यास तयार  असल्याचे निरीक्षण ‘व्हिडीओकॉन’चे संचालक अनिरुद्ध धूत यांनी नोंदविले. सणाच्या काळातील सवलतींमुळे विक्रीला  बळकटी मिळत असल्याचेही धूत म्हणाले.