सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक तारखेलाच वेतन मिळावे असा सरकारचा प्रयत्न असला तरी सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे वेतन रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक तारखेलाच वेतन मिळावे म्हणून राज्य सरकारने ‘शालार्थ’ सॉफ्टवेअर लागू केले आहे. मात्र, या सॉफ्टवेअरमध्ये अनेक त्रुटी आहेत. परिणामी शिक्षकांचे वेतन होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. या त्रुटी लवकरात लवकर दूर करण्याची मागणी शिक्षक परिषदेचे संघटनमंत्री अनिल बोरनारे यांनी केली.
शिक्षकांचे पगार वेळेत व्हावे यासाठी सरकारने केलेला बदल स्वागतार्ह आहे. त्यासाठी सॉफ्टवेअर आणले असले तरी त्याचा वापर कसा करावा याचे आवश्यक ते प्रशिक्षण शाळा प्रमुखांना देण्यात आलेले नाही. सॉफ्टवेअरच्या वापराबाबत शाळाचालक अनभिज्ञ असल्याने प्रचंड गोंधळ आहे. या सॉफ्टवेअरमध्ये टीडीएस कापण्याची सोय नाही. या शिवाय अर्धवेळ व अंशकालीन शिक्षकांचे वेतन कसे करायचे यासाठीची योग्य तरतूद नाही. त्यामुळे, सर्व शिक्षकांचे वेतन कसे करायचे असा शाळांसमोर प्रश्न आहे. हा गोंधळ थांबविण्यासाठी सॉफ्टवेअर वापराचे प्रशिक्षण शाळाचालकांना प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार रामनाथ मोते यांनी शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्याकडे पत्र लिहून केली आहे.